गुजरात, हिमाचल प्रदेशात आज मतमोजणी 

Rahul Gandhi, Narendra Modi
Rahul Gandhi, Narendra Modi

नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई ठरलेली आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची "लिटमस टेस्ट' म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (ता.18) लागणार असल्याने "गल्ली ते दिल्ली' सर्वांचीच धाकधूक वाढली आहे. मतदानोत्तर चाचण्यांचा कौल हा भाजपच्या बाजूने असला, तरीसुद्धा दोन्ही पक्षांकडून विजयाचे दावे- प्रतिदावे केले जात असल्याने या निकालाची उत्कंठा शिगेला पोचली आहे. 

गुजरातमध्ये सत्ताधारी भाजप विजयी षट्‌कार ठोकणार, की मागील दोन दशकांपासून विरोधी बाकांवर बसलेला कॉंग्रेस पक्ष सत्ताधारी होणार, हे उद्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. हिमाचल प्रदेशचा मागील 24 वर्षांचा राजकीय इतिहास अभ्यासला असता येथे कॉंग्रेस आणि भाजप आलटून पालटून सत्ताधीश झाल्याचे दिसते. यावेळेस जनता जनार्दन आपला कौल भाजपच्या बाजूने देते, की पुन्हा कॉंग्रेसला सत्ताधीश बनविते, हे निकालानंतरच समजू शकेल. 

गुजरातचे तप्त रण 
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या वादळी सभांमुळे गुजरातमधील राजकारण चांगलेच तापले होते. उभय नेत्यांनी परस्परांवर केलेले आरोप- प्रत्यारोप राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरले होते. पाटीदार नेता हार्दिक पटेल, "ओबीसीं'चे नेतृत्व अल्पेश ठाकोर आणि दलित चेहरा जिग्नेश मेवानी हे तरुणतुर्क भाजपविरोधात एकत्र आल्याने येथील चुरस आणखीनच वाढली आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी पुन्हा एकदा इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील कथित हेराफेरीचा मुद्दा लावून धरला असून, याची आयोगाने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

बंदोबस्तात मतमोजणी 
हिमाचल प्रदेशात यंदा 75.28 टक्के एवढ्या रेकॉर्डब्रेक मतदानाची नोंद झाल्याने राजकीय विश्‍लेषकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मतदानोत्तर चाचण्यांचा कल येथेही भाजपच्या दिशेने आहे. निवडणूक प्रचारात भाजपने येथे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसला लक्ष्य केले होते, तर कॉंग्रेसने वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि नोटाबंदीवरून सरकारवर निशाणा साधला होता. उद्याच्या मतमोजणीसाठी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात केली जाणार असून, प्रत्यक्ष मतमोजणीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असेल. 

कॉंग्रेसची खलबते 
दिल्लीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर गुजरातमधील प्रदेशपातळीवरील नेत्यांनी सरकार स्थापनेसाठीच्या प्रयत्नांना वेग द्यायला हवा, अशी विनंती त्यांच्याकडे केल्याचे समजते. अहमद पटेल, मधुसूदन मिस्त्री आणि प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी यांनी या अनुषंगाने राहुल गांधींसोबत चर्चा केली आहे. दुसरीकडे आज गुजरातमध्ये चार मतदारसंघांतील 6 केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्यात आले, "ईव्हीएम'मधील बिघाडामुळे येथील मतदानाची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. 

गुजरात 
एकूण जागा : 182 
बहुमतासाठी आवश्‍यक : 92 

हिमाचल प्रदेश 
एकूण जागा : 68 
बहुमतासाठी आवश्‍यक : 35 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com