अजातशत्रू, मुरब्बी राजकारणी : अटल बिहारी वाजपेयी

Atal Bihari  Vajpayee
Atal Bihari Vajpayee

शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे, आदरणीय व्यक्तीमत्त्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिले गेले. देशाचे परराष्ट्र धोरण, संरक्षणापासून ते ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत रुची असणारे वाजपेयी यांनी बिगरकॉंग्रेसी पंतप्रधान या नात्याने आपल्या कार्यकर्तृत्वाची मुद्रा देशाच्या राजकारणावर उमटवली. चीनशी जवळीक, पाकिस्तानशी मैत्रीचे प्रयत्न आणि कारगिलसारखे दुःसाहस पाकिस्तानने केल्यानंतर त्यांना धूळ चारण्यासही वाजपेयींनी मागे पाहिले नाही. देशाची आण्विक क्षमता सिद्ध करतानाच विकासालाही चालना दिली. 

घणाघाती वक्तृत्वाने श्रोत्यांची मने जिंकणारे, देशप्रेमाने ओथंबलेल्या अंतःकरणाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात देशहितासाठी आपल्या ध्येयधोरणाचे प्रतिबिंब उमटवू पाहणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे अटलबिहारी वाजपेयी. गौतम बुद्धांचा शांततेचा आदर्श पुढे नेत असतानाच प्रसंगी अणुचाचण्या करून सिमेपलिकडील शत्रूला धडा शिकवू पाहणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे अटलबिहारी वाजपेयी. राजकारणात राहूनही स्वपक्षासह विरोधकांमध्येही आदराचे आणि समकालीनांबरोबर मित्रत्वाचे स्थान मिळवणाऱ्या वाजपेयींच्या हसतमुख व्यक्तीमत्त्वाची मोहिनी भारतवासियांच्या मनावर कायमची राहिली आहे. कवीमनाच्या मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली. पत्रकारिता करून समाजसेवाही केली. राजकारणातील नैतिकता, निस्पृहपणा, सर्वसमावेशकता, समाजहितासाठी राजकारण अशा कोणत्याही बाबतीत उदाहरण द्यायचे झाले तर वाजपेयींचे नाव सहज ओठावर येते. म्हणूनच अटलबिहारी वाजपेयी यांचा भारतीय राजकारणातील पितामह असा उल्लेख अभिमानाने सर्वपक्षीय करतात. 

स्वातंत्र्यपूर्व काळात आंदोलनात उतरून देशवासियांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अनेक नेते या भुमीला लाभले. तथापि, स्वातंत्र्यानंतरच्या काळात आसेतूहिमाचल अशी देशव्यापी लोकप्रियता लाभलेले आणि देशाचे नेतृत्व केलेल्या सर्वमान्य नेत्यांच्या यादीत वाजपेयींचे नाव आघाडीवरचे असेल. कार्यकर्त्यांसह विरोधकांमध्येही आदरणीय ठरलेल्या वाजपेयींनी राजकीय, सामाजिक आणि मानवीय पातळीवर स्वतःचे तत्त्वज्ञान तयार केले. त्याचे बाळकडू कार्यकर्त्यांच्या गळी उतरवून त्यांची मोठी फळी उभी केली. एकेकाळचा भारतीय जनसंघ आणि त्यानंतर भारतीय जनता पक्ष यांच्या कार्यकर्त्यांची घट्ट विण तयार करणे आणि त्याद्वारे पक्ष गावागावांत आणि खेड्यापाड्यात पोहोचवण्याचे, त्याची ध्येयधोरणे सामान्यांना पटवून त्यांना आपलेसे करण्याचे कार्य वाजपेयींनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले. जनतेच्या मनात स्वतःविषयी आदराचे स्थान निर्माण केले. राजकारण करत असताना स्वपक्षीय आणि विरोधक या सर्वांमध्ये ते सहजपणे वावरत, त्यांच्याविषयीचा आदर सर्व पातळ्यांवर सतत व्यक्त होत. सार्वजनिक सभा असो नाहीतर संसदेचे सभागृह प्रत्येक ठिकाणी वाजपेयी यांनी आपल्या वक्तृत्वाने सर्वांवर छाप पाडली. भाषेवरील त्यांचे प्रभुत्व प्रत्येक वेळी अनुभवाला यायचे. तथापि, वाजपेयींनी कधीही वाक्‍युद्ध करून आपला हिनकसपणा दाखवला नाही. 

संवेदनशील कवीमन 
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील शिंदे की छावणी भागात 25 डिसेंबर 1924 रोजी कृष्णादेवी आणि कृष्णा बिहारी वाजपेयी यांच्या पोटी अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा पंडीत शामलाल वाजपेयी उत्तर प्रदेशातील बाटेश्‍वर येथून ग्वाल्हेर येथे स्थलांतरीत झाले होते. वाजपेयींचे वडील उत्कृष्ट कवी आणि शाळा मास्तर होते. ही कवीमनाची संवेदनशीलताच वाजपेयींच्या जीवनात परंपरेने आपसूक उतरली आणि त्यांनीही त्याचे संवर्धन केले. आपल्या कवीमनाचा हुंकार कवितांमधून व्यक्त केला. त्यांनी आपल्या कवितांना ग्रंथरुपात आणि ऑडिओस्वरुपात सादर केले. वाजपेयी आयुष्यभर अविवाहीत राहिले, ते देशाचे पहिले अविवाहित पंतप्रधानही ठरले. त्यांनी ग्वाल्हेरच्या व्हिक्‍टोरिया (आजचे लक्ष्मीबाई) महाविद्यालयातून राज्यशास्त्रात "एमए'चे पदव्युत्तर शिक्षण घेतले; कानपूरच्या डी. ए. व्ही. महाविद्यालयातही शिक्षण घेतले. 

पत्रकार, संपादक 
अटलबिहारी वाजपेयींनी पत्रकार म्हणून सार्वजनिक जीवन सुरू केले. दिल्ली येथून प्रकाशीत होणाऱ्या "वीर अर्जून'साठी त्यांनी सुरवातीच्या काळात काम केले. प्रसिद्ध पत्रकार के. नरेंद्र त्याचे संपादक होते. डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत सार्वजनिक आणि राजकीय कार्याला सुरवात करण्याआधी, पन्नासच्या दशकामध्ये वाजपेयींनी सहायक संपादक म्हणून काम केले. "वीर अर्जून' या दैनिकाची लोकप्रियता आणि खप घसरला, त्याचा जोश घटला; तरीही वाजपेयींच्या मनावर त्याने अखेरपर्यंत अधिराज्य केले. त्याच्याविषयी त्यांच्या मनात विशेष आदर होता. वाजपेयी पंतप्रधान असताना असो नाहीतर ते आजारपणातून बाहेर पडत असताना, प्रत्येकवेळी त्यांच्याकडील वर्तमानपत्राच्या गठ्ठ्यात "वीर अर्जून' असायचा आणि ते तो आवर्जून वाचायचे. 

साहित्यिक वाजपेयी 
वाजपेयी यांनी राजकारणात आपले अढळपद निर्माण केले, कार्यकर्त्यांच्या मनावर अधिराज्य केले. तितक्‍याच सहजतेने त्यांनी साहित्याच्या प्रांतात मुशाफिरी केली. आपल्या साहित्यिक कारकिर्दीची मोहर उमटवली. साहित्य आणि पत्रकारिता या क्षेत्रात योगदान देणाऱ्या वाजपेयींनी राष्ट्रधर्म (हिंदी मासिक), पांचजन्य (हिंदी साप्ताहिक) आणि "स्वदेस' व "वीर अर्जून' या दैनिकांचे संपादन केलेच. याशिवाय, त्यांचे "मेरी संसदीय यात्रा' (चार खंड), "मेरी इक्‍यावन्न कविताएँ', "संकल्प काल', "शक्ती से शांती', "फोर डिकेडस्‌ इन पार्लमेंट' (तीन खंडात भाषणांचा संग्रह) 1957-95, "लोकसभा में अटलजी' (भाषणांचा संग्रह), "मृत्यू या हत्या', "अमर बलिदान', "कैदी कवीराज की कुंडलियाए' (आणिबाणीच्या काळात तुरूंगात असताना लिहिलेल्या कवितांचा संग्रह), "न्यू डायमेंन्शन्स ऑफ इंडियाज्‌ फॉरेन पॉलिसी (1977- 79 या काळात परराष्ट्रमंत्री असताना केलेल्या भाषणांचा संग्रह), "जनसंघ और मुसलमान', "संसद में तीन दशक' (हिंदी), 1957-92 या कालावधीतील संसदेतील भाषणांचा तीन खंडातील संग्रह आणि "अमर आग हैं' (कवितांचा संग्रह) 1994 हे ग्रंथ गाजले, आवर्जून वाचले गेले. साहित्यांच्या अभ्यासकांसाठी त्यांचे ग्रंथ संदर्भ ठरले. एवढेच नव्हे तर त्यांचे संसदीय कामकाज आणि परराष्ट्र धोरणाबाबतचे ग्रंथ हे ऐतिहासिक दस्तऐवज ठरले, त्यांना मोठे संदर्भमुल्यही प्राप्त झाले. संसदीय कामकाजाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे ग्रंथ म्हणजे बिनचूक माहितीचे साधन बनले. 

दूरदृष्टीचा नेता 
भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या राज्यकर्त्याच्या श्रेणीतील अटल बिहारी वाजपेयी यांनी 1998-99 या काळात पंतप्रधान म्हणून काम पाहिले, देशाचे नेतृत्व केले. याच काळात मे 1998 मध्ये पोखरण येथे 24 वर्षांनंतर (1974 मध्ये पहिली अणूचाचणी घेतली होती) आण्विक चाचणी घेऊन भारताने जगातल्या निवडक देशात आपले स्थान निर्माण केले. त्यापाठोपाठ पाकिस्ताननेही अणूचाचणी घेवून हमभी कुछ कम नहीं, असे दाखवण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर अणूचाचणीवरून राळ उठली. भारतविरोधी आणि समर्थन अशा दोन्हीही प्रकारे मते व्यक्त झाली. भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध ताणले गेले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कटूता कमी करणे, ताणले संबंध पुर्ववत करून उभयतांमधील चर्चेला नवे वळण देणे आणि तिढा सोडविण्याच्या प्रयत्नाला गती देण्यासाठी फेब्रुवारी 1999 मध्ये उभय देशांमधील बससेवेला सुरवात करून गती देण्यात आली. भारताच्या या प्रामाणिक पुढाकाराचे जगभरातून कौतुक झाले. त्याच्या शांततेच्या भुमिकेला पूरक असेच हे पाऊल होते. मुरब्बीपणाचे ते प्रदर्शन होते. भारताने पुढे केलेल्या या मैत्रीच्या हाताला झिडकारत पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी करून घातकी राजकारण केले; तेव्हा वाजपेयींच्या नेतृत्वाखाली चोख प्रत्युत्तर देण्यात आले. भारतीय भुमीवरील हल्ला परतवून लावण्यात आला. त्यासाठी आपल्या मोठी जिवीतहानी सोसावी लागली. त्यावेळी भारतीयांमधील सामाजिक आणि राजकीय एकीचे आणि देशाविषयीच्या आत्मियतेचे प्रदर्शन घडले. 

मंदीवर मात, रस्त्यांचे जाळे 
जगभरात मंदीची लाट असताना वाजपेयींच्या नेतृत्वाखाली 1998-99 मध्ये भारताने देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) 5.8 टक्के वाढ केली, ती आधीच्या वर्षापेक्षा जास्त होती. वाढलेले शेती उत्पादन आणि परकी चलनाच्या साठ्यात झालेली वाढ यामुळे देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा मिळत असल्याचे संकेत मिळाले. ग्रामीण भागातील गरिबांच्या उत्थानासाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी, ""आपल्याला वेगाने प्रगती केली पाहिजे, प्रगतीशिवाय आपल्याला तरणोपाय नाही,'' असे सूचक आणि दिशादर्शक विधान वाजपेयींनी केले. एकविसाव्या शतकात भारताला आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या महान नेत्याने सरकारी पातळीवर अनेक धाडसी निर्णय घेतले. ग्रामीण अर्थकारण सक्षम करण्याचा प्रयत्न केला. पायाभूत सुविधांच्या विस्ताराला चालना दिली. देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला गती दिली, नव्हे ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करून विकासाची प्रक्रिया अधिक गतीमान केली. ग्रामीण भागातही रस्त्यांचे जाळे उभे राहावे, यासाठी पुढाकार घेतला. 

सन 2000 मध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजना सुरू केली. त्याने आसाम, मणिपूरसारख्या ईशान्य भारतातील राज्यांपासून ते अनेक प्रगत राज्यातील ग्रामीण जनता दर्जेदार रस्त्यांनी जोडली गेली. विकासकामांना चालना मिळाली. एवढ्यावरच न थांबता, वाजपेयी यांनी मानवी साधन संपत्ती विकासाला प्रोत्साहन दिले. बावन्नव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला उद्देश भाषण करताना वाजपेयी यांनी, ""मी भारताचे एक चित्र पाहिले आहे ः भूक आणि भयापासून मुक्त असलेला भारत; निरक्षरता आणि दारिद्रयापासून मुक्त असलेला भारत.'' 

पददलितांबद्दल कळवळा 
वाजपेयी यांनी स्वातंत्र्य चळवळीतदेखील योगदान दिले होते. 1942 च्या आंदोलनात त्यांनी तुरूंगवास पत्करला होता. 1975-77 या आणिबाणीच्या काळातही काही महिने तुरूंगात होते. जगात मोठ्या प्रमाणात भ्रमंती केलेल्या वाजपेयींना आंतरराष्ट्रीय राजकारण, अनुसूचीत जाती आणि जमातींचे उत्थान, महिला आणि बालकांचे कल्याण यामध्ये विशेष रूची होती. 

देशभर आपला चाहतावर्ग वाजपेयी यांनी निर्माण केला होता. कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या आदेशाची प्रतिक्षा करायची. अमोघ वाणीतून त्यांचे विचार ऐकण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करायचे. एवढेच नव्हे तर विरोधी पक्षातील मंडळीही आदराने त्यांचे विचार ऐकायची. संसदेतील त्यांची भाषणे एकापेक्षा एक सरस ठरली. आपले सरकार अल्पजिवी ठरते, हे लक्षात येत असताना त्यांनी केलेले भाषण हा एक दस्तऐवज ठरावा, एवढे अप्रतिम होते. देशसेवेसाठीच्या योगदानाबद्दल 1992 मध्ये वाजपेयींना पद्मविभूषणने, तर 1993 मध्ये कानपूर विद्यापिठातर्फे सन्माननीय डॉक्‍टरेट ऑफ फिलॉसॉफीने (डी. लिट्‌.) विभुषीत करण्यात आले. कवी आणि लेखक म्हणूनही वाजपेयी यांनी साहित्यविश्‍वावर आपल्या अभिजात रसिकतेची मोहोर उमटवली. भारतीय नृत्य आणि संगिताचे त्यांचे प्रेम सर्वश्रुत आहे. 

भाजपची मुहूर्तमेढ 
आणिबाणीनंतर पहिले बिगरकॉंग्रेसी सरकार सत्तेवर आले. ज्येष्ठ नेते मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. अनेक विचारांची मंडळी जनता पक्षात होती. त्यांची मोट बांधूनच देसाईंचे सरकार सत्तेवर आले होते. तथापि, पक्षांतर्गत मतभेदांनी 1979 मध्ये देसाई यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि जनता पक्ष त्यानंतर विसर्जित करण्यात आला. या काळात भारतीय जनसंघाने विरोधी आघाडी होण्यासाठी मोठी किंमत मोजली होती, पण त्यांच्या नेतृत्वाच्या पदरी निराशा आली; तर डावे पक्ष आघाडीच्या अंतर्गत बंडाळीने हैराण झाले होते. जनता पक्ष बांधणीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या अनेक जुन्या पक्षांना किंमत मोजावी लागली होती. कार्यकर्त्यांची घडी विस्कटली होती. अखेरीस वाजपेयी यांनी भारतीय जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांमधील आपल्या जुन्या सहकाऱ्यांना, विशेषतः लालकृष्ण अडवानी, भैरोसिंह शेखावत यांच्यासारख्यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पक्षाची (भाजप) मुहूर्तमेढ रोवली. एका अर्थाने जनसंघाचे पुनरुज्जीवनच केले. या प्रयत्नाला तळागाळापर्यंत प्रतिसाद मिळाला. पुर्वीच्या जनसंघातील मंडळी भाजपच्या झेंड्याखाली एकत्र आली. वाजपेयी भाजपचे पहिले अध्यक्ष बनले आणि त्यांनी जनता पक्षाच्या वाटेने जाणाऱ्या कॉंग्रेसवर टिकेची झोड उठवली. भाजपने शिख दहशतवादाला कडाडून विरोध केला, तत्कालीन पंतप्रधान आणि कॉंग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांच्या फुटिरतावादी आणि भ्रष्ट कारभारावर टीका करण्याचा सपाटा लावला. भाजपने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1984 मध्ये राबवलेल्या "ऑपरेशन ब्ल्यू स्टार'ला पाठिंबा दिलेला नव्हता. इंदिरा गांधी यांची ऑक्‍टोबर 1984 मध्ये त्यांच्या अंगरक्षकांनी हत्त्या केल्यानंतर शिखविरोधी झालेल्या हिंसाचाराबद्दल तीव्र विरोधाची भुमिका घेतली होती. या हिंसाचारात तीन हजारांवर शिखांना प्राणाला मुकावे लागले. इंदिरा गांधींच्या हत्त्येचा बदला घेण्यासाठी सरसावलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांपासून शिख नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न वाजपेयींनी केला होता. इंदिरा गांधींच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपचे दोनच संसद सदस्य निवडून आले. सहानुभुतीची लाट होती. त्याचा कॉंग्रेसला फायदा झाला. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसला पाशवी बहुमत मिळाले. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाला आत्मपरीक्षणाची आणि त्यातून बोध घेत पक्षबांधणीचे आव्हान होते. ते वाजपेयी, अडवानी यांच्या नेतृत्वाखालील अन्य नेत्यांच्या फळीने पेलले. भाजपने मुख्य प्रवाहाचे राजकारण करत, संघटनात्मक बांधणी तळागाळापर्यंत नेत आणि देशातील युवकांना आपल्याकडे आकर्षित करत कॉंग्रेस विरोधातील प्रबळ पक्ष ही प्रतिमा निर्माण केली. या काळात भाजपचे अध्यक्ष आणि संसदेतील विरोधी पक्ष नेते या नात्याने वाजपेयींनी मोठे योगदान दिले. 

तीनदा पंतप्रधान 
वाजपेयी यांनी 1996 ते 2004 या कालावधीत तीनदा पंतप्रधानपद भुषविले. भाजपच्या राष्ट्रवादी भुमिकेला मतदारांनी पाठिंबा दिला. 1996 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी वाजपेयी यांना सरकार बनवण्यासाठी पाचारण केले, देशाचे दहावे पंतप्रधान म्हणून वाजपेयींनी शपथ घेतली. तथापि, बहुमत मिळवण्यात भाजप अपयशी ठरल्याने, वाजपेयींचे सरकार अल्पजिवी ठरले. ते केवळ तेराच दिवस टिकले. त्यानंतर 1996 आणि 1998 मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीची (यूपीए) सरकारे आले, पण स्थैर्य त्यांच्याहीसोबत नव्हते. 1998 मध्ये पुन्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या, भाजपलाच सर्वाधिक जागा मिळाल्या. "एनडीए'ची मोट अधिक घट्ट बांधत वाजपेयींच्या नेतृत्वाखालील सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर आले. 1999 च्या मध्याला जयललिता यांच्या अण्णा द्रमुकने पाठिंबा मागे घेण्याच्या धमक्‍या सुरू ठेवल्या. नेत्यांच्या दिल्ली ते चेन्नई वाऱ्या झाल्या, पण सारे निष्फळ ठरले. 17 एप्रिल 1999 रोजी सभागृहात एका मताने वाजपेयी सरकारने बहुमत गमावले आणि पायउतार व्हावे लागले. तथापि, विरोधकही सत्तेवर येण्याएवढी बहुमताची मोट बांधू न शकल्याने लोकसभा विसर्जित करावी लागली. निवडणुका होईपर्यंत बाजपेयींचेच सरकार काम करत होते. 

आंतरराष्ट्रीय निर्बॅंध 
भारताने अणूचाचणी केल्यानंतर रशिया आणि फ्रान्सने भारताच्या चाचणीचे समर्थन केले होते; तर अमेरिका, कॅनडा, जपान, ब्रिटन आणि युरोपीय महासंघ तंत्रज्ञान हस्तांतरण, माहिती आणि साधनसामग्री याबाबत निर्बंध लादले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील टिका, परकी गुंतवणुकीतील घट, व्यापारात घट अशी भारताला किंमत मोजावी लागली, पण देशांतर्गत पातळीवर वाजपेयी यांच्या निर्णयाचे मोठे स्वागतच झाले. 

पाकिस्तानशी शांततेचे प्रयत्न 
वाजपेयींनी 1998 च्या अखेरीला आणि 1999 च्या सुरवातीला पाकिस्तानसोबत शांततेसाठी प्रयत्न केले, ठोस पावले उचलली. फेब्रुवारी 1999 मध्ये दिल्ली-लाहोर बससेवा सुरू झाली. नव्याने शांतता बोलणीला प्रारंभ केला, त्यातून लाहोर जाहीरनामा आकाराला आला. त्यात शांतता प्रक्रिया कायम सुरू ठेवणे, संयुक्त व्यापारवृद्धी, परस्पर मैत्रीवर भर देण्यात आला. दक्षिण आशिया अणूस्पर्धाविरहीत ठेवण्याचे ठरवले. त्याने अणूचाचण्यांनी निर्माण झालेले संशयाचे मळभ दूर झाले. 

कारगिल युद्ध आणि अशीही सरशी 
काश्‍मिरातील दुर्गम आणि संरक्षण यंत्रणा फारशी नसलेल्या कारगिल भागात पाकिस्तानने गणवेशविरहीत सैन्य, अधिकारी आणि दहशतवादी यांनी घुसखोरी केली, काही भूभाग ताब्यात घेतला. त्यांनी अखनूर, बटालिक भागातही हातपाय पसरले. याचा सुगावा लागल्यानंतर भारतीय लष्कराने "ऑपरेशन विजय' राबवले. तीन महिने चकमकींचे सत्र चालले. पाचशेवर भारतीय जवान मारले गेले; पाकिस्तानचे सहाशे ते चार हजारांवर दहशतवादी, सैन्य मारले गेले. त्यांनी हिरावलेला 70 टक्के भूभाग परत मिळवण्यात यश आले. या काळात पंतप्रधान म्हणून वाजपेयींनी मोलाची भुमिका बजावली, त्यांना सर्व पक्षीयांनी सहकार्यही केले. कारगिल युद्धानंतर 1999 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील "एनडीए'ने लोकसभेच्या 543 पैकी 303 जागा जिंकून विजय संपादन केला, चांगले बहुमत लाभल्याने 13 ऑक्‍टोबर 1999 रोजी वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा "एनडीए'चे सरकार केंद्रात सत्तेवर आले. 

कटू विमान अपहरण 
डिसेंबर 1999 मध्ये इंडियन एअरलाईन्सचे काठमांडू ते दिल्ली जाणाऱ्या विमानाचे अतिरेक्‍यांनी प्रवाशांसह अपहरण केले, ते तालिबानी राजवट असलेल्या अफगाणिस्तानात नेले. कंदहारला नेलेल्या हे विमान आणि त्यातील प्रवाशांच्या सुटकेसाठी भारत सरकारवर मोठा दबाव आला. मसूद अजहरसह अनेक कडव्या अतिरेक्‍यांना सोडून देण्याची नामुष्की आली. तत्कालीन परराष्ट्रव्यवहार मंत्री जसवंतसिंग वाटाघाटीसाठी कंदहारला गेले. 

विकासाला नवी दिशा 
वाजपेयी यांच्या काळात देशाच्या अर्थकारणाला, विकासाला, औद्योगिकरणाला नवी दिशा देण्याचे प्रयत्न झाले. खासगी उद्योगांना प्रोत्साहन देण्यात आले. परकी गुंतवणुकीला वाव, संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन दिले, सरकारच्या अंगीकृत उद्योगांच्या खासगीकरणाला गती दिली. महामार्गाचे विस्तारीकरण, सक्षमीकरण ही वाजपेयी यांच्या सरकारने देशाला दिलेली मोठी देणगी ठरली. तशी कबुली त्यांच्या विरोधी "यूपीए'नेही एकदा न्यायालयासमोर दिली होती. 

आव्हानांवर मात 
बावीस वर्षांनंतर पहिल्यांदा अमेरिकी अध्यक्ष या नात्याने बिल क्‍लिंटन यांनी पोखरणच्या अणूचाचणीनंतरच्या दोन वर्षांत भारताला भेट दिली. त्याने शितयुद्धोत्तर कालखंडातील भारत आणि अमेरिका संबंधांचा नवा अध्याय सुरू झाला. भविष्यात व्यापार आणि आर्थिक संबंध दृढ होण्यासाठीचा पाया रचला गेला. 

स्वकियांची नाराजी 
वाजपेयी यांनी आघाडीचे राजकारण करत असताना कार्याच्या मर्यादा मान्य केल्या होत्या. त्यामुळे आघाडीत खडखडाट फारसा झाला नाही. तथापि, भाजपचा बौद्धिक पाया असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि विश्‍व हिंदू परिषद यांच्याकडून सातत्याने रामजन्मभूमी, आयोध्येतील राममंदिर, काश्‍मिरला खास दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम 370, समान नागरी कायदा या मुद्दांवर स्वकियांशी मतभेदाला तोंड द्यावे लागले, त्यांचा रोष पत्करावा लागला. ज्येष्ठ नेते बलराज मधोक यांनी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख राजेंद्रसिंह यांना पत्र लिहून जनसंघाची पुनर्उभारणी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. सरकारी उद्योगांच्या खासगीकरणाच्या त्यांच्या निर्णयाने अनेक कामगार संघटना आणि सरकारी कर्मचाऱ्यांनीही संताप व्यक्त केला होता. 

राजधर्माचे पालन करा! 
केंद्रात वाजपेयी यांचे सरकार होते. त्यावेळी गुजरातमध्ये भाजपचेच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर होते. 2002 मध्ये आयोध्येहून कारसेवकांना घेवून येणाऱ्या रेल्वेगाडीवर गुजरातमधील गोध्रा येथे हल्ला झाला. बोगी पेटवण्यात आली. तेथून गुजरातमध्ये हिंसाचाराचे लोण आले. हिंदू विरुद्ध मुस्लिम असा हिंसाचार होता. हिंसेचे थैमान सुरू होते. धगधगत्या गुजरातमधील आग शमण्यास काही दिवस लागले. या गोध्रा दंगलीवेळी वाजपेयी यांनी पंतप्रधान या नात्याने नरेंद्र मोदी यांना "राजधर्माचे पालन करा,' अशी सक्त सूचना केली होती. त्यांच्या कानपिचक्‍या घेतल्या होत्या. वाजपेयी सार्वजनिक जीवनातून निवृत्त झाल्यानंतर दहा वर्षांनी त्यांनीच पुढाकार घेवून स्थापन केलेल्या, त्यांच्यासह अनेकांनी तळागाळापर्यंत बांधणी केलेल्या भारतीय जनता पक्षावर आता नरेंद्र मोदी, अमीत शहा यांचे वर्चस्व आहे. वाजपेयी यांचे काही अनुनायी आणि समर्थक आज पक्षाच्या प्रमुख प्रवाहापासून काहीसे दूर फेकले गेलेले आहेत. 

सार्वजनिक जीवनापासून कोसो दूर 
दिल्लीत भाजपचे 11, अशोका मार्गावर मुख्यालय आहे, ते कार्यकर्ते आणि नेत्यांनी सातत्याने गजबजलेले असते. नेते आणि मंत्र्यांचा तेथे राबता असतो. सध्या भाजप सत्तास्थानी असल्याने आणि अनेक प्रमुख राज्यांत त्यांचे सरकार असल्याने सत्तेचे ते मोठे केंद्र बनले आहे. या सत्तास्थानापासून जेमतेम पाच मिनिटांच्या अंतरावर वाजपेयी यांचे निवासस्थान कृष्ण मेनन मार्गावर आहे. गेली काही वर्षे ते व्हिलचेअरवरूनच घरातल्या घरात वावरायचे. त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्याशी एकनिष्ठ सेवक त्यांची काळजी घेत असतात. तथापि, प्रकृती खालावत गेल्याने पक्षासह कोणत्याही घडामोडींपासून ते तसे दूरच होते. 

मैत्रीचा आगळा अध्याय 
अटलबिहारी वाजपेयी निवृत्तीचे जीवन जगत असताना त्यांच्याशी सहा दशकांहून अधिक मैत्री असलेले एन. एम. घटाटे अगदी आठवड्यातून एकदा का होईना, त्यांना भेटायला यायचे. कधीकधी तर आठवड्यातून दोनदाही यायचे. घटाटे आणि वाजपेयी यांची प्रथम भेट 1950 मध्ये झाली. बाबासाहेब घटाटे हिंदू महासभेचे नेते होते. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या वाजपेयींना आपले छोटे भाऊच मानले होते. शिवाय, लालकृष्ण अडवानी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिलेले बी. सी. खंडुरी हेही नियमीत भेटायला यायचे. डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान होते त्यावेळीही नियमितपणे त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायचे, व्यक्तीगत भेटून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचे. त्यांच्या संबंधाची आठवण सांगताना घटाटे म्हणतात, पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना डॉ. मनमोहनसिंग यांनी अर्थमंत्री या नात्याने अर्थसंकल्प सादर केला. त्यावर वाजपेयींनी टीका केली, ती जिव्हारी लागलेल्या डॉ. सिंग यांनी राव यांच्याकडे राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. त्यावेळी वाजपेयींनी डॉ. सिंग यांना तातडीने संपर्क साधून अशी टिका राजकारणात करावी लागते, ती मनाला लावून घ्यायची नसते, अशा शब्दांत समजूत काढली होती. 

अभ्यासक राजकारणी 
देशात सर्वाधिक सत्ता नेहरू घराण्याने उपभोगली. त्यांनी देशाचे नेतृत्वही केले. सहाजिकच पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते त्यांची कन्या इंदिरा गांधी यांच्यापर्यंत सर्वांना वाजपेयींनी आपल्या टिकेचे लक्ष्य केले, पण ती जिव्हारी लागेल, असभ्य ठरेल, अशी कधीही होऊ दिली नाही. 
- 2004 च्या निवडणुकीत "एनडीए'ला पराभवाचा झटका बसला. "यूपीए'चे सरकार सत्तेवर आले. भाजपमधील अनेक नेत्यांना पराभव चटका लावून गेला. त्यावेळी वाजपेयी यांनी दोन महिन्यांनी चार पानी लेख लिहिला होता आणि त्यात "एनडीए'चा आघाडीचा प्रयोग कसा यशस्वी झाला आणि कॉंग्रेसलाही आघाडीच्या वाटेने कसे जावे लागले, हे त्यात नमूद करताना वाजपेयींनी आघाडीचा प्रयोग कसे सुरूच राहतील, हे नोंदवले होते. त्यातून त्यांच्यातील राजकारणी अभ्यासकाचे दर्शन झाले. 

प्रकृतीत चढउतार आणि अफवांचे पेव 
अटलबिहारी वाजपेयी यांना 6 फेब्रुवारी 2009 रोजी छातीत संसर्ग झाल्याने भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेत (एम्स) दाखल केले होते, प्रकृती खूप ढासळल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यावेळी वयाच्या 84 व्या वर्षीही त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब असा कोणताही त्रास नव्हता, गेली सुमारे 28 वर्षे ते एका मूत्रपिंडावर होते. त्याआधी अनेकदा त्यांच्यावर गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रिया झाल्या होत्या. 2009 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांनी प्रचारासाठी जाहीर सभा घेतल्या नाहीत, तथापि, लखनौमधील भाजपचे उमेदवार लालजी टंडन यांना निवडून देण्याचे आवाहन करणारे पत्र त्यांनी लिहिले होते. त्यावेळी भाजपने 80 पैकी 15 जागा जिंकल्या, टंडनदेखील निवडून आले. त्याचे कारण वाजपेयींचा लखनौच्या मतदारांवर असलेला करिश्‍मा. वाजपेयी यांच्या प्रकृतीबाबत एप्रिल 2018 मध्येही अशाच अफवा उठल्या होत्या. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे, प्रकृतीला कोणताही धोका नाही, असा खुलासा करावा लागला होता. 
- अभय सुपेकर, (सकाळ संशोधन आणि विकास विभाग) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com