काँग्रेस, भाजपचे उमेदवार निश्‍चित; आज घोषणा शक्‍य

काँग्रेस, भाजपचे उमेदवार निश्‍चित; आज घोषणा शक्‍य

अहमदाबाद : गुजरातमधील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्याने प्रचाराच्या रणधुमाळीत व्यग्र असलेल्या राजकीय पक्षांनी आपआपले उमेदवार निश्‍चित करायला सुरवात केली आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस या दोन्ही पक्षांची उमेदवार निश्‍चितीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, उद्या (ता. 16) होणाऱ्या संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊन उमेदवार याद्याही जाहीर केल्या जाऊ शकतात.

पहिल्या टप्प्यामध्ये 19 जिल्ह्यांत मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या काही भागांचा यात समावेश होतो. भाजपचा विचार केला तर मुख्यमंत्री विजय रूपानी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांनी संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली असून, ही यादी घेऊन ते दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. भाजपने एकाजागेसाठी दोन ते तीन पर्यायी उमेदवार तयार ठेवले असून, 182 जागांसाठी हेच समीकरण कायम ठेवण्यात आले आहे. उमेदवारांच्या निश्‍चितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांची महत्त्वाची भूमिका असेल.

काँग्रेसचीही यादी
काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. मनीष दोषी म्हणाले, की उद्या (ता. 16) आमचा पक्ष पहिली उमेदवार यादी जाहीर करू शकतो. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे परस्परांच्या याद्यांकडे बारीक लक्ष असून, शेवटच्या क्षणी देखील यामध्ये बदल केला जाऊ शकतो. आज पहिल्या दिवशी कच्छ आणि भावनगरमध्ये तीन अपक्ष उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. भूजमधून परेश शहा, तळाजामधून महेंद्र सर्वीय आणि भावनगर पश्‍चिममधून राजेंद्रसिंह जडेजा यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.

आणखी चार व्हिडिओ व्हायरल
पटेल समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांच्याशी संबंधित आणखी चार आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियामध्ये आज व्हायरल झाल्याने पुन्हा खळबळ निर्माण झाली आहे. या व्हिडिओची सत्यता मात्र अद्याप पटू शकलेली नाही. या व्हिडिओमध्ये हार्दिक यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती मद्यपान करत महिलांसोबत अश्‍लील चाळे करत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. या व्हिडिओमुळे संतापलेल्या हार्दिक यांनी भाजपविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. भाजप आपल्या खासगी आयुष्यामध्ये ढवळाढवळ करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींना "पप्पू' म्हणू नका
प्रचारासाठीच्या जाहिरातींमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उद्देशून "पप्पू' हा शब्द वापरण्यास गुजरातमध्ये निवडणूक आयोगाने भाजपला मनाई केली आहे. राहुल यांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांकडून "पप्पू' हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. दरम्यान, जाहिरातीच्या मजकुरातील कोणताही शब्द एखाद्या व्यक्तीला उद्देशून वापरलेला नसल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या वतीने मागील महिन्यात जाहिरातीची संहिता मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती. त्यामधील "पप्पू' हा शब्द मानहानीकारक असल्याचे सांगत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वाखालील प्रसारमाध्यम समितीने याला आक्षेप घेतला होता. आयोगाने मनाई करताच भाजपने राहुल यांच्यासाठी "युवराज' हा शब्द उपरोधिक अर्थाने वापरायला सुरवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com