हेरगिरी प्रकरणी फरारी एजंटाला अटक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - पाकिस्तानसाठी होत असलेल्या हेरगिरी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी फरारी असलेला तिसरा संशयित शोएब याला राजस्थानात जोधपूर येथे पकडले. दरम्यान, इस्लामाबादमधील भारतीय दूतावासात काम करीत असलेले कल्याण अधिकारी सूरजितसिंग यांना पाकिस्तानने देश सोडून जाण्याचा आदेश काल जारी केला, त्यावर भारताने तीव्र निषेध नोंदविला असून, ही कृती पूर्णतः असमर्थनीय आणि सूडबुद्धीची असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानसाठी होत असलेल्या हेरगिरी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी फरारी असलेला तिसरा संशयित शोएब याला राजस्थानात जोधपूर येथे पकडले. दरम्यान, इस्लामाबादमधील भारतीय दूतावासात काम करीत असलेले कल्याण अधिकारी सूरजितसिंग यांना पाकिस्तानने देश सोडून जाण्याचा आदेश काल जारी केला, त्यावर भारताने तीव्र निषेध नोंदविला असून, ही कृती पूर्णतः असमर्थनीय आणि सूडबुद्धीची असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानच्या येथील दूतावासातील कर्मचारी महमूद अख्तर याला काल सुरक्षाविषयक गोपनीय कागदपत्रे दिली जात असतानाच पकडण्यात आले होते; परंतु राजनैतिक संरक्षणपात्र असल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करणे अशक्‍य होते व त्यामुळेच भारताने त्याला "अस्वीकार्य व्यक्ती' म्हणून जाहीर करून 48 तासांत कुटुंबीयांसह देश सोडून जाण्याचा आदेश जारी केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय दूतावासातील कल्याण विभागाचे अधिकारी सूरजितसिंग यांना 48 तासांत पाकिस्तान सोडून जाण्याचा आदेश जारी केला.

या हेरगिरी प्रकरणात पकडलेल्या दोन भारतीय नागरिकांचा तिसरा साथीदार व जोधपूरचा रहिवासी शोएब याला काल सायंकाळी पकडण्यात आले. त्याला आज दिल्लीत आणण्यात आले. शोएब हा व्हिसा एजंट म्हणून काम करतो. त्या माध्यमातूनच त्याचा महमूद अख्तर याच्याशी संपर्क झाला आणि काही काळाने त्याचे मैत्रीत रूपांतर झाले. त्यातूनच पैशाचे आमिष दाखवून महमूद अख्तर हा शोएब याला काही विशिष्ट माहिती गोळा करण्यास सांगत असे आणि शोएबनेही ते काम करण्यास सुरवात केली होती. शोएबने या कामात आणखी काही व्यक्तींना सामील करून घेतले असावे, असा संशय असून शोएबला बोलता केल्यानंतर याबाबत आणखी माहिती मिळू शकेल आणि या टोळीची व्याप्ती किती आहे तेही लक्षात येईल, असे दिल्ली पोलिसांतर्फे सांगण्यात आले.

पाकिस्तानतर्फे भारतीय वकिलातीमधील अधिकारी सूरजितसिंग यांना देश सोडून जाण्याच्या दिलेल्या आदेशावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना ही निव्वळ सूडबुद्धीने केलेली आणि असमर्थनीय कारवाई असल्याचे सांगितले. भारतीय सुरक्षाव्यवस्थेशी निगडित गोपनीय कागदपत्रे घेतानाच महमूद अख्तर याला पकडण्यात आले होते आणि त्यापेक्षा अधिक सबळ पुरावा असूच शकत नाही व त्यामुळे भारताने त्याच्यावर कारवाई केली. असे असूनही पाकिस्तान मात्र अद्याप नकाराचीच भूमिका घेत आहे हे दुर्दैवी आहे आणि भारतीय अधिकाऱ्याविरुद्धची कारवाईदेखील एकतर्फी व अनावश्‍यक आहे, असेही ते म्हणाले.

सुरक्षाव्यवस्थेत वाढ
पाकिस्तानच्या वाढत्या कारवाया आणि दहशतवादी हल्ल्यांची वाढती शक्‍यता लक्षात घेऊन वरिष्ठ मंत्री, नेते यांची सुरक्षितता वाढविण्यात आली आहे. दिल्लीत सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन सुरक्षाव्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे.

Web Title: Fugitive agent arrested