उत्तर प्रदेशात 'गुंडाराज'- पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

पंतप्रधान मोदी यांनी या वेळी कॉंग्रेस पक्षावरही जोरदार हल्ला चढवला. सप-कॉंग्रेस आघाडीवरही मोदी यांनी चौफेर टीका केली.

फत्तेपूर : उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या सरकारला राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयश आले असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.

अखिलेश यादव यांच्या सरकारमधील मंत्र्याच्या विरोधात बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे राज्यात "गुंडाराज' असल्याची टीका करत मोदी यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना लक्ष केले.

सामूहिक बलात्कारप्रकरणी उत्तर प्रदेशातील मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सर्वेच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या चेहऱ्यावरील तेज मावळले असून, त्यांना आता माध्यमांशी बोलताना शब्द शोधावे लागत आहेत, असा आरोप मोदी यांनी केला. उत्तर प्रदेशातील लढाईत आपण हरलो असल्याचे अखिलेश यांच्या ध्यानात आले असल्याचा दावाही मोदी यांनी केला.

प्रतिष्ठेच्या अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या गायत्री प्रसाद प्रजापती यांची 2016मध्ये मुख्यमंत्री अखिलेश यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती, मात्र नंतर पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले होते.
पंतप्रधान मोदी यांनी या वेळी कॉंग्रेस पक्षावरही जोरदार हल्ला चढवला. सप-कॉंग्रेस आघाडीवरही मोदी यांनी चौफेर टीका केली.