दिल्लीत उद्यापासून राज्यपालांचे संमेलन 

वृत्तसंस्था
रविवार, 3 जून 2018

सर्व राज्यांचे राज्यपाल आणि नायब राज्यपालांचे दोन दिवसांचे संमेलन चार आणि पाच जूनला दिल्लीत होणार आहे. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद असतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या संमेलनात भाषण करणार आहेत.

नवी दिल्ली - सर्व राज्यांचे राज्यपाल आणि नायब राज्यपालांचे दोन दिवसांचे संमेलन चार आणि पाच जूनला दिल्लीत होणार आहे. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद असतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या संमेलनात भाषण करणार आहेत. 

पहिले राज्यपाल संमेलन 1949 मध्ये तत्कालिन गव्हर्नर जनरल सी. राजगोपालचारी यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. 

यंदा होणारे संमेलन हे राज्यपालांचे 49 वे आणि विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील दुसरे संमेलन असेल. दोन दिवस चालणाऱ्या संमेलनात वेगवेगळ्या सत्रांत अंतर्गत सुरक्षा, रोजगार, उच्चशिक्षण, कौशल्य विकास यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर विचारविनिमय होणार आहे. संमेलनात उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, कौशल्य विकास राज्यमंत्री, नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि वेगवेगळ्या मंत्रालयांचे अधिकारीही सहभागी होतील. 

राष्ट्रपतींच्या उद्‌घाटनाने चार जूनला पहिल्या सत्रास सुरवात होईल, तर दुसऱ्या सत्रात नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, तसेच राष्ट्रीय सुरक्षा सलगार अजित दोवाल या संमेलनात सादरीकरण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही भाषण करतील. उच्च शिक्षण संकल्पना आणि रोजगारवृद्धीसाठीच्या कौशल्य विकासासंदर्भातील तिसऱ्या सत्राचे संयोजक गुजरातचे राज्यपाल असतील. चौथ्या सत्रात "राज्यपाल-विकासाचे राजदूत, समाजातील बदलाचे घटक या नात्याने राज्यपालांची भूमिका' या अहवालातील शिफारशींवरही चर्चा होणार आहे. 

पाच जूनला होणाऱ्या पाचव्या सत्रात महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंती सोहळ्याबद्दल त्याचप्रमाणे ग्रामस्वराज अभियान आणि स्वच्छता याबाबतही विचारमंथन होईल. समारोपाच्या सहाव्या सत्रामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्र्यांचे भाषण होईल. एका विशेष सत्रात केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक असलेल्या नायब राज्यपाल प्रमुख योजनांच्या अंमलबजावणीबद्दल चर्चा करतील.

Web Title: Governor's metting from tomorrow in delhi