गोव्यात जीर्ण पोलादी पदपूल कोसळून पन्नास जण बुडाल्याची भीती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

कुडचडे - सावर्डे गावांना जोडणारा हा पोलादी पदपूल जीर्ण झाल्याने बंद होता. आज (गुरुवारी) सायंकाळी 7 वा.च्या सुमारास एका युवकाने आत्महत्या करण्यासाठी या पुलावरून नदीत उडी घेतली

सावर्डे : दक्षिण गोव्यातील सावर्डे - तिस्क येथील जीर्ण पोलादी पदपूल कोसळून सुमारे पन्नासहून अधिक लोक बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

कुडचडे - सावर्डे गावांना जोडणारा हा पोलादी पदपूल जीर्ण झाल्याने बंद होता. आज (गुरुवारी) सायंकाळी 7 वा.च्या सुमारास एका युवकाने आत्महत्या करण्यासाठी या पुलावरून नदीत उडी घेतली.

त्याला कुणीतरी पाहिले आणि वाचवण्यासाठी म्हणून काहीजणांनी तिथे धाव घेतली. त्यानंतर पुलावर सुमारे पन्नासहून अधिक लोक त्याला पाहण्यासाठी जमा झाले.

मात्र, मोडकळीस आलेला जुनाट पूल लोकांच्या भारामुळे कोसळला आणि त्यावरील लोकही नदीत पडून बुडाले. त्यापैकी काहीजणांना वाचवण्यात यश आले तर अनेकजण हाती लागलेले नाहीत. युध्दपातळीवर बचावकार्य सुरू आहे.