गौरी लंकेश व कलबुर्गी, दाभोळकर हत्यांमध्ये साम्य

वृत्तसंस्था
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

लंकेश यांची झालेली हत्या हा एका कारस्थानाचा भाग आहे अथवा नाही, याबद्दल आत्ता सांगू शकत नाही. मात्र लंकेश यांच्याबरोबरच कलबुर्गी व नरेंद्र दाभोळकर यांच्या झालेल्या हत्येमध्ये एकच शस्त्र वापरले गेले आहे

बंगळूर - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेचे पडसाद उमटू लागले आहेत. या प्रकरणाची चौकशी थेट पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाद्वारे केली जाईल, अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी केली आहे.

"लंकेश यांची हत्या करणारे हल्लेखोर आम्ही शोधून काढू. या प्रकरणी आम्हाला काही माहिती मिळाली आहे. विशेष पथक नेमून या प्रकरणाचा कसून शोध घेतला जाईल. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिस व केंद्रीय अन्वेषण विभागाचेही (सीबीआय) सहाय्य घेतले जाईल. लंकेश यांची झालेली हत्या हा एका कारस्थानाचा भाग आहे अथवा नाही, याबद्दल आत्ता सांगू शकत नाही. मात्र लंकेश यांच्याबरोबरच कलबुर्गी व नरेंद्र दाभोळकर यांच्या झालेल्या हत्येमध्ये एकच शस्त्र वापरले गेले आहे,'' असे सिद्धारामय्या म्हणाले.

लंकेश यांच्या हत्येसंदर्भात झालेला आत्तापर्यंतचा तपास -

लंकेश यांची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध कर्नाटक पोलिसांकडून युद्धपातळीवर घेण्यात येत आहे. लंकेश यांच्या हत्येच्या पार्श्‍वभूमीवर येथील पोलिस आयुक्त टी सुनील कुमार यांनी सर्व पोलिस उपायुक्तांना शहराची नाकेबंदी करण्याचे निर्देश दिले आहेत. शहरातील सर्व महत्त्वपूर्ण ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले असून बंगळूरमध्ये येणाऱ्या वा जाणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

""हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तीन विशेष पथके तयार करण्यात आली असून शेजारील राज्यांतील पोलिस दलांनाही याबाबतीत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे,'' अशी माहिती पोलिस उपायुक्त एम एन अनुचेत यांनी दिली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लंकेश यांचा त्यांच्या खुन्यांकडून पाठलाग करण्यात येत होता, असा दावा कर्नाटकमधील एका स्थानिक वृत्तवाहिनीकडून करण्यात आला आहे.

कॉंग्रेसकडून टीकास्त्र
""तुम्ही एखाद्या बाबीमध्ये वेगळे मत व्यक्त केले; तर तुमच्यावर क्रूर हल्ला केला जाईल, या देशात प्रस्थापित झालेल्या वास्तवाचे प्रतिबिंब गौरी लंकेश यांची झालेल्या भयप्रद हत्येमधून दिसून आले आहे,'' अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसच्चे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त केली आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही लंकेश यांच्या हत्येवरुन भारतीय जनता पक्ष (भाजप) व राष्ट्रीय स्वयंसेवक संघास लक्ष्य केले आहे.

लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून निषेध
लंकेश यांच्या हत्येचा देशभरातील विविध स्तरांमधून संतप्त निषेध नोंदविण्यात आला आहे. विशेषत: माध्यम व मानवाधिकार क्षेत्रांमधील विविध संघटनांनी लंकेश यांच्या हत्येसंदर्भात संताप व्यक्त केला आहे. लंकेश यांची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांस त्वरित पकडण्यात यावे, अशी मागणीही या संघटनांकडून करण्यात आली आहे.

निषेध येथे आयोजित होणार
बंगळूर - नाईक भवन
धारवाड - डॉ. कलबुर्गी यांचे निवासस्थान (कल्याण नगर)
गदग - थोंडादार्या मठ
गुलबर्गा - मिनी विधान सौध
हुबळी - प्रेस क्‍लब
मंगळूर - इंडिया ज्योती सर्कल, टाऊन हॉल, पोलिस उपायुक्त कार्यालय
उडुपी - क्‍लॉक टॉवर

इतर राज्ये
अहमदाबाद - सरदारबाग, लाल दरवाजा
चंडीगड - प्रेस क्‍लब
चेन्नई- प्रेस क्‍ल्ब
दिल्ली - प्रेस क्‍लब
गोरखपूर - पंत पार्क
हैदराबाद - सुंदरय्या विज्ञान केंद्र
लखनौ - गांधी पुतळा, हझरतगंज
मुंबई - ऍम्फी थिएटर, वांद्रे
पुणे - एस पी महाविद्यालय
थिरुअनंतरपूरम - उच्च न्यायालय जंक्‍शन

अशी घडविण्यात आली हत्या 

लंकेश यांच्या घरी राजराजेश्वरी नगर येथे हा प्रकार घडला. आतापर्यंतच्या माहितीनुसार, लंकेश यांच्यावर मारेकऱयांनी जवळून तीन गोळ्या झाडल्या. त्या जागीच कोसळल्या. मारेकरी एकापेक्षा अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

बंगळूर पोलिस आयुक्तालयाने या घटनेबद्दल प्राथमिक माहिती दिली असून वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. 

गौरी लंकेश या उजव्या विचारसरणीच्या कट्टर विरोधक म्हणून प्रसिद्ध होत्या. लंकेश पत्रिके या साप्ताहिकाच्या त्या संपादक होत्या. शिवाय, अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होत असे. टीव्ही वाहिन्यांवरील चर्चेत त्यांचा हिरीरीने सहभाग असे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या
कलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत 
मंत्रिमंडळ विस्तार व खातेपालट - अन्वयार्थ 
बीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू
नाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप
बाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर
रस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी
माहितीच्या सुरक्षेला कुठे आहे 'आधार'? 
'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले 
नागरिक बनले पोलिस अधिकारी