दोषींना सोडणार नाही; योगी आदित्यनाथ भावूक

वृत्तसंस्था
रविवार, 13 ऑगस्ट 2017

या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. इन्सेफेलाइट्सविरोधात रस्त्यापासून संसदेपर्यंत लढाई सुरु आहे. मृत मुलांवरून राजकारण करणे चुकीचे आहे.

गोरखपूर - ऑक्‍सिजन पुरवठ्याअभावी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयामधील बालकांच्या मृत्यूप्रकरणी दोषींना सोडणार नाही. तसेच या प्रकरणात सरकारकडून कडक पावले उचलले जातील असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. या प्रकरणानंतर माझ्याएवढे कोणी दुःखी झाले नसेल असे सांगत ते भावूक झाले.

गोरखपूर येथील रुग्णालयात मागील पाच दिवसांत 60 हून अधिक बालकांचा मृत्यू झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकार खडबडून जागे झाले आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणा आणि राज्य सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बाबा राघव दास रुग्णालयास अक्षरशः स्मशानभूमीचे रूप आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. आज (रविवार) त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासह रुग्णालयाची तपासणी केली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दोषींना सोडणार नसल्याचे सांगितले. देशभरात गोरखपूरमधील बालकांच्या मृत्यू प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत.

योगी आदित्यनाथ म्हणाले, की या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. इन्सेफेलाइट्सविरोधात रस्त्यापासून संसदेपर्यंत लढाई सुरु आहे. मृत मुलांवरून राजकारण करणे चुकीचे आहे. सरकारकडून रुग्णालयाला सुविधा पुरविण्यात कोणतीही चूक करण्यात आली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेवर सतत लक्ष ठेवून आहेत.