भाजपने 1 कोटींचे आमीष दाखवून केला 'या' नेत्याचा पक्ष प्रवेश

नरेंद्र पटेल
नरेंद्र पटेल

गांधीनगर : “भाजपमध्ये जाण्यासाठी मला एक कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला. त्यापैकी 10 लाख रुपयांची रक्कम सुरुवातीलाच पक्षात प्रवेश करण्यासाठी देण्यात आली. उर्वरित 90 लाख रुपये सोमवारी (23 ऑक्टोबर) देण्यात येणार होते,” असे सांगत पाटीदार समाजाचे नेते व हार्दिक पटेलचे निकटवर्तीय असलेले नरेंद्र पटेल यांनी पुराव्यानिशी दहा लाख रुपयांची रक्कमच पत्रकारांसमोर मांडली. पटेल यांच्या या गौप्यस्फोटामुळे गुजरातच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाटीदार समाज हा गुजरात निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणारा घटक आहे. हार्दिक पटेल हा या समाजाचा सर्वात लोकप्रिय नेता आहे. गुजरातमधील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांची साथ सोडून भाजपमध्ये सामील झालेले नरेंद्र पटेल यांनी भाजपला पहिल्याच दिवशी घरचा आहेर दिला आहे. 

दरम्यान, हार्दिक पटेलचे निकटवर्तीय वरुण पटेल आणि रेश्मा पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनाही भाजपने अशाच प्रकारे आमीष दाखवून पक्षात घेतले असल्याचा आरोप हार्दिक पटेलने केला आहे. या प्रवेशानंतर काही वेळातच नरेंद्र पटेल यांनी वरील खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. 

नरेंद्र पटेल म्हणाले, "पाटीदार समाजाचे नेते वरुण पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी एक कोटी रुपये देण्याचे आमीष दाखवले." दरम्यान, वरुण पटेल यांनी नरेंद्र पटेल यांचे आरोप फेटाळून लावले. नरेंद्र पटेल हे काँग्रेसचे एजंट आहेत असा आरोप वरुण यांनी केला.

हार्दिक पटेल गुजरातच्या राजकारणात सक्रिय नाही, मात्र हार्दिकचा काँग्रेसला पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपची तारांबळ उडाली आहे. तसेच, उमेदवार खरेदी करून भाजप मोर्चेबांधणी करत असल्याचे स्पष्ट होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com