सीबीआयचे अधिकारी असल्याचा बनाव करून चाळीस किलो सोने लुटले

पीटीआय
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

हैदराबाद/ संगारेड्डी - तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील मुथ्थुट फायनान्सच्या कार्यालयात घुसून पाच जणांच्या टोळीने चाळीस किलो सोने आणि एक लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली. लुटारूंच्या टोळीने सीबीआयचे अधिकारी असल्याचा बनाव केल्याने फर्ममधील कर्मचाऱ्यांना त्यांचा संशय आला नाही, असे पोलिसांनी सांगितले.

याबाबत सायबराबाद पोलिस महासंचालक संदीप शांडील्य यांनी माहिती दिली. लुटारूंच्या टोळीतील एकाने स्वत:ची ओळख सीबीआय अधिकारी असल्याची करून देत इतर साथीदारांना त्याचा स्टाफ असल्याचे फर्ममधील लोकांना सांगितले. तसेच फर्ममध्ये अवैध मार्गाने मिळविलेला पैसा वैध केला जात असल्याची माहिती मिळाल्याचा दमही या बनावट सीबीआय अधिकाऱ्याने फर्ममधील कर्मचाऱ्यांना दिला. त्यानंतर तपास करण्याच्या बहाण्याने फर्ममधील चाळीस किलो सोने व एक लाखाची रोकड घेऊन या पाच जणांच्या टोळीने घटनास्थळावरून पोबारा केला.

याबाबत पोलिसांनी फर्ममधील सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांचे विशेष पथक कामाला लावले असल्याची माहिती शांडिल्य यांनी या वेळी दिली. याप्रकरणी आणखी एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीमध्ये लुटारूंनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नुकसान करून सीसीटीव्ही फुटेजची हार्ड डिस्कही चोरून नेल्याची माहिती दिली. तेलंगणा पोलिसांकडून जोरदार तपास मोहीम सुरू आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर वाहनांची तपासणी सुरू असून ठिकठिकाणी गस्त घालण्यात येत असल्याचेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.