वस्त्रोद्योग परिषदेचे 30 जूनला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

महेश शहा
मंगळवार, 27 जून 2017

"जीएसटी'ला विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष

"जीएसटी'ला विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष

अहमदाबाद: गांधीनगर येथे येत्या 30 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योग परिषदेचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. "जीएसटी'च्या निषेधार्थ स्थानिक कापड दुकानदारांनी पुकारलेल्या तीनदिवसीय बंदच्या पार्श्‍वभूमीवर या परिषदेच्या उद्‌घाटनासाठी पंतप्रधान येत असल्याने त्यांच्या दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथील हिरे व्यापारी, खाद्य पदार्थांचे उत्पादक आदींनीही "जीएसटी'ला विरोध दर्शविला आहे. महात्मा मंदिर येथे होणाऱ्या वस्त्रोद्योग परिषदेत 130 देशांचे पाच हजारावर प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. परिषदेच्या निमित्ताने कापड आणि वस्त्रप्रावरणांचे मोठे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

दरम्यान, 29 जून रोजी मोदी हे राजकोटला भेट देणार असून, तेथे नर्मदा नदीवरील अजी धरणातून औद्योगिक क्षेत्रासाठी त्यांच्या हस्ते पाणी सोडण्यात येणार आहे. धरण जवळपास पूर्ण भरले असून, त्यामुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. याच दिवशी राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कोनशिलेचे अनावरण त्यांच्या हस्ते होण्याची शक्‍यता आहे.

सभास्थानी आढळले विषारी साप
राजकोट येथे पंतप्रधान मोदींची जाहीर सभा होणार असून, नियोजित सभास्थानाच्या ठिकाणी पोलिसांना पाच विषारी साप आढळून आले आहेत. या संदर्भात राजकोट पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले असून, सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.