स्मृती इराणींचा पाठलाग करणाऱ्यांवर FIR

वृत्तसंस्था
रविवार, 2 एप्रिल 2017

मद्यधुंद अवस्थेत शनिवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पाठलाग करणाऱ्या चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - मद्यधुंद अवस्थेत शनिवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पाठलाग करणाऱ्या चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मित्रांच्या वाढदिवसाच्या समारंभात चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मद्यप्राशसन केले होते. हे सर्व विद्यार्थी दिल्लीतील दक्षिण भागातील एका महाविद्यालयातील आहेत. घरी जाताना त्यांनी स्मृती इराणी यांच्या मोटारीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. इराणी यांनी या घटनेची माहिती देण्यासाठी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत कळविले आणि चाणक्‍यपुरी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. तेथे या चारही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनुसार या चारही जणांनी मद्य प्राशन केल्याचे आढळून आले असून ते इराणी यांच्या मोटारीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती पोलिस उपायुक्तांनी दिली आहे.

पाठलाग करणाऱ्या चार विद्यार्थ्यांवर कलम 354 डी आणि 509 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.