शहा, स्मृती इराणी यांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल

महेश शहा
शुक्रवार, 28 जुलै 2017

काँग्रेसच्या आमदारांना भुलविण्याचा भाजपचा प्रयत्न

काँग्रेसच्या आमदारांना भुलविण्याचा भाजपचा प्रयत्न

अहमदाबाद: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी गुजरातमधून शुक्रवारी सकाळी अर्ज भरले. गुजरातमध्ये राज्यसभेची निवडणूक 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. यात निवड झाल्यानंतर शहा प्रथमतच संसदेत प्रवेश करतील. सध्या शहा अहमदाबादमधील नरनपुरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. भाजपच्या संसदीय समितीने बुधवारी (ता. 26) शहा व इराणी हे राज्यसभेसाठी गुजरातमधून निवडणूक लढतील, असे जाहीर केले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना शह देण्यासाठी भाजपने त्यांच्याविरोधात काँग्रेसचे बंडखोर नेते आमदार बलवंतसिंह राजपूत यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरविले आहे. राजपूत यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अहमद पटेल यांनी यापूर्वीच अर्ज भरलेला आहे.

"आगामी काळात काँग्रेसचे अजून काही आमदार भाजपकडे येणार असले, तरी राज्यसभेसाठी अतिशय काळजीपूर्वक मतदान करावे,'' असे आवाहन शहा यांनी भाजप आमदारांना केले. राज्यसभेच्या निवडणुकीला अजून अवधी असल्याने काँग्रेसच्या काही आमदारांना भाजपकडे खेचण्यासाठी प्रयत्न करण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे. यासाठी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट देण्याचा प्रस्ताव भाजपकडून काँग्रेस बंडखोरांपुढे ठेवला जात आहे. गुजरात विधानसभेची एकूण सदस्य संख्या 182 आहे. यात काँग्रेसचे संख्याबळ 57 आहे. त्यापैकी 17-18 आमदार काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल होण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते शंकरसिंह वाघेला यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपशी घरोबा केला. त्यांच्या मार्गाने जात भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळविणारे बलवंतसिंह राजपूत हे वाघेला यांचे जवळचे नातेवाईक आहेत. राजपूत यांच्या मुलाशी वाघेला यांच्या नातीचा विवाह झालेला आहे.

मतांची आकडेवारी महत्त्वाची
केंद्रातील भाजपचे संख्याबळ राज्यसभेत कमी आहे. वरिष्ठ सभागृहातील विरोधकांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी पक्षाचे अधिकाधिक सदस्य निवडून आणण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत. शहा आणि स्मृती इराणी यांना विजयासाठी आवश्‍यक मते दिल्यानंतर उर्वरित मते राजपूत यांना देता येणार आहेत. तसेच, या दोघांना केलेल्या मतदानातील दुसऱ्या पसंतीची मतेही राजपूत यांना मिळतील, अशी रणनीती भाजपने आखली आहे.

देश

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते धरणाचे उद्घाटन होण्यापूर्वीच तब्बल 389 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

श्रीनगर : भारत पाकिस्तान दरम्यानच्या सीमेलगत अमृतसरनजीक अंजाला सेक्टर येथे घुसखोरीचा डाव सीमा सुरक्षा बलाने (BSF) उधळून लावला....

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

पटेल, क्षत्रिय अन्‌ आदिवासी नेतृत्वाचे आव्हान नवी दिल्ली/ अहमदाबाद, ता. 19(यूएनआय) : विकासाच्या कथित राजमार्गावरून "बुलेट'...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017