योगींना गुंड म्हणणाऱ्या फराह खानच्या पतीविरुद्ध तक्रार

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मार्च 2017

'गुंडाला सत्ता मिळाल्यानंतर तो दंगे थांबवेल, अशी अपेक्षा करणे म्हणजे बलात्काऱ्याला बलात्कार करण्याची परवानगी दिल्यानंतर तो बलात्कार करणार नाही, अशी अपेक्षा बाळगण्यासारखे आहे. याच तर्काने विचार करायचा झाला तर आता दाऊदला सीबीआयचे संचालक आणि विजय मल्ल्याला आरबीआयचे गव्हर्नर होऊ शकतात', असे एकामागोमाग एक ट्‌विट शिरीषने केले होते.

नवी दिल्ली (उत्तर प्रदेश) : नामवंत नृत्यदिग्दर्शक-दिग्दर्शक फराह खान हिचा पती शिरीष कुंदेरने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गुंड असे संबोधत ट्‌विटरवर असभ्य भाषेत टीका केल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

स्वत: चित्रपट दिग्दर्शक असलेल्या शिरीषने (वय 44) मंगळवारी काही ट्‌विटस्‌ केले होते. त्यामध्ये त्याने योगींना गुंड असे संबोधले होते. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यासंदर्भात शिरीषने ट्‌विट केले आहेत. "गुंडाला सत्ता मिळाल्यानंतर तो दंगे थांबवेल, अशी अपेक्षा करणे म्हणजे बलात्काऱ्याला बलात्कार करण्याची परवानगी दिल्यानंतर तो बलात्कार करणार नाही, अशी अपेक्षा बाळगण्यासारखे आहे. याच तर्काने विचार करायचा झाला तर आता दाऊदला सीबीआयचे संचालक आणि विजय मल्ल्याला आरबीआयचे गव्हर्नर होऊ शकतात', असे एकामागोमाग एक ट्‌विट शिरीषने केले होते. त्यानंतर शिरीषवर चहुबाजूंनी प्रचंड टीका झाली. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार त्याच्यावर हजरतगंज येथील पोलिस स्थानकात शिरीषविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. टीका होत असल्याचे पाहत शिरीषने आपले ट्‌विट हटविले असून शुक्रवारी रात्री उशिरा 'मी विनाअट दिलगिरी व्यक्त करतो. मला कोणालाही दुखवायचे नव्हते किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या', असे म्हणत माफीही मागितली आहे.

अलिकडेच नामवंत लेखक चेतन भगतनेही योगींवर निशाणा साधला होता. 'योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. कारण तुम्ही वर्गातील सर्वात खोडकर मुलाला वर्गाचा मॉनिटर करता आणि तोच सर्वात चांगला आहे असा विश्‍वास ठेवता', असे ट्विट करत त्याने योगींवर टीका केली होती.

Web Title: FIR filed against Shirish Kunder for slamming Yogi Adityanath on Twitter, director renders apology