भाजपचा गोवा, मणिपूरमधील प्रकार घटनाबाह्य : काँग्रेस

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मार्च 2017

गोवा आणि मणिपूरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे राज्यपालांच्या निर्णयावर परिणाम होत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. हा सर्व प्रकार घटनाबाह्य असल्याची टीकाही काँग्रेसने केली आहे.

नवी दिल्ली - गोवा आणि मणिपूरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या  सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे राज्यपालांच्या निर्णयावर परिणाम होत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. हा सर्व प्रकार घटनाबाह्य असल्याची टीकाही काँग्रेसने केली आहे.

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बहुमत मिळविणाऱ्या भारतीय जनता पक्षाला गोवा आणि मणिपूरमध्ये बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचता आले नाही. मात्र, तरीही इतर पक्षांच्या आमदारांना सोबत घेऊन गोवा आणि मणिपूरमध्ये भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले, "राज्यपालांनी घेतलेले निर्णय हे केंद्राच्या प्रभावाखाली घेतले असल्याचे राज्यपालांनीच स्पष्ट केले आहे. हा प्रकार संपूर्णपणे घटनाबाह्य आहे. गोवा आणि मणिपूरमधील जनतेने काँग्रेसच्या बाजूने दिलेल्या कलाचा हा अपमान आहे.' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारची संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारशी तुलना करताना दीक्षित यांनी पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये घुसून भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानसोबतचे भारताचे आंतरराष्ट्रीय धोरणात स्पष्टता नसल्याची टीका केली. "आपले सैनिक प्राण गमवत आहेत, मंत्री नाही', असेही त्यांनी पुढे सांगितले.

गोव्यामध्ये भाजपला 13 जागा मिळाल्या आहेत. सर्वाधिक 17 जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. तर इतर पक्षांकडे 10 जागा गेल्या आहेत. मणिपूरमध्येही भाजपला 21, काँग्रेसला 28 तर इतर पक्षांना 10 जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही राज्यात इतर पक्षांना सोबत घेऊन भाजप सरकार स्थापन करणार आहे.

 

Web Title: Governors of Goa, Manipur acting like 'agents' of BJP : Congress