...अन्‌ मोदी उडाले भुर्रर्र!

narendra modi
narendra modi

शेवटच्या "सी-प्लेन'मधून भरारी, कॉंग्रेस म्हणते हा "हवा हवाई' प्रचार?

अहमदाबाद/अंबाजी, ता.12 : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी निम्मे राज्य पिंजून काढणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थेट "सी-प्लेन'मधून हवाई प्रवास केला. मोदी यांच्या विमानाने साबरमती नदीच्या जलाशयातून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्याने धारोई डॅम गाठला. मोदी सरदार ब्रिज परिसरातच या सिंगल इंजिन विमानामध्ये बसले होते. यानंतर ते आपल्या गाडीतून बनासकांठा येथे पोचले. येथील प्रसिद्ध अंबाजी मंदिरामध्येही त्यांनी पूजाअर्चना केली. मोदींच्या या हवाईप्रवासावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली. कॉंग्रेस प्रवक्‍ते रणदीप सुरजेवाला यांनीही भाजपला विकास समजत नाही, त्यांचा हा प्रवास फक्त "हवा हवाई' आहे, असा प्रहार केला.

तत्पूर्वी मोदींना या विमानामध्ये बसता यावे म्हणून विशेष जेट्टी तयार करण्यात आली होती. मोदी अंबाजी मंदिरामध्ये येताच, त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. येथे त्यांना पाहण्यासाठी भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अंबामातेची पूजा केल्यानंतर मोदींनी पंधरा मिनिटे मंदिरामध्ये घालवली. यानंतर ते "सी-प्लेन'मधूनच अहमदाबादला रवाना झाले. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने मोदींप्रमाणेच भाजपच्या अख्ख्या प्रचार यंत्रणेने स्वत:ला प्रचारामध्ये झोकून दिले होते.

मोदी महिनाभरामध्ये कोट्यवधी रुपयांची मशरूम खातात, हे मशरूम खास तैवानमधून मागविण्यात येतात. त्यामुळेच ते तरुण आणि गोरे दिसतात. मोदी स्वत: जर कोट्यवधी रुपये खात असतील तर त्यांचे कार्यकर्ते किती खात असतील, ही कल्पनाच करवत नाही.
- अल्पेश ठाकोर, "ओबीसी' नेते (वडगाम येथील सभेत बोलताना)

सी-प्लेन ठीक... पण जनतेसाठी काय?
पंतप्रधान मोदींना "सी-प्लेन'मधून भरारी घ्यावी वाटत असेल तर चांगलेच आहे; पण खरा प्रश्‍न हा त्यांनी गुजरातच्या जनतेसाठी काय केले हा आहे. गुजरातमध्ये मी आतापर्यंत ज्या मंदिरांना भेटी दिल्या तेथे राज्यातील लोकांच्या भल्यासाठीच प्रार्थना केली आहे, असे सांगत राहुल यांनी आज मोदींची भाषाशैली, जीएसटी, बेरोजगारी आदी मुद्यांना स्पर्श करत सरकारवर टीकेचे आसूड ओढले.

राहुल म्हणाले, ""मागील 22 वर्षांमध्ये मोदी आणि रूपानी यांनी एका बाजूनेच विकास केला आहे. याचा केवळ दहाच लोकांना फायदा झाला. नॅनोसाठीचे 33 हजार कोटी रुपये कोठे गेले? या निवडणुकीत भाजपचे स्थान घसरल्यानेच मोदी एकतर स्वत:विषयी बोलत आहेत किंवा कॉंग्रेसवर टीका करत आहेत. गब्बरसिंह टॅक्‍स अर्थात "जीएसटी'ने व्यापाऱ्यांचे नुकसानच केले आहे. गुजरातमधील एका शिक्षकाने महागाई वाढली पण वेतन वाढले नाही, अशी व्यथा आपल्याला ऐकविली.'' कॉंग्रेसच्या संभाव्य इराद्यांबाबत ते म्हणाले की आम्ही सत्तेत आलो तर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. तरुणांच्या हातांना रोजगार देऊ. मागील तीन चार महिन्यांमध्ये मी लोकांचे म्हणणे ऐकून घेतले आहे.

राहुल म्हणाले

  • कधीच चुकीचे बोललो नाही
  • गुजरातने माझ्यावर खूप प्रेम केले
  • जनतेने आवाज दिल्याबरोबर धावून येईन
  • या निवडणुकीत कॉंग्रेसचा विजय निश्‍चित
  • डॉ. सिंग यांच्यावरील मोदींची टीका अस्विकारार्ह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com