सांबा सेक्टरमध्ये पाकच्या गोळीबारात 4 जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जून 2018

पाकिस्तानी रेंजर्सने सांबा सेक्टरमध्ये रामगढ क्षेत्रातील चमिलियाल भागातील बीएसएफच्या चौक्यांवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात तीन ज्युनियर अधिकाऱ्यांसह एक कॉन्स्टेबल हुतात्मा झाले.

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये आज (बुधवार) पहाटे पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) चार जवान हुतात्मा झाले. तर, तीन जवान जखमी आहेत.

बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी रेंजर्सने सांबा सेक्टरमध्ये रामगढ क्षेत्रातील चमिलियाल भागातील बीएसएफच्या चौक्यांवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात तीन ज्युनियर अधिकाऱ्यांसह एक कॉन्स्टेबल हुतात्मा झाले. या अधिकाऱ्यांमध्ये रजनीश कुमार, राम निवास, जतिंदर सिंह आणि कॉन्स्टेबल हंसराज यांचा समावेश आहे. जखमी जवानांना जम्मू शहरातील सतवारी लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

मंगळवारी दहशतवाद्यांनी पुलवामातील न्यायालयाच्या आवारात बंदोबस्तावर असलेल्या पोलसांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा झाले होते. दहशतवादी जवानांच्या बंदुका पळवून नेण्यात यशस्वी झाले होते. पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार करण्यात येत आहे.

Web Title: four BSF jawans killed in Pakistan firing in Jammu and Kashmirs Samba sector