गोवा ठरेल हवाई मालवाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र : सुरेश प्रभू

File photo of Suresh Prabhu
File photo of Suresh Prabhu

वास्को (गोवा) : केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी संस्थांच्या मदतीने गोव्याला पर्यटनासोबतच हवाई मालवाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र बनण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.

दाबोळी विमानतळाच्या नूतनीकरणाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक, कृषीमंत्री विजय सरदेसाई, परिवहन मंत्री सुदीन ढवळीकर, महसूलमंत्री रोहन खवंटे यांची उपस्थिती होती.

सप्टेंबर 2020 मध्ये मोपा विमानतळ कार्यरत होईल. मोप विमानतळ कार्यरत झाल्यानंतरही दाबोळी विमानतळ पूर्वीप्रमाणेच कार्यरत असेल, असे सुरेश प्रभू यांनी यावेळी बोलताना सांगितले. दाबोळी विमानतळाचे सध्या नूतनीकरण सुरू आहे.

बहुमजली पार्किंगची व्यवस्था जुलैपासून कार्यरत होईल, असे ते म्हणाले. दोन विमानतळ झाल्यानंतर मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक दोन्ही उद्दिष्ट साध्य करता येणार आहेत. त्यामुळे गोव्याला पर्यटनाबरोबरच हवाई मालवाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांचा विकास साधता यावा यासाठी गोवा पर्यटन विभागाला टॅक्सी संचालनासाठी एक दालन आणि स्थानिक वस्तू, भाजीपाला विक्रीसाठी राज्य सरकारला विमानतळावर एक दालन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

कौशल्य विकास आणि स्टँडअप इंडिया या योजनांच्या माध्यमातून गोव्यात लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. सिंगापूर एअरलाईन्स, लुफ्थान्सा एअरलाईन्स यासारख्या मोठ्या हवाई कंपन्यांसोबत गोव्यात प्रकल्पासाठी बोलणी सुरु आहे, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com