तरीही गोव्यात भाजपचे सरकार? रात्रीस खेळ चाले...

अवित बगळे
रविवार, 12 मार्च 2017

विधानसभा निवडणुकीत एकूण ४० पैकी कॉंग्रेसला १७, भाजपला १३, मगोला ३, गोवा फॉरवर्डला ३, राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसला १ जागा मिळाल्या आहेत तर तीन अपक्ष निवडून आलेले आहेत.

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत भले भाजपच्या वाट्याला १३ जागा जरी आल्या तरी सरकार स्थापनेची तयारी भाजपने चालविली आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून १७ जागा मिळवणाऱ्या कॉंग्रेसला सत्ता स्थापनेसाठी पाचारण करणे राज्यपालांना बंधनकारक असले तरी कॉंग्रेसला २१ जागांचा आकडा गाठणे शक्य होणार नाही असे रात्रभरात झालेल्या राजकीय घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे.

विधानसभा निवडणुकीत एकूण ४० पैकी कॉंग्रेसला १७, भाजपला १३, मगोला ३, गोवा फॉरवर्डला ३, राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसला १ जागा मिळाल्या आहेत तर तीन अपक्ष निवडून आलेले आहेत. पैकी एका अपक्षाला भाजपने तर एका अपक्षाला कॉंग्रेसने निवडणूकपूर्व पाठिंबा दिला होता. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याचे स्पष्ट झाल्यावर काल रात्री निवडणूक प्रभारी तथा केंद्रीय जहाजोद्योग मंत्री नितीन गडकरी तातडीने गोव्यात दाखल झाले आणि त्यांनी २१ हा बहुमताचा आकडा गाठण्याची तयारी केली आहे. अर्थात त्याआधीच संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यासंदर्भातील बोलणी सुरू केली होती.
कॉंग्रेसच्या विधीमंडळ गटाची बैठक आज नेता निवडीसाठी होणार आहे. त्यासाठी कॉंग्रेसचे राज्यप्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजयसिंह व सचिव डॉ. चेल्लाकुमार हे काल गोव्यात आले आहेत.

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनाच मुख्यमंत्रीपद द्यावयाच अशी अट कॉंग्रेसने पाठिंबा गृहित धरलेल्या गोवा फॉरवर्डकडून पुढे करण्यात आली आहे. गोवा फॉरवर्ड व कॉंग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी होऊ न देणारे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो हे निवडून आले असले तरी त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू नये यासाठी गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई कार्यरत राहणार हे स्पष्ट आहे. त्यातच यावेळी विधानसभा सदस्यत्वाचा सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या प्रतापसिंह राणे यांनाच मुख्यमंत्रीपद द्यावे यासाठी वाळपईतून निवडून आलेले त्यांचे पूत्र विश्वजित राणे यांचे प्रयत्न आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना काही आमदारांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेआधीच कॉंग्रेसमध्ये नेतृत्वावरून मारामारी सुरू झालेली आहे.

या फाटाफुटीचा फायदा भाजप घेण्याच्या विचारात आहे. कॉंग्रेस बहुमत सिद्ध करू शकणार नाही अशी व्यवस्था करून नंतर भाजपला सत्ता स्थापनेसाठी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी बोलवावे अशी ही राजकीय खेळी आहे. एरव्ही रविवारी गोव्यातले जीवन शांत संथ असते मात्र राजकीय घडामोडींमुळे त्यात थोडी धुगधुगी आली आहे.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले, कॉंग्रेसला या निवडणुकीत २८ टक्के मतदान झाले आहे. भाजपला ३५ टक्के मते मिळाली आहेत. स्थानिक कारणास्तव काही उमेदवारांचा पराभव झाला असला तरी भाजपला जनतेने साथ दिल्याचे दिसते. म्हणूनच आम्हाला सरकार स्थापनेचा पूर्ण अधिकार आहे. काही पक्ष व अपक्षांनीही आम्हाला पाठिंबा दिला आहे.

Web Title: goa politics takes turns overnight