जवान चंदू चव्हाणला सोडविण्यासाठी जोरदार प्रयत्न

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

चंदूला पाकिस्तान तावडीतून मुक्त करण्यासाठी सरकारकडून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. लवकरच चंदूला मायदेशी परत आणण्यात येईल. चंदूच्या नातेवाइकांनी संयम बाळगावा व सरकारवर विश्वास ठेवावा.

धुळे - सीमेवर गस्त घालत असताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेला भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण याला पाकिस्तानच्या तावडीतून सोडविण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी चंदूच्या कुटुंबीयांसह परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेत जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

बोरविहीर (ता. धुळे) येथील चंदू चव्हाण हा डॉ. सुभाष भामरे यांचा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदार संघातील रहिवासी असून तो जेथे असेल तेथे सुखरूप असावा व लवकरच मायदेशी परत यावा यासाठी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे. डॉ. भामरे या विषयाबाबत अतिशय गंभीर असून, ते सतत चंदूचे नातेवाईक तसेच दिल्ली येथील संरक्षण व परराष्ट्र मंत्रालय यांच्याशी संपर्कात आहेत. परराष्ट्रा मंत्रालयाच्या माध्यमातून कुटनीतीचा अवलंब करून चंदूला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

डॉ. भामरे यांनी चंदूच्या धुळे येथील नातेवाईकांना दिल्ली येथे पाचारण केले. त्यांची सुषमा स्वराज यांची भेट घालून दिली. चंदूचा भाऊ भूषण चव्हाण, आजोबा तसेच इतर नातेवाईक यांना डॉ. भामरे व स्वराज यांनी याप्रसंगी सांगितले, की चंदूला पाकिस्तान तावडीतून मुक्त करण्यासाठी सरकारकडून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. लवकरच चंदूला मायदेशी परत आणण्यात येईल. चंदूच्या नातेवाइकांनी संयम बाळगावा व सरकारवर विश्वास ठेवावा.