फैजाबादमध्ये 22 मुस्लिम नागरिकांची घरवापसी

वृत्तसंस्था
सोमवार, 22 मे 2017

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) कार्यकर्ते कैलाश चंद्र श्रीवास्तव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सर्व नागरिकांचे त्यांच्या इच्छेने धर्मांतर करण्यात आल्याचे, श्रीवास्तव यांनी सांगितले.

लखनौ - उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे रविवारी 22 मुस्लिम नागरिकांची पुन्हा हिंदू धर्मामध्ये घरवापसी करण्यात आली. यामध्ये महिला व लहान मुलांचाही समावेश होता.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, फैजाबादमधील आंबेडकर नगर भागातील 22 मुस्लिम नागरिकांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. या सर्व नागरिकांच्या कुटुंबीयांनी 25 वर्षांपूर्वी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. त्यामुळे आता त्यांच्या इच्छेने त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. फैजाबादमधील आर्यसमाद मंदिरात घरवापसीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाबाबत गुप्तता पाळण्यात आली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) कार्यकर्ते कैलाश चंद्र श्रीवास्तव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सर्व नागरिकांचे त्यांच्या इच्छेने धर्मांतर करण्यात आल्याचे, श्रीवास्तव यांनी सांगितले. विरोधी पक्षांकडून सरकारवर बळजबरी धर्मांतर करण्यात येत असल्याचा कारणावरून टीका करण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा घरवापसीचे प्रकरण समोर आले आहे.