राणे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

अवित बगळे
गुरुवार, 6 एप्रिल 2017

पणजी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांचे पूत्र माजी आमदार विश्‍वजित राणे यांनी आज मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी गेली आठवडाभर चर्चा होती.

पणजी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांचे पूत्र माजी आमदार विश्‍वजित राणे यांनी आज मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी गेली आठवडाभर चर्चा होती.

त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सत्तरी तालुका भाजपमय करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रतापसिंह राणे हेही भाजपमध्ये येतील की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण सत्तरीत दोन विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी वाळपई मतदारसंघातून विश्‍वजित यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून पर्ये या दुसऱ्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व त्यांचे वडील प्रतापसिंह करतात. तालुका भाजपमय करण्यासाठी या दोन्ही मतदारसंघात भाजपचेच आमदार हवेत. वाळपईतून भाजपच्या उमेदवारीवर विश्‍वजित विधानसभेची पोट निवडणूक लढतील मात्र पर्ये मतदारसंघ प्रतापसिंह राणे असताना भाजपमय कसा होईल याचे कुतूहल सर्वांना आहे.

राज्यसभेच्या जुलैमध्ये होणाऱ्या निवडणुकीत प्रतापसिंह राणे यांना भाजपकडून संधी देऊन पर्येतून विश्‍वजित यांच्या पत्नी डॉ. दिव्या यांना विधानसभा उमेदवारीची संधी दिली जाऊ शकते. मात्र प्रतापसिंह यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असे स्पष्ट केल्याने विश्‍वजित सत्तरी तालुका भाजपमय कसा करतील हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरले आहे.

विश्‍वजित हे आरोग्यमंत्री असताना त्यांच्या अनेक निर्णयांना पर्रीकर यांनी कडाडून विरोध केला होता. त्याबाबत पर्रीकर यांना विश्‍वजित यांच्या भाजप प्रवेशावेळी विचारले असता ते म्हणाले, धोरण आणि निर्णयाला विरोध होता, व्यक्तीला नव्हता. आताही भाजपचेच निर्णय आणि धोरण विश्‍वजित यांना पुढे न्यावे लागेल.

दरम्यान, प्रतापसिंह राणे यांचा आशिर्वाद भाजप प्रवेशासाठी आहे का असे विश्‍वजित यांना विचारले असता ते म्हणाले, काल मी त्यांचा आशिर्वाद घेतला. ते काँग्रेसचे नेते असले तरी माझे वडील आहेत. वडील या नात्याने प्रत्येक गोष्टीत त्यांचा आशिर्वाद मी घेतो तसा याबाबतीतही घेतला आहे. मी आज भाजप प्रवेश करणार याची कालच त्यांना कल्पनाही दिली आहे. ते भाजपमध्ये येतील का या प्रश्‍नाचे उत्तर मात्र तेच देऊ शकतील.

Web Title: Goa: pratapsingh rane join bjp