श्रीनगर : लष्कराच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
रविवार, 25 जून 2017

आता गोळीबार थांबला असून शाळेमध्ये कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. या शाळेचा परिसर विस्तीर्ण असून शाळेच्या सहा इमारतींमध्ये 400 पेक्षाही जास्त खोल्या आहेत. ही कारवाई सुमारे सोळा तास चालली

श्रीनगर - जम्मु काश्‍मीर राज्याची राजधानी असलेल्या श्रीनगरमधील एका शाळेमध्ये (दिल्ली पब्लिक स्कूल) सुरु असलेला गोळीबार थोड्या वेळापूर्वी थांबल्याचे सूत्रांनी दिले आहे. या शाळेमध्ये आश्रय घेतलेल्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय लष्कराचे तीन जवानही या चकमकीत जखमी झाले आहेत.

काल (शनिवार) रात्री लष्कराकडून या शाळेस वेढा घालण्यात आला होता. याचबरोबर या दहशतवाद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी लष्कराकडून "फ्लॅश लाईट्‌स'चाही वापर करण्यात आला होता.

आता गोळीबार थांबला असून शाळेमध्ये कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. या शाळेचा परिसर विस्तीर्ण असून शाळेच्या सहा इमारतींमध्ये 400 पेक्षाही जास्त खोल्या आहेत. ही कारवाई सुमारे सोळा तास चालली.

श्रीनगरमधील पंथा चौकात सशस्त्र दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) उपनिरीक्षक आणि एक जवान हुतात्मा झाले. साहिब शुक्‍ला असे हुतात्मा अधिकाऱ्याचे नाव आहे. लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 

काल सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. लष्कराची कारवाई सुरु असतानाच दहशतवाद्यांनी या शाळेमध्ये आश्रय घेतला होता.