मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे भवितव्य उद्या ठरणार

manohar parrikar
manohar parrikar

पणजी (गोवा): मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या विधानसभा पोट निवडणुकीत उद्या (ता. 23) मतदान होणार आहे. पणजी व वाळपई मतदारसंघातून अनुक्रमे पर्रीकर व राणे निवडणूक लढवत आहेत. दोन्ही मतदारसंघात तुल्यबळ लढती असून पणजीतून काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर यांनी पर्रीकर यांच्यासमोर आव्हान उभे केले असून, वाळपईत माजी मुख्यमंत्री व आमदार रवी नाईक यांचे पूत्र रॉय हे राणेंविरोधात निवडणूक लढवत आहेत. पणजीत गोवा सुरक्षा मंच या नव्या राजकीय पक्षाचे अध्यश्र आनंद शिरोडकर हे तिसरे उमेदवार असून त्यांना भारतीय भाषा सुरक्षा मंच व शिवसेनेने पाठींबा दिला आहे.

विधानसभेच्या मागील निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे भाजपने सरकार स्थापन करून पर्रीकर यांना मुख्यमंत्री केल्यास पाठींबा देण्याचा प्रस्ताव गोवा फॉरवर्ड व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडून (मगो) देण्यात आला होता. त्यावेळी पर्रीकर संरक्षणमंत्रीपदी होते. अखेर सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा देत मुख्यमंत्रीपद स्वीकारले होते. सहा महिन्यात त्यांना विधानसभेचे सदस्य होणे बंधनकारक असल्याने पणजीतून तेव्हा निवडून आलेले सिद्धार्थ कुंकळकर या भाजपच्या आमदाराने राजीनामा दिला होता. राणे यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक जिंकूनही भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात निवडणूक होत आहे.

पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार काल संपुष्टात आला. दोन्ही मतदारसंघात मिळून 51 हजार मतदार 7 उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. आज पणजीतील शासकीय तंत्रनिकेतन आणि वाळपईतील मामलेदारा कार्यालयातून मतदान केंद्रनिहाय कर्मचारी रवाना झाले. सायंकाळपर्यंत मतदान केंद्रांवर स्थानिक अधिकाऱ्यांनी सर्व व्यवस्था केली होती. उद्या (ता.23) सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार असून 28 ऑगस्टला सकाळी 8 वाजल्यापासून पणजीत मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.

पणजी मतदारसंघात एकूण चार उमेदवार असले तरी प्रत्यक्ष निवडणूक दुरंगी अर्थात भाजपचे उमेदवार मनोहर पर्रीकर आणि काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांच्यात होणार आहे. वाळपईतही एकूण 3 उमेदवार असले तरी भाजपचे उमेदवार आरोग्यमंत्री विश्वजित राणे व काँग्रेसचे उमेदवार रॉय नाईक यांच्यात सामना रंगणार आहे असे दिसते.

पणजी मतदारसंघासाठी एकूण 30 मतदानकेंद्रांची स्थापना करण्यात आली असून वाळपईकरिता 46 मतदानकेंद्रे आहेत. पणजीत एकूण 22196 मतदार असून त्यात पुरुष 10640 तर 11556 महिला मतदारांचा समावेश आहे. वाळपईत एकूण 28868 मतदार असून त्यात पुरुष 14340 तर महिला 14528 यांचा अंतर्भाव आहे. दोन्ही मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुषापेक्षा जास्त असून पणजीत हे प्रमाण 900 च्या आसपास आहे. वाळपईत 150 महिला मतदार अधिक आहेत.

निवडणुकीनिमित्ताने सोमवारी सायंकाळपासून कोरडे दिवस सुरू झाले असून ते मतदान होईपर्यंत चालू राहणार आहेत. पणजी व वाळपई पोटनिवडणुकीसाठी बुधवार 23 ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पणजी शहरातील काही चतुर्थीसाठी आजचमं आपल्या मूळ घरी गेले. त्याचा परिणाम उद्याच्या मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्‍यता आहे. कारण पणजीतील अनेक मतदार चतुर्थीची तयारी करण्यासाठी मूळ घरी जातात. वाळपईमध्ये मात्र तशी शक्‍यता दिसून येत नाही.

अनेक ठिकाणी मतदानकेंदाची तयारी पूर्ण झाली आहे. दुपारी निवडणूक अधिकारी मतदानयंत्र व इतर सामुग्री घेऊन मतदानकेंद्रावर पोचलेही आहेत. मतदान केंद्रात मतदारांसाठी बसण्याची, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून मतदान करण्याकरिता मतदान यादीत नाव असणे व ओळखपत्र सादर करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी निवडणूक ओळखपत्र, मतदारस्लीप किंवा इतर ओळखीचा पुरावा द्यावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com