गौरी लंकेश हत्या प्रकरणः जालन्यातील पांगरकर एसआयटीच्या ताब्यात

गौरी लंकेश हत्या प्रकरणः जालन्यातील पांगरकर एसआयटीच्या ताब्यात

बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीने महाराष्ट्रातील जालना येथून संशयित श्रीकांत पांगरकर याला ताब्यात घेतले. तो शिवसेनेचा माजी नगरसेवक आहे. १२ दिवसांसाठी त्याला ताब्यात घेतले असून लंकेश हत्येप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार आहे. अटकेतील चौदा जणांमध्ये बेळगावच्या भरत कुरणेचाही समावेश आहे. त्याला नुकतेच महाराष्ट्र दहशतवाद विरोध पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पांगरकरला २८ सप्टेंबरपर्यंत एसआयटीची कोठडी देण्यात आली आहे. यामुळे गौरी लंकेश हत्या प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्‍शन पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने नालासोपारा येथून शस्त्रास्त्र साठा जप्त केला होता. या प्रकरणात पांगरकरला अटक करण्यात आली होती. गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमोल काळे याच्या डायरीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पांगरकरला अटक करण्यात आली होती.

काळेच्या डायरीत पांगारकरचा उल्लेख ‘प्राजी’ असा आहे. काळे याला नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणीही सीबीआयने अटक केली आहे. पण त्याच्या डायरीतील नोंदींमुळे पांगरकरपर्यंत पोहोचणे शक्‍य झाले आहे. एसआयटीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी महाराष्ट्रात तसेच बेळगावात बैठका झाल्या होत्या. त्यातील काही बैठकांना पांगरकरने हजेरी लावली होती. पण गौरी लंकेश हत्या प्रकरणात पांगरकरची नेमकी कोणती भूमिका होती हे आता एसआयटीच्या चौकशीतूनच बाहेर येणार आहे.

बाराशे फोन कॉल्स
५ सप्टेंबर २०१७ रोजी गौरी लंकेश यांची बंगळूर येथे हत्या झाली. या हत्येच्या आधी व नंतरही पांगरकर हा नियमितपणे अमोल काळेच्या संपर्कात होता. जुलै २०१७ ते मे २०१८ या काळातील अमोल काळेचे ‘कॉल डिटेल्स’ एसआयटीने मिळविले आहेत. त्यानुसार पांगरकर व काळे यांच्यात १० महिन्यात तब्बल १२०० फोन कॉल झाले आहेत. रोज सरासरी चारवेळा या दोघांचे एकमेकांशी बोलणे झाले आहे. यामुळेच पांगरकर याचा गौरी लंकेश हत्येत सहभाग असल्याचा संशय एसआयटीला आहे. पांगरकर हा शिवसेनेकडून जालना महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेला होता. नालासोपारा येथील शस्त्रसाठा प्रकरणापासून त्याचे नाव चर्चेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com