कुलगाममध्ये पाच दहशतवादी मारले

 कुलगाममध्ये पाच दहशतवादी मारले

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी लष्करे तैयबा आणि हिज्बुल मुजाहिदीन या संघटनांच्या पाच दहशतवाद्यांना ठार मारले. मारलेल्यांपैकी एक जण गेल्या वर्षी रोख रक्कम नेणाऱ्या व्हॅनवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता.

दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत गुप्तचरांकडून माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी काल (ता. 14) रात्रीपासून कुलगाममधील काझीगुंड गावाला वेढा घालत शोध मोहीम सुरू केली होती. यादरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनी प्रथम परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवून नंतर प्रतिहल्ला केला. यात पाच दहशतवादी मारले गेले. गुलझार अहमद पद्दार, फैझल अहमद राथेर, झाहिद अहमद मीर, मसरुर मौलवी आणि झहूर अहमद लोन अशी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावे असून, सर्व काश्‍मीरमधील रहिवासी आहेत. यापैकी पद्दार हा गेल्या वर्षी 1 मे रोजी पाम्बे भागात बॅंकेची रोख रक्कम नेणाऱ्या व्हॅनवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. या हल्ल्यात पाच पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले होते, तर बॅंकेचेही दोन कर्मचारी मारले गेले होते. पद्दारने कुलगाममध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचाही खून केला होता. त्याच्यावर इतरही अनेक गुन्हे दाखल होते. आजच्या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी घटनास्थळाहून शस्त्रसाठाही जप्त केला.

दरम्यान, राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचा भंग करत केलेल्या गोळीबारात लष्कराचा एक जवान जखमी झाला. भारतीय जवानांनी या गोळीबाराला तातडीने उत्तर दिले. 

एक नागरिक मृत्युमुखी 
कुलगाममध्ये दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर येथे काही स्थानिक नागरिक आणि जवानांमध्ये संघर्ष निर्माण झाला. काही युवकांनी जवानांवर दगडफेक केल्यानंतर जवानांनी त्यांना पांगविण्यासाठी अश्रुधुराचा मारा केला. मात्र, तरीही जमाव हिंसक झाल्याने जवानांना पॅलेट गनचा वापर करावा लागला. यावेळी निर्माण झालेल्या संघर्षात एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com