मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचा काँग्रेसमध्ये शोध 

वृत्तसंस्था
शनिवार, 18 मार्च 2017

अहमदाबाद : गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची चाचपणी काँग्रेसकडून सुरू झाली असून, त्यासाठी पक्षात आतापासूनच चढाओढ सुरू झाली आहे. 

अहमदाबाद : गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची चाचपणी काँग्रेसकडून सुरू झाली असून, त्यासाठी पक्षात आतापासूनच चढाओढ सुरू झाली आहे. 

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करूनच विधानसभेची निवडणूक लढविण्याचे काँग्रेसने सूचित केले आहे. तेव्हापासून अनेक नेत्यांविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. पक्षनेत्यांच्या म्हणण्यानुसार या स्पर्धेत विरोधी पक्षनेते शंकरसिंह वाघेला व प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष भारतसिंह सोलंकी यांची नावे पुढे आहेत. अन्य नेत्यांमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल; तसेच प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष अर्जुन मोढवाडिया व सिद्धार्थ पटेल स्पर्धेत आहेत. 

खरी स्पर्धा वाघेला व सोलंकी यांच्यातच आहे. त्यासाठी त्यांनी केंद्रीय पातळीवर आपले घोडे दामटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये यंदा भाजपचा पराभव करण्याची काँग्रेसला मोठी संधी असल्याचे सांगितले जाते. गुजरातमधील मोदी यांची उपस्थिती, आरक्षणासाठी पटेलांचे आंदोलन, दलितांमधील अस्वस्थता, सत्ताधाऱ्यांविरोधी रोष, भाजपमध्ये सक्षम नेत्याची उणीव आदी गोष्टी काँग्रेसला बळ देणाऱ्या आहेत. 

वाघेला, सोलंकी यांचे 'लॉबिंग' 
वाघेला यांच्या समर्थकांनी 'मुख्यमंत्री वाघेला' नावाचे फेसबुक पेज तयार केले असून, त्याद्वारे त्यांचा प्रचार सुरू केला आहे. 'गुजरातमध्ये भाजपचा पराभव करू शकणारे काँग्रेसचे एकमेव नेते,' असे त्यांचे वर्णन केले आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून सोलंकी यांची पोस्टर अनेक ठिकाणी झळकली आहेत. अन्य राज्यांमधील नेत्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. वाघेला व सोलंकी यांच्या दिल्ली वाऱ्याही वाढल्या आहेत.

Web Title: Gujrat Congress searching for CM candidate