मी काँग्रेसला मत दिले नाही : शंकरसिंह वाघेला

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

या निवडणुकीचा देशाच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. काँग्रेसला मी या निवडणुकीपूर्वी खूप समजविण्याचा प्रय़त्न केला. पण, त्यांनी ऐकले नाही. त्यामुळेच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत काँग्रेसचा विजय होणार नाही. त्यामुळे माझे मत त्यांना देण्याचा प्रश्नच येत नाही.

अहमदाबाद - राज्यसभेसाठी आज (मंगळवार) गुजरातमध्ये मतदान होत असून, काँग्रेसचे माजी नेते शंकरसिंह वाघेला यांनीच मी काँग्रेसला मत दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

राज्यसभा निवडणूक सत्तारूढ भाजप आणि विरोधी काँग्रेससाठी ही प्रतिष्ठेची लढत बनली आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर गुजरात याच वर्षी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपने राज्यसभा निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी भाजपकडून; तर अहमद पटेल काँग्रेसकडून रिंगणात उतरले आहेत. अहमद पटेल यांची वाट बिकट मानली जात आहे.

ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांच्या बंडखोरीसह अनेक नाट्यमय घडामोडींमुळे राज्यसभा निवडणुकीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. सहा आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आणि त्यांनी अन्य 44 आमदार फुटू नयेत, यासाठी त्यांना बंगळूरला हलवले होते. आता शंकरसिंह वाघेला यांनीही आपण काँग्रेसला मतदान केले नसल्याचे म्हटले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदानाबाबत अद्याप अनिश्चितता आहे.

वाघेला म्हणाले, की या निवडणुकीचा देशाच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. काँग्रेसला मी या निवडणुकीपूर्वी खूप समजविण्याचा प्रय़त्न केला. पण, त्यांनी ऐकले नाही. त्यामुळेच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत काँग्रेसचा विजय होणार नाही. त्यामुळे माझे मत त्यांना देण्याचा प्रश्नच येत नाही.

अहमद पटेल हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव असून, त्यांना विजयासाठी 45 मतांची गरज आहे. त्यांच्या पक्षाकडे सध्या 44 आमदारांचे संख्याबळ असून, नुकतेच ते राज्यात परतले आहेत. त्यांच्यातील कोणीही क्रॉस वोटिंग केले नाही किंवा नोटाचा पर्याय निवडला नाही आणि एक अतिरिक्त मत पडल्यास पटेल यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :