गुरमीत राम रहीम चेहऱ्या मागचा खरा चेहरा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

मेसेंजर ऑफ गॉड 
- "मेसेंजर ऑफ गॉड' या चित्रपटाची राम रहीम यांनी 2014 मध्ये निर्मिती केली. त्यात त्याने सुपरहिरोची भूमिका केली होती. त्याचा प्रदर्शनाला विरोध झालेला, प्रकरण गाजले आणि नंतर त्याच्या प्रदर्शनाला परवानगी देण्यात आली. त्याने दोन वर्षांपूर्वी "एमएसजी' नावाने ऑनलाइन विक्रीचा व्यवसायही सुरू केला, त्याद्वारे पावणेदोनशेवर वस्तू विकल्या जाताहेत, त्याची मुले याचे काम पाहताहेत. 

गुरमीत राम रहीम याच्याविरोधात असलेले खटले : तीन, त्यांचे स्वरूप - बलात्कार, खून आणि बेकायदा शस्त्र बाळगणे 

डेरा सच्चा सौदाची स्थापना बलुचिस्तानमधील शाह मस्ताना यांनी 1948 मध्ये केली. मस्ताना यांच्यानंतर शहा सतनाम हे 1948 ते 1960 डेराचे प्रमुख झाले - वयाच्या तेवीसाव्या वर्षी 1990 मध्ये गुरमीत राम रहीम सिंग यांनी "डेरा'ची सूत्रे घेतली. 

राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्ह्यातील श्री गुरूसर मोडिया गावात 15 ऑगस्ट 1967 रोजी गुरमीत यांचा जन्म झाला. तो सात वर्षांचा असताना शाह सतनाम सिंग यांनी सिरसा येथील डेऱ्याच्या ठिकाणी उचलून घेतले आणि त्याचे राम रहीम असे नामकरण केले. त्यानंतर सोळा वर्षांनी, 1990 मध्ये देशभरातील डेराचे अनुयायी मुख्यालयी जमले आणि शाह सतनाम यांनी राम रहीमला आपला वारस म्हणून घोषित केले. 
- भारतापासून पंजाब वेगळा करण्याचा खंदा पुरस्कार करणाऱ्या गुरूजंतसिंग राजस्थानी या खलिस्तान लिबरेशन फोर्सच्या (केएलएफ) कडव्या दहशतवाद्याशी राम रहीम यांची जवळीक होती. राम रहीम याच्या आधीचे गादीचे वारसदार शाह सतनाम सिंगजी महाराज यांच्या कपाळात गोळ्या घालून त्यांची गुरूजंतसिंगने हत्या केली होती, त्यानंतर राम रहीम डेराप्रमुख झाले. त्या वेळी त्यांनी आपले नाव "हजूर महाराज संत गुरमीत राम रहीम सिंग' असे घेतले. 

1948 मध्ये सुरू झालेल्या डेरा सच्चा सौदाला नवे रूप रहीम यांनी मिळवून दिले. त्याच्या आधीपर्यंत पंथाचे काम शांततेने सुरू होते. पंजाबमधील राजकीय नेत्यांच्या मतमतांतरांच्या धुळवडीमध्ये डेराचे लाखो लोक अनुयायी झाले. सिरसामधील अनेक उद्योगांना सरकारने करामध्ये सवलती दिल्या आहेत, त्याच परिसरात डेराकडे सुमारे सातशे एकर जमीन आहे. यातील काही जमीन त्यांनी लाटल्याचा आरोप आहे. तेथे शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तेथे राहणारे ब्रह्मचर्य पाळतात, मात्र रहीम तीन मुलांचा वडील आहे. 

डेरामध्ये गैरकृत्ये 
"डेरा'मध्ये गैरकृत्ये चालतात, यावर 2002 मध्ये प्रकाश पडला. त्या वेळी एका साध्वीने तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र लिहून राम रहीम यांनी बलात्कार केल्याचा आणि तेथे मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण केले जात असल्याचा आरोप केला होता. येथे तीस ते चाळीस मुलींनी छळवणुकीचा आरोप केला होता. त्यातील एकीने पत्रात, "आपणाला देवी म्हणवले जाते, पण प्रत्यक्षात वेश्‍येसारखे वागवले जाते. आपल्याला जिवाला धोका आहे,' असे नमूद केले होते. त्यानंतर विविध घटनांमध्ये राम रहीम यांच्यावर बेकायदा कृत्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. जुलै 2002 मध्ये त्यांच्यावर एका साध्वीच्या भावाचा खून केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला. याच युवकाने तिचे पत्र पंतप्रधानांपर्यंत पोचवल्याचे बोलले जाते. 

- ऑगस्ट 2007 मध्ये "तहेलका'ने डेरा प्रमुखाचा माजी चालक आणि त्यांच्या इनरसर्कलमधील खट्टासिंग याची मुलाखत घेतली. त्यात त्याने राम रहीम यांच्या लोकांनी सात जणांचे खून केल्याचे सांगितले होते. त्याचे गुप्त रेकॉर्डिंग केले गेले होते. 

पत्रकाराचा खून 
- 10 ऑक्‍टोबर 2002 रोजी राम चंदर छत्रपती या सिरसा येथील "पूरा सच'च्या संपादकाचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. त्या प्रकरणी दोघांना अटक केली होती. छत्रपतींनी डेरामधील घटनांबाबत वृत्तमालिका प्रसिद्ध करणे सुरू केले होते, त्यानंतर ही घटना घडली. या प्रकरणाच्या तपासात गोळीबारासाठी वापरलेली बंदूक डेराचा व्यवस्थापक कृष्णलाल याच्या नावावर असलेली आढळली. तसेच त्यांच्या संवादासाठी वापरलेली वॉकीटॉकी यंत्रणेचा परवाना डेराच्या नावावर असल्याचे लक्षात आले. 
- गुरमीत राम रहीम सिंग हे गायक, अभिनेते आणि व्यावसायिकदेखील आहेत. त्यांना व्हीव्हीआयपी दर्जा असून, भारतातील फक्त 36 जणांना तो आहे. त्यामुळे त्याच्या खासगी सुरक्षा रक्षकांशिवाय, झेड दर्जाची सुरक्षादेखील आहे. 
- गुरमीत राम रहीम सिंग यांनी हरजीत कौर यांच्याशी विवाह केला असून, उभयतांना चरणप्रित कौर आणि अमरप्रित कौर या मुली आणि जसमीत सिंग हा मुलगा आहे. त्यांनी ब्रिटनमधील वर्ल्ड रेकॉर्डस युनिव्हर्सिटीतून पदवी मिळवलेली आहे 
- राम रहीम यांच्या नावावर वेगवेगळे 53 उच्चांक असून, यापैकी 17 गिनेस रेकॉर्ड, 27 एशिया बुक रेकॉर्डस, 7 इंडिया बुक रेकॉर्डस आणि 2 लिम्का रेकॉर्डस आहेत. 
- डेराप्रमुखाने तीन चित्रपटांसाठी लेखन करून त्यांची निर्मिती, दिग्दर्शन करून त्यात भूमिकाही केल्या आहेत. 
- "डेरा'ने दोन वर्षांपूर्वी "एमएसजी' या नावाखाली स्वदेशी आणि सेंद्रिय उत्पादने बाजारात आणली होती. त्याची धुरा डेराप्रमुखाच्या मुलांकडे होती 

काय आहे डेरा सच्चा सौदा? 
- 1948 मध्ये मस्ताना बलुचिस्तानी यांनी अध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार व्हावा, या हेतूने डेरा सच्चा सौदाची हरियानातील सिरसी येथे स्थापना केली. "डेरा'ने अल्पावधीत रक्तदान शिबिरे, वृक्षरोपण मोहिमा हाती घेऊन मोठी प्रसिद्धी मिळवली. 
- "सच्चा सौदा' हा शब्दप्रयोग गुरू नानकदेवजी यांच्या जीवनातील घटनेवरून घेतलेला आहे. एकदा वडिलांनी गुरू नानकदेव यांना ते तरुण असताना बोलावून घेऊन त्यांना काही पैसे दिले आणि सांगितले की, "हे पैसे घे आणि त्यातून असा काहीतरी व्यवसाय कर की जेणेकरून तू नफा कमावशील आणि व्यवसायाची काही गुण अवगत करशील.' गुरू नानकदेवजी यांनी त्या पैशांमधून अन्न विकत घेतले आणि ते गरिबांना वाटून दिले. त्यानंतर आपल्या वडिलांकडे जावून आपण खरा सौदा (सच्चा सौदा) केला आहे, असे सांगितले. 
- मस्ताना बलुचिस्तानी यांच्यानंतर शाह सतनामसिंग त्यांचे उत्तराधिकारी झाले. त्यांची हत्त्या झाल्यानंतर त्यांच्या जागी गुरमित राम रहीम सिंग गादीवर विराजमान झाले. 

मेसेंजर ऑफ गॉड 
- "मेसेंजर ऑफ गॉड' या चित्रपटाची राम रहीम यांनी 2014 मध्ये निर्मिती केली. त्यात त्याने सुपरहिरोची भूमिका केली होती. त्याचा प्रदर्शनाला विरोध झालेला, प्रकरण गाजले आणि नंतर त्याच्या प्रदर्शनाला परवानगी देण्यात आली. त्याने दोन वर्षांपूर्वी "एमएसजी' नावाने ऑनलाइन विक्रीचा व्यवसायही सुरू केला, त्याद्वारे पावणेदोनशेवर वस्तू विकल्या जाताहेत, त्याची मुले याचे काम पाहताहेत. 

ग्रीन एस वेल्फेअर फोर्स 
- शाह सतनामजी ग्रीन एस वेल्फेअर फोर्स या सेवाभावी संस्थेची डेरा सच्चा सौदाने वेगळी स्थापना केली. त्याचे 44 हजारांवर सेवाभावी कार्यकर्ते असून, त्यामध्ये डॉक्‍टर, इंजिनियर, निमवैद्यकीय मंडळी, व्यापारी, बचाव कार्य करणारी मंडळी यांचा समावेश आहे. या संस्थेच्या सेवेकऱ्यांनी देशात विविध ठिकाणी मदत आणि बचावकार्य राबवलेले आहे. न्यूझीलंडमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाच्या मोहिमा राबवल्या आहेत. 

जागतिक विक्रम 
- या संस्थेने जगात आपल्या कार्याने काही उच्चांकही स्थापित केले आहेत. यामध्ये त्यांनी घेतलेले सर्वाधिक रक्तदानाची शिबिरे, सर्वाधिक डोळे तपासणी शिबिरे आणि जगात सर्वात मोठ्या संख्येने वृक्षरोपण मोहीम राबवणारी संस्था या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. वेश्‍यांचे विवाह करून त्यांना त्या व्यवसायातून बाहेर पडायला मदत करण्याच्या हेतूने मोहीम राबवण्यात आली, त्याला एक हजार 450 वर अनुयायांनी प्रतिसाद देऊन त्यांची सूचना अंमलात आणली आहे. "शाही बेटियॉं बसेरा' उपक्रम राबवून त्यांनी मुलींची होणारी हत्या रोखण्याचा प्रयत्न केला आहे. गुजरातमध्ये 2001 मध्ये झालेल्या भूकंपावेळी डेरा सच्चा सौदाचे अनुयायी मदतीसाठी धावून गेले होते. 
- 2004 मध्ये परमपिता शाह सतनामजी एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून सिरसा येथे शाह सतनामजी क्रिकेट स्टेडियम बांधण्यात आले. या स्टेडियमचा विस्तार शंभर एकर जागेवर असून, यांची आसन क्षमता तीस हजार लोकांची आहे. 
(सकाळ संशोधन व संदर्भ सेवा)