गोव्यात पर्यावरणपूरक उद्योगांसाठी खास प्रयत्न - सुरेश प्रभू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

प्रभू यांनी आज सायंकाळी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेतली.

पणजी ( गोवा ) : वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामार्फत गोव्यात उद्योगांमध्ये गुंतवणूक यावी यासाठी फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय उद्योग मेळा आयोजीत केला जाणार असून पर्यावरण पूरक उद्योग गोव्यात यावेत यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी पणजी येथे दिली.

स्व. सावळो केणी स्मृती दीनानिमित्त कला अकादमीमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना प्रभू यांनी ही माहिती दिली. प्रभू यांनी रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेतली.

गोव्यात माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक सारखे पर्यावरण पूरक उद्योग गोव्यात यावेत यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यासाठी फेब्रुवारीमध्ये उद्योग मेळा आयोजित करून गुंतवणूकदारांना गोव्यात आकर्षित केले जाणार असल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले.