पर्यावरणाच्या नावाखाली काँग्रेसकडून विकास ठप्प- पंतप्रधान मोदी

वृत्तसंस्था
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

सौराष्ट्रमध्ये रो-रो सेवेचे उद्‌घाटन

घोघा (गुजरात) : गुजरातमध्ये निवडणूक तारखा जाहीर करण्यास विलंब होत असल्याच्या कारणावरून राजकीय धुरळा उडत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सौराष्ट्रला दक्षिण गुजरातशी जोडणाऱ्या "रोल-ऑन रोल-ऑफ (रो-रो)' नौका सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन झाले.
आपल्या स्वप्नवत प्रकल्पाचे उद्‌घाटन करताना मोदींनी मागील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) सरकारवर टीकास्त्र सोडले. पर्यावरणाच्या नावाखाली यूपीए सरकारने हा प्रकल्प लांबणीवर पडण्यासाठी अडथळे आणले आणि त्यामुळे गुजरातचा विकास ठप्प झाल्याचा आरोप त्यांनी केला.

या महिन्यात तिसऱ्यांदा गुजरातला भेट दिलेल्या मोदींनी भावनगरमधील 100 अंध मुलांच्या साथीत घोघा ते दहेज असा प्रवास नौकेतून केला. नव्या संकल्पाबरोबर नवा भारत, नव्या गुजरातच्या दिशेने एक अनमोल भेट घोघाच्या भूमीवरून संपूर्ण भारताला मिळत आहे. हा फक्त भारतच नव्हे, तर दक्षिण आशियातील सर्वांत मोठा प्रकल्प असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री असताना केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने गुजरातचा विकास रोखण्यात कोणतीच कसर सोडली नाही, असा आरोप मोदी यांनी केला. वापीपासून कच्छमधील मांडवीपर्यंत विकासाची दारे बंद करण्यात आली होती. पर्यावरणाच्या नावाखाली उद्योग बंद पाडण्याच्या धमक्‍या देण्यात आल्या. मुख्यमंत्री असताना गुजरातच्या विकासासाठी किती संघर्ष करावा लागला हे मलाच ठाऊक आहे, असेही ते म्हणाले.

मोदी म्हणाले की, जी वस्तू रस्तेमार्गाने नेण्यासाठी दीड रुपये खर्च येत होता, तेच साहित्य जलमार्गाने नेण्यासाठी फक्त 20 ते 25 पैसे खर्च येईल. विचार करा, यामुळे देशाचे किती पेट्रोल आणि डिझेल वाचेल. त्याचबरोबर वेळही वाचेल. भविष्यात ही सेवा मुंबईपर्यंत नेण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.
गुजरातला हजारो वर्षांचा समुद्री इतिहास असल्याचे सांगत मोदी म्हणाले, की या फेरीमुळे कोट्यवधी लोकांचे आयुष्य सुरळीत होईल, ते आणखी जवळ येतील. सौराष्ट्र आणि गुजरातदरम्यान दररोज सुमारे 12 हजार लोक प्रवास करतात. एका फेरीत 500हून अधिक लोक आणि सुमारे 100 कार आणि ट्रक नेता येतील. या फेरीचा प्रभाव दिल्ली आणि मुंबईच्या मार्गावरही पडेल. रस्त्यावर वाहनांची संख्या कमी होईल. त्यांचा वेग वाढेल आणि याचा अर्थव्यवस्थेला फायदा होईल.

बंदरे ही समृद्धीचे प्रवेशद्वार : मोदी
दहेज (गुजरात) : समृद्धीसाठी बंदरांची उभारणी अर्थात "पी (पोर्टस्‌) फॉर पी (प्रॉस्पेरिटी)' हा आमच्या सरकारने नवा मंत्रा दिला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. येथे उपस्थित लोकांसमोर बोलताना ते म्हणाले, की देशाच्या विकासासाठी आपल्याला अत्याधुनिक बंदरांची गरज आहे. त्यासाठी आम्ही नवा मंत्र दिला आहे. त्यामुळे आम्ही सागरमाला प्रकल्पासाठी प्रयत्न करत असून, याअंतर्गत जुन्या बंदरांना आधुनिक रूप दिले जाईल.