शाहरुख खानविरोधात गुन्हा दाखल

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

'रईस' चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी शाहरुखने मुंबई ते दिल्ली रेल्वेने प्रवास केला होता. या प्रवासादरम्यान कोटा रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता.

कोटा - 'रईस' या चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान कोटा रेल्वे स्थानकावर गोंधळ माजवून रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल अभिनेता शाहरुख खानविरोधात रेल्वे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे पोलिसांनी 13 फेब्रुवारीला शाहरुखविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोटा रेल्वे स्थानकावरील एका विक्रेत्याने याबाबतची याचिका रेल्वे न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत. विक्रम सिंह या व्यक्तीला शाहरुखच्या चाहत्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. 

'रईस' चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी शाहरुखने मुंबई ते दिल्ली रेल्वेने प्रवास केला होता. या प्रवासादरम्यान कोटा रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. रेल्वेच्या दारात उभे राहून त्याने चाहत्यांना अभिवादन केले. तसेच त्याने चाहत्यांच्या दिशेने काही वस्तूही फेकल्या होत्या. त्यामुळे नागरिकांची एकच झुंबड उडाली आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लाठीमार करावा लागला होता. यामुळे रेल्वेच्या मालमत्तेचे आणि विक्रमसिंहच्या टपरीचे नुकसान झाले होते.