उत्तर प्रदेशमध्ये IPS अधिकाऱ्याच्या पित्याची हत्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 मे 2017

भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकारी संजीव त्यागी यांचे वडिल ईश्‍वर त्यागी यांची आज (गुरुवार) गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

गाझियाबाद (उत्तर प्रदेश) : भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकारी संजीव त्यागी यांचे वडिल ईश्‍वर त्यागी यांची आज (गुरुवार) गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

आज सकाळी गाझियाबादमधील कवी नगर येथे ईश्‍वर त्यागी (वय 54) यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. कौटुंबिक वादामुळे त्यागी यांची हत्या झाल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही हत्या आहे की आत्महत्या या दृष्टिनेही पोलिसांचा तपास सुरू आहे. ईश्‍वर त्यागी हे गाझियाबादमधील राज नगर येथील सेक्‍टर-2 मध्ये राहत होते. तर संजीव त्यागी हे लखनौमध्ये पोलिस अधिक्षक (कॉर्पोरेट सेल) म्हणून नियुक्त आहेत.

शवविच्छेदनासाठी ईश्‍वर त्यागी यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. "त्यागी यांच्यावर यापूर्वीही हल्ला झाला होता. हे प्रकरण हत्येचे आहे की अन्य याचा शोध घेत आहोत. ईश्‍वर त्यागी यांचा एक मुलगा मानसिक रुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान ईश्‍वर त्यागी यांच्या कुटुंबियांनी याबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे', अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.