पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठी आज मतदान

voting
voting

अहमदाबाद : गुजरात विधानसभेसाठी आज (शनिवार) पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठीचे मतदान पार पडणार असून, आता सर्वपक्षीय राजकीय खलबतांना ऊत आला आहे.

मतदानाच्या पूर्वसंध्येलाच आता पाटीदार अनामत आंदोलन समितीमध्ये मोठी फूट पडली. पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल याचा विश्‍वासू सहकारी दिनेश बांभनियाने राजीनामा देत बंडाचे निशाण रोवले. आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्याने कॉंग्रेवर जोरदार टीका केली. पटेल आरक्षणाबाबत कॉंग्रेस दिशाभूल करत असून, "ओबीसी' कोट्यातून समाजाला आरक्षण देण्याबाबत कोणतेही ठोस आश्‍वासन पक्षाकडून देण्यात आलेले नाही, असे बांभनिया याने नमूद केले. दरम्यान हार्दिक साथ सोडणाऱ्या नेत्यांची यादी लांबतच चालली असून, याआधी चिराग पटेल, केतन पटेल, वरुण पटेल आणि रेश्‍मा पटेल यांनीही पाटीदार समितीचा राजीनामा दिला होता. राजकीयदृष्ट्या सर्वाधिक संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्राचा कौल उद्या मतपेटीमध्ये बंद होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी विविध पक्षांचे व अपक्ष मिळून 977 उमेदवार रिंगणात आहेत. या पहिल्या फेरीत राज्यातील 2 कोटी 12 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावण्याची शक्‍यता आहे. 

पंतप्रधान मोदी हे गुजरातच्या भवितव्याबाबत गप्प का आहेत. राज्यासाठी भविष्यात काय करायचे, याचे नियोजनच मोदींकडे नसल्याने त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. गुजरातवर पुढील शंभर वर्षे भाजपचे राज्य असेल, असे मोदी म्हणतात; पण राज्याच्या भविष्याबाबत मात्र ते गप्प असतात. 
- राहुल गांधी, कॉंग्रेसचे नियोजित अध्यक्ष (पावी जेतपूर सभेत बोलताना) 

मला रस्त्यातून हटविण्यासाठी मणिशंकर अय्यर हे पाकिस्तानला गेले होते, मोदींना हटविल्याशिवाय भारत पाकिस्तान संबंध सुधारणार नाहीत, असे त्यांचे म्हणणे होते. याबाबतही कॉंग्रेसने खुलासा करावा. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

गुजरातच्या रणांगणात आज पहिला डाव असे मतदारसंघ, असे मतदार 
एकूण जागा - 182 
पहिल्या टप्प्यासाठी मतदान - 9 डिसेंबर 
पहिल्या टप्प्यातील मतदारसंघ - 89 

रिंगणातील उमेदवार - 977 
महिला उमेदवार - 57 
मतदान केंद्रे - 24,689 
ईव्हीएमचा वापर - 27,158 

सर्वात मोठा मतदारसंघ - कामरेज, 4,28,695 मतदार 
सर्वात लहान मतदारसंघ - सुरत उत्तर, 1,57,250 मतदार 

सर्वात छोटा मतदारसंघ - कारंज (4 चौरस किलोमीटर) 
सर्वात मोठा मतदारसंघ - अबदासा (6,278 चौरस किलोमीटर) 

सर्वाधिक उमेदवार - जामनगर ग्रामीण, 27 उमेदवार 
सर्वांत कमी उमेदवार - झागडिया आणि गणदेवी - प्रत्येकी 3 उमेदवार 

पहिल्या टप्प्यासाठीचे 
एकूण मतदार - 2,12,31,652 
पुरुष मतदार - 1,11,05,933 
महिला मतदार - 1,01,25,472 
इतर - 247 

पक्षनिहाय रिंगणातील उमेदवार - भाजप - 89, कॉंग्रेस - 87, बसपा - 64, राष्ट्रवादी कॉंग्रेस - 30, शिवसेना - 25, आप - 21, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट - 2, भारतीय कम्युनिस्ट - 1, अपक्ष - 443, इतर - 215. 

पहिल्या टप्प्यातील 2012 च्या निवडणुकीतील निकाल - भाजप - 63, कॉंग्रेस - 22, इतर - 4. 

- संपूर्ण गुजरातमधील सर्व 50,128 मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशिनचा वापर केला जाणार आहे. 

आरोप-प्रत्यारोपांची धुळवड 
- कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांना "नीच किसम का आदमी', असे संबोधले. सुरतमधील सभेत त्याला उत्तर देताना मोदी यांनी त्यांच्या मनोवृत्तीचा "मुघलाई मानसिकता' अशा शब्दांत समाचार घेतला. 
- राहुल गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष होणार, या घटनेच्या आनुषंगाने "औरंगजेब राज उनको मुबारक' अशा शब्दांत मोदींची टीका. 
- रामजन्मभूमी-बाबरी मशीदच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी करताना भाजपचे नेते नरसिंहराव यांनी राहुल यांना "बाबर भक्त', "खिलजीचे वारस' अशी विशेषणे लावली होती. राहुल यांनी सोमनाथ मंदिराला भेट दिल्यानंतर तेथील रजिस्टरमध्ये त्यांचा उल्लेख "बिगर हिंदू' असा केल्याने त्या आनुषंगाने नरसिंहराव यांनी हे विधान केले होते. राहुल यांनीही आपले कुटुंबीय शिवभक्त आहे, पण आपण राजकारणासाठी त्या मुद्द्याचा वापर करत नाही, असे स्पष्ट केले होते. 
- एवढेच नव्हे तर युवक कॉंग्रेसच्या ट्‌विटर हॅंडलवर मोदी यांच्या चायवाला या पूर्वेतिहासावर भाष्य होते. त्यावर प्रत्युत्तरादाखल भाजपचे खासदार, अभिनेते परेश रावल यांनी, "बारवालापेक्षा चायवाला केव्हाही चांगला', असे म्हटले होते. बिहारमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद यांनी, "मोदी यांच्याकडे उठणारी बोटे छाटून टाकली जातील,' असे म्हटले होते. 
- राहुल गांधी यांनीही जीएसटीचा मुद्दा प्रचारात उपस्थित करताना, जीएसटी म्हणजे "गब्बरसिंग टॅक्‍स' असा उल्लेख केला होता. सोनिया गांधी यांनीदेखील 2007 च्या निवडणुकीत मोदींना "मौत का सौदागर' अशी "उपमा' दिली होती. 
(सकाळ संशोधन आणि विकास विभाग) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com