गोरखपूर बालमृत्युकांडप्रकरणी डॉ. काफील खानला अटक

वृत्तसंस्था
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

गोरखपूरमधील बालमृत्युकांडप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये रुग्णालयास ऑक्‍सिजनचा पुरवठा करणाऱ्या 'पुष्पा सेल्स' या कंपनीच्या प्रवर्तकांच्या नावाचाही समावेश असून, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव अनिता भटनागर जैन यांचीही तातडीने बदली करण्यात आली होती.

लखनौ : गोरखपूर येथील बाबा राघव दास (बीआरडी) वैद्यकीय महाविद्यालयातील बालमृत्युकांडप्रकरणी डॉक्टर काफील खानला आज (शनिवार) अटक करण्यात आली आहे. या महाविद्यालयाच्या रुग्णालयात 60 बालकांचा मृत्यू झाला होता. 

विद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. राजीव मिश्रा आणि त्यांची पत्नी पूर्णिमा शुक्‍ला यांना कानपूर येथून विशेष तपास पथकाने मंगळवारी अटक केली होती. त्यानंतर आता विशेष पथकाने रुग्णालयातील मेंदूज्वर विभागाचे माजी प्रमुख डॉ. काफील खान यांनाही अटक केली आहे. रुग्णालयात पाच दिवसांत 60 बालकांचा मृत्यू झाल्यानंतर मिश्रा यांना 12 ऑगस्टला प्राचार्य पदावरून निलंबित करण्यात आले होते. 

गोरखपूरमधील बालमृत्युकांडप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये रुग्णालयास ऑक्‍सिजनचा पुरवठा करणाऱ्या 'पुष्पा सेल्स' या कंपनीच्या प्रवर्तकांच्या नावाचाही समावेश असून, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव अनिता भटनागर जैन यांचीही तातडीने बदली करण्यात आली होती. माजी प्राचार्य डॉ. राजीव मिश्रा आणि त्यांची पत्नी डॉ. पूर्निमा मिश्रा, डॉ. काफील खान यांचा 'एफआयआर'मध्ये समावेश होता. डॉ. खान हे 11 ऑगस्टपासून रजेवर गेले होते. बीआरडी रुग्णालयात यावर्षी 1304 बालकांचा मृत्यू झालेला आहे.