उपमुख्यमंत्र्याच्या मद्यधुंद मुलाची विमानतळ कर्मचाऱ्यांशी हुज्जत

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

जयमीन पटेल आज त्यांच्या कुटुंबासह फिरायला जाण्यासाठी येथील विमानतळावर दाखल झाले होते. कतार एअरलाइन्सच्या विमानाने ते परदेशात जाणार होते. तत्पूर्वी त्यांनी यथेच्छ मद्यपान केले होते. मद्यपानामुळे त्यांना नीट चालता येत नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात अल्यावर त्यांनी जयमीन यांना रोखले

अहमदाबाद - मद्यधुंद अवस्थेत विमानतळावर दाखल झालेल्या उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या सुपुत्रास विमान प्रवास नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी येथील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्याचा प्रकार आज घडला.

जयमीन पटेल आज त्यांच्या कुटुंबासह फिरायला जाण्यासाठी येथील विमानतळावर दाखल झाले होते. कतार एअरलाइन्सच्या विमानाने ते परदेशात जाणार होते. तत्पूर्वी त्यांनी यथेच्छ मद्यपान केले होते. मद्यपानामुळे त्यांना नीट चालता येत नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात अल्यावर त्यांनी जयमीन यांना रोखले.

विमान प्रवास करण्यास अटकाव केल्यानंतर जयमीन यांनी येथील कर्मचाऱ्यांबरोबर वाद घातला. त्यानंतर जयमीन यांना तपासणीसाठी व्हिलचेअरवरून नेण्यात आल्याची माहिती विमानतळावरील अधिकाऱ्याने दिली आहे.

बदनामी करण्याचा प्रकार
आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी विरोधकांनी हे कृत्य केल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी केला आहे. जयमीन याची प्रकृती ठीक नसल्याने त्याच्या पत्नीने घरी फोन करून सांगितले. त्यानंतर त्यांनी आपला नियोजित दौरा रद्द केला, अशी माहिती पटेल यांनी दिली.