वसईच्या पर्यटकांवर हल्ला प्रकरणातील आरोपींना सहा दिवसांची कोठडी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

स्थानिक गुंडांनी पर्यटकांवर केलेल्या सशस्र हल्ल्याची गंभीर दखल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतली.

पणजी - वसई येथील पर्यटकांवर हल्ला केल्याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी काल (ता. 14) अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

चौथा आरोपी फरारी असून, त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, स्थानिक गुंडांनी पर्यटकांवर केलेल्या सशस्र हल्ल्याची गंभीर दखल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतली असून, राज्यातील गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांची तपशिलवार यादीही देण्याचा आदेश पोलिस महासंचालकांना दिला आहे.

पर्यटकांवर स्थानिकांकडून झालेल्या हल्ल्याची घटना निषेधार्ह असून, गोव्यासारख्या पर्यटनाभिमुख राज्यासाठी अशा घटना शोभणाऱ्या नाहीत, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी म्हटले आहे.