ड्युटीवर असताना सेल्फी काढणाऱ्या महिला पोलिसांचे निलंबन

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मार्च 2017

सामूहिक बलात्कार आणि ऍसिड हल्ला पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरु असताना तिच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या तीन महिला पोलिसांनी ड्युटीवर असताना सेल्फी काढल्याने त्यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे.

लखनौ (उत्तर प्रदेश) : सामूहिक बलात्कार आणि ऍसिड हल्ला पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरु असताना तिच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या तीन महिला पोलिसांनी ड्युटीवर असताना सेल्फी काढल्याने त्यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे.

संशयित हल्लेखोर 2009 पासून पीडितेच्या मागावर आहेत. एका कॉफी शॉपमध्ये नोकरी करणाऱ्या पीडित महिलेवर त्यांनी चार वेळा हल्ला केला आहे. यापूर्वी २००९ मध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. या संदर्भात पोलिसांकडे गुन्हे नोंद आहेत. गुरुवारी गंगा-गोमती एक्‍स्प्रेसने लखनौला परतत असताना आरोपींनी पीडित महिलेला जबरदस्तीने ऍसिड पिण्यास दिले. त्यानंतर तिने चारबाग स्थानकावर उतरून रेल्वे पोलिसांकडे लेखी तक्रार केली. तिच्यावर केजीएमयू रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दरम्यान, तिच्या संरक्षणासाठी रुग्णालयात तीन महिला पोलिस हवालदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महिलांनी रुग्णालयातच पीडित महिलेच्या शेजारी बसून सेल्फी काढली. सेल्फी काढतानाचे हे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. या प्रकाराची उत्तर प्रदेश पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत या तीनही महिला हवालदारांचे निलंबन केले असून या प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

शुक्रवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केजीएमयू रुग्णालयात येऊन पीडित महिलेची भेट घेतली. अखिलेश यादव यांच्या सरकारने या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नसल्याबद्दल त्यांच्यावर टीका करत या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.