नोटाबंदीची हाफसेंच्युरी: खडतर विकेटवर राजकारण्यांची बॅटिंग

half centuary demonetisation
half centuary demonetisation

8 नोव्हेंबर

  • केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना जवळपास सर्वच देशांनी स्वीकारली आहे. या निर्णयानंतर जवळपास 80 टक्के चलन बाजारातून मागे घेतले जाणार असल्याने सर्वसामान्य जनता, छोटे व्यापारी, रोजंदारीवरील कामगार आणि दुर्गम भागातील नागरिकांना याचा फार त्रास होणार नाही, याची दक्षता केंद्र सरकारने घेतली पाहिजे.
    - नवीन पटनाईक
    आसामचे मुख्यमंत्री (भुवनेश्‍वर येथील पत्रकार परिषदेत)
  • देशाच्या अर्थव्यवस्थेला पोखरणाऱ्या काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. या निर्णयामुळे प्रशासनात पारदर्शकता येण्यास मदत होईल.
    - चंद्राबाबू नायडू
    आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री (विजयवाडा येथे पत्रकारांशी बोलताना)
  • परदेशातून काळा पैसा परत देशात आणण्याचे वचन पाळता न आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नाटक केले आहे. आठवड्याला 500 रुपये मिळविणारे आमचे गरीब बंधू-भगिनी उद्यापासून जीवनावश्‍यक वस्तू कशा खरेदी करू शकतील, हे पंतप्रधानांनीच सांगावे.
    - ममता बॅनर्जी
    पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री (ट्विटरवरून)
  • महंमद बिन तुघलकने 500-1000 च्या नोटा चलनातून रद्द केल्या. आता देशाची राजधानीही दिल्लीहून दौलताबादला हलविली जाईल. तुघलकाचे राज्य पुन्हा आले आहे.
    - मनीष तिवारी
    काँग्रेसचे प्रवक्ते (ट्‌विटरवरून)

9 नोव्हेंबर

  • रस्ते बंद आहेत, बाजारपेठा बंद आहेत, खासगी रुग्णालयांत रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही, लाखो लोकांना याचा फटका बसला आहे. हा अघोषित देशव्यापी बंदच आहे. काळा पैसा असलेल्यांना संरक्षण दिले जाईल; पण गरीबातला गरीब आणि मध्यमवर्गीय मात्र आज रडत आहे.
    - ममता बॅनर्जी
    पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री (ट्‌विटरवरून)
  • हा तर तुघलकी निर्णय आहे. काळा पैसा असलेल्या बड्या उद्योगपतींना वाचविण्यासाठी सरकारने उचललेले हे पाऊल आहे. शेतकरी आणि गरीबांसाठी नोटाबंदीचा निर्णय धक्कादायक आहे.
    - संजयसिंह
    'आप'चे नेते (दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना)
  • नोटाबंदी हा काळ्या पैशाच्या विरोधातील कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही. ज्या पद्धतीने हा निर्णय घेतला गेला, त्यामुळे गोरगरीबांना त्रास होत आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी संसदेत चर्चा करणे आवश्‍यक होते.
    - अखिलेश यादव
    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री (लखनौ येथे पत्रकारांशी बोलताना)
  • अचानक नोटाबंदीचा निर्णय जाहीर करणे हे राजकीय षडयंत्र आहे. या निर्णयामुळे कोणताही हेतू साध्य होणार नाही. काळा पैसा असलेल्यांनी त्यांच्याकडील संपत्ती परदेशी बँकांमध्ये जमा केली आहे. पण देशात सत्ता येऊन 900 दिवस झाल्यानंतरही भाजपला काहीही करून दाखविता आलेले नाही. त्यामुळे घाईगडबडीत त्यांनी हा निर्णय घेतला.
    - माणिक सरकार
    त्रिपुराचे मुख्यमंत्री (आगरतळा येथे पत्रकारांशी बोलताना)
  • कदाचित भविष्यासाठी हा निर्णय चांगला असेलही; पण ज्या असंवेदनशील पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला, त्यातून अंमलबजावणीच्या कल्पनांचा दुष्काळच दिसत आहे.
    - मुकूल संगमा
    मेघालयचे मुख्यमंत्री (शिलॉंगमध्ये पत्रकार परिषदेत)
  • हा ऐतिहासिक निर्णय आहे. यामुळे काळा पैसा, भ्रष्टाचार आणि पाकिस्तानमधून येणाऱ्या बनावट चलनाचा सामना करणे शक्‍य होणार आहे.
    - शिवराजसिंह चौहान
    मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री (ट्‌विटरवर)
  • हा क्रांतिकारक आणि ऐतिहासिक निर्णय आहे. उत्पन्नाचे ज्ञान स्रोत असलेल्या आणि पूर्णपणे कायदेशीर उत्पन्न मिळविणाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार नाही.
    - नितीन गडकरी
    केंद्रीय मंत्री (दिल्लीत पत्रकार परिषदेत)
  • नोटाबंदीचा निर्णय धाडसी आहे; पण घाई-गडबडीत तो जाहीर केला गेला. ज्यांच्या घरी लग्नसमारंभ आहेत किंवा शेतकरी, छोटे व्यापारी यांना या निर्णयाचा फटका बसला आहे. निर्णय जाहीर करण्यापूर्वी अंमलबजावणीची आवश्‍यक ती पावले उचलणे गरजेचे होते.
    - वीरभद्रसिंह
    हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री (शिमल्यात पत्रकारांशी बोलताना)

10 नोव्हेंबर

  • भाजपच्या 'मित्रां'ना नोटाबंदीचा निर्णय आठवडाभर आधीपासूनच ठाऊक होता. काळ्या पैशाला आळा घालण्याचा हेतू होता, तर 2000 ची नोट कशाला आणली? यातून भ्रष्टाचार वाढण्यास मदतच होईल. या निर्णयामुळे सामान्य माणसालाच फटका बसला आहे.
    - अरविंद केजरीवाल
    दिल्लीचे मुख्यमंत्री (व्हिडिओद्वारे)
  • ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. या निर्णयामुळे भविष्यात महागाई कमी होण्यास मदत होईल. तसेच, व्याजदरांतही कपात होईल.
    - अरुंधती भट्टाचार्य
    'एसबीआय'च्या अध्यक्षा
  • पंतप्रधान मोदी यांनी आता काळ्या पैशावर 'सर्जिकल स्ट्राईक' केले आहे. पण यामुळे जनतेमध्येच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकव्याप्त काश्‍मीरमधील 'सर्जिकल स्ट्राईक'नंतरही दहशतवाद्यांचे हल्ले सुरूच आहेत; त्यामुळे काळ्या पैशावरील 'सर्जिकल स्ट्राईक'चा काय उपयोग होईल, हे काळच सांगू शकेल.
    - शिवसेना
    ('सामना'तील अग्रलेख)

निर्णय/घडामोडी:

  • प्राप्तिकर खात्याने मुंबई आणि दिल्लीमध्ये व्यापारी व इतर ठिकाणी छापे घातले.
  • 'पे-टीएम'ने देशभरातील वृत्तपत्रांमध्ये पंतप्रधान मोदी यांना नोटबंदीच्या निर्णयाबद्दल अभिनंदन करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्या.
  • नोटाबंदीवर राज्यसभेत चर्चा व्हावी, यासाठी तृणमूल काँग्रेसने नोटीस दिली.
  • हैदराबादमध्ये नोटाबंदीविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल.

11 नोव्हेंबर

  • काळा पैसा रोखण्यासाठी घेतलेल्या सर्व निर्णयांना राष्ट्रीय जनता दलाचा पाठिंबा असेल. पण अजिबात तयारी न करता केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. आता जनतेला त्यांची दैनंदिन कामेही करता येईनाशी झाली आहेत. या सगळ्या संभाव्य अडचणी लक्षात घेत रिझर्व्ह बँक आणि प्रशासनाने तयारी करण्याची गरज होती.
    - तेजस्वी यादव
    बिहारचे उपमुख्यमंत्री (वाराणसीमध्ये पत्रकारांशी बोलताना)
  • सामान्य माणसाच्या विरोधात असणारा हा काळा निर्णय परत घ्या. देशभरातील बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. लोकांच्या वेदना वाढत चालल्या आहेत.
    - ममता बॅनर्जी
    पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री (ट्‌विटर)
  • नोटाबंदीच्या नावाखाली प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हा निर्णय जाहीर करण्यापूर्वीच पंतप्रधान मोदी आणि भाजपने त्यांच्या मित्रांना पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळे त्यांनी काळा पैसा रिचवला आहे.
    - अरविंद केजरीवाल, 
    दिल्लीचे मुख्यमंत्री (पत्रक)
  • नोटाबंदी हा पूर्ण विचाराअंती घेतलेला निर्णय आहे. यात अजिबात घाई-गडबड झालेली नाही. हा निर्णय घेण्यामागे एक धोरण आहे.
    - राजनाथसिंह
    गृहमंत्री (लखनौमधील एका कार्यक्रमात)

निर्णय/घडामोडी:

  • अरविंद केजरीवाल आणि 'पे-टीएम'चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्यात 'ट्‌विटर'वर वाकयुद्ध.
  • चेन्नई उच्च न्यायालय, अलाहाबाद उच्च न्यायालय, बंगळूर उच्च न्यायालयाने नोटाबंदीच्या विरोधातील जनहित याचिका फेटाळल्या.
  • दिल्ली, मुंबई, बंगळूर आणि कोलकात्यात प्राप्तिकर खात्याने घातलेल्या छाप्यांमध्ये 100 कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती सापडली.
  • विमानतळ, दिल्ली मेट्रो, रेल्वे व बस स्थानके येथे 500-1000 रुपयांच्या नोटांच्या संभाव्य वाहतुकीवर लक्ष ठेवण्याची गृह मंत्रालयाची सूचना.
  • 'व्होडाफोन'ने त्यांच्या 'प्री-पेड' युझर्ससाठी 'टॉक-टाईम' वाढविला आणि 24 तासांसाठी इंटनेट पॅकचीही मुदत वाढविली. 'पोस्ट-पेड' युझर्ससाठी बिल भरण्याची अंतिम मुदतही वाढविली.
  • दिल्लीत रांगेत उभे राहून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चार हजार रुपये काढले.

12 नोव्हेंबर

  • नोटाबंदीचा निर्णय सर्वसामान्यांसाठी त्रासदायक होता, हे माहीत आहे. पण त्रास सहन करूनही पाच-सहा तास रांगेत उभे राहणाऱ्या नागरिकांना माझा सलाम! यापूर्वीही बेहिशोबी मालमत्ता जाहीर करण्यासाठी आम्ही 50 दिवसांची मुदत दिली होती.
    - पंतप्रधान नरेंद्र मोदी
    जपानमधील भारतीयांसमोर बोलताना
  • राजकीय फायद्यासाठी नोटाबंदीच्या निर्णयावर टीका करणे हे बेजबाबदारपणाचे आहे. या निर्णयाचे परिणाम लक्षात घेता त्यासंदर्भात कोणतीही पूर्वसूचना देता येणे शक्‍य नव्हते. लोकांना त्रास होत आहे, याचे दु:खच आहे; पण देशाच्या दीर्घकालीन फायद्याचा निर्णय आहे.
    - अरुण जेटली
    (दिल्लीत पत्रकार परिषदेत)
  • काळा पैसा संपविण्याबाबत भाजप गंभीर असेल, तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बेहिशोबी निधी वापरल्याच्या आरोपांचीही चौकशी केली पाहिजे. उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
    - कपिल सिब्बल 
    काँग्रेसचे नेते (दिल्लीत पत्रकार परिषदेत)
  • सर्वसामान्यांना नोटाबंदीचा फटका बसणार नाही, असा हास्यास्पद दावा सरकार करत आहे. या निर्णयामुळे काळ्या पैशावर काहीही परिणाम होणार नाही. यातून फक्त सर्वसामान्यांनाच त्रास होणार आहे.
    - पी. चिदंबरम
    माजी अर्थमंत्री (चेन्नईत पत्रकारांशी बोलताना)
  • रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी. संपूर्ण देशातील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना आपल्या मदतीची गरज आहे.
    - राहुल गांधी
    काँग्रेसचे उपाध्यक्ष (ट्विटर)
  • ना आटा चाही, ना टाटा चाही; हमे तो पाकिस्तान में सन्नाटा चाही! बनावट चलनाद्वारे अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तान आणि 'आयएसआय'ला नोटाबंदीचा मोठा फटका बसला आहे.
    - राजनाथसिंह
    गृहमंत्री (लखनौमध्ये एका कार्यक्रमात)
  • निर्णय/घडामोडी :
  • 'रेस्ट इन पिस, ब्लॅक मनी' असा संदेश देणारे शिल्प प्रख्यात वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी केले.
  • नोटाबंदीवर संसद अधिवेशनात चर्चा करण्याची काँग्रेसने नोटीस दिली.

13 नोव्हेंबर

  • मी जाहीररित्या बँक कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. साधारणत: वर्षभरात केले जाते, तेवढे काम गेल्या एकाच आठवड्यात त्यांनी केले आहे. रांगेत उभे राहिलेल्यांना मदत करणाऱ्या तरुणांचेही मी आभार मानतो.
    - पंतप्रधान नरेंद्र मोदी
    (पणजीत एका कार्यक्रमात)
  • पंतप्रधान मोदी यांनी जनेतेची थट्टा केली आहे. त्यांनी नोटाबंदीचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा. पंतप्रधानांच्या भाषणानंतर जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच केंद्राने हा निर्णय मागे घ्यावा.
    - अरविंद केजरीवाल
    दिल्लीचे मुख्यमंत्री (दिल्लीत पत्रकार परिषदेत)
  • नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना प्रशासनाची तयारीच नसल्याचे पाहून धक्का बसला. आम्हाला सत्तेत येऊन अडीच वर्षे झाली आहेत. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अर्थमंत्रालयाने सुरवातीपासून तयारी करणे गरजेचे होते.
    - सुब्रह्मण्यम स्वामी
    भाजपचे खासदार (हॉंगकॉंगमधील 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'ला दिलेल्या मुलाखतीत)
  • मोदीजी, तुम्ही 50 दिवसांच्या त्रासाबद्दल बोलत आहात! पण 50 दिवस पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील का? असे झाले नाही, तर हा 'फर्जिकल स्ट्राईक' ठरेल.
    - लालूप्रसाद यादव
    राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष (ट्विटर)

निर्णय/घडामोडी

  • भाजपविरोधात लढण्यासाठी तृणमूल काँग्रेसने कट्टर विरोधक कम्युनिस्ट पक्षाला साद घातली.
  • 'टाटा डोकोमो'ने बिल भरण्याची मुदत वाढविली
  • नोटाबंदीच्या निर्णयाचे युरोपीय समुदायाने स्वागत केले.
  • नोटाबंदीमुळे छत्तीसगडमध्ये माओवाद्यांना फटका; पोलिसांचा अंदाज

14 नोव्हेंबर

  • नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांचाच जीव जात आहे. लोकांना कृपया त्रास देऊ नका. एकीकडे सर्वसामान्यांना त्रास होत आहे आणि दुसरीकडे अनेक अर्थतज्ज्ञांनी मंदीचे भाकीतही वर्तविले आहे.
    - ममता बॅनर्जी
    पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री (ट्‌विटर)
  • बँकेच्या बाहेर सर्वसामान्य लोक रांग लावून उभे आहेत. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे मित्र शांतपणे झोपले आहेत. 2000 रुपयांची नोट तयार करून भ्रष्टाचाराला आळा कसा घालणार, हे समजण्यापलीकडचे आहे.
    - अरविंद केजरीवाल
    दिल्लीचे मुख्यमंत्री (दिल्लीत पत्रकार परिषद)

निर्णय/घडामोडी

  • - भाजपविरोधात तिसरी आघाडी पुनरुज्जीवीत करण्याचे ममता बॅनर्जी यांचे प्रयत्न.
  • नोटाबंदीच्या विरोधातील जनहित याचिकेवर 15 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार.
  • 21 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत विमानतळावर वाहनांचे पार्किंग मोफत.
  • बँक कर्मचारी संघटनांची केंद्र सरकारवर टीका.

15 नोव्हेंबर

  • ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. हे सगळे सत्ता आणि राजकारण यासाठी नाही. हे देशाच्या जनतेसाठी आहे. देशातील गरीब जनतेच्या हितासाठी कोणत्याही राजकीय पक्षाशी चर्चा करण्यास आमची ना नाही.
    - संजय राऊत
    शिवसेनेचे खासदार (मुंबईत पत्रकारांशी बोलताना)
  • गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी आदित्य बिर्ला ग्रुपकडून 25 कोटी रुपयांची लाच घेतली.
    - अरविंद केजरीवाल
    दिल्लीचे मुख्यमंत्री (दिल्ली विधानसभेत)
  • नोटाबंदी हा फक्त एका व्यक्तीने घेतलेला निर्णय आहे. काळा पैसा असलेल्या बड्या लोकांना पंतप्रधान मोदी यांनी जाळ्यातून निसटू दिले. बँकेबाहेरील रांगेत तुम्हाला कुणी काळा पैसा असलेला दिसत आहे का?
    - राहुल गांधी
    काँग्रेसचे उपाध्यक्ष (मुंबईत पत्रकार परिषदेत)

निर्णय/घडामोडी

  • नोटाबंदीमुळे बँकेत उसळलेल्या गर्दीला सेवा देण्यासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांनाही तात्पुरते कामावर बोलवा; अर्थ मंत्रालयाची बँकांना सूचना.
  • हिवाळी अधिवेशनामध्ये नोटाबंदी आणि सर्जिकल स्ट्राईकवर चर्चा करण्याची विरोधी पक्षांची लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे मागणी.

16 नोव्हेंबर

  • मोदीजींच्या उद्योगपती मित्रांवर काहीही कारवाई झालेली नाही. ज्यांनी खरोखरीच काळा पैसा लपविला आहे, त्यांच्यावरही कारवाई झालेली नाही. पण सर्वसामान्य जनतेला रांगेत उभे केले जात आहे. तुमचे पैसे मोदींच्या त्या उद्योगपती मित्रांना दिले जाणार आहेत.
    - राहुल गांधी
    काँग्रेसचे उपाध्यक्ष (मुंबईत पत्रकार परिषदेत)
  • माझा या नोटाबंदीला पूर्ण पाठिंबा आहे. आता केंद्र सरकारने बेनामी संपत्तीविरोधात कारवाई करायला हवी.
    - नितीशकुमार
    बिहारचे मुख्यमंत्री (मधुबनीतील जाहीर सभेत)
  • नोटाबंदीच्या निर्णयामुळे होणारा त्रास कदाचित अजून महिनाभर सहन करावा लागेल. पण दीर्घकालीन विचार केला, तर याचा देशाला फायदा आहे.
    - राजनाथसिंह
    गृहमंत्री (हरियानातील कार्यक्रमात)

निर्णय/घडामोडी :

  • तृणमूल काँग्रेस, शिवसेना, आप आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली.
  • 'कॅश ऑन डिलिव्हरी'च्या प्रमाणात 30 टक्के घट झाल्याचा ई-कॉमर्स कंपन्यांचा अहवाल.
  • नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजुर करणारे छत्तीसगड हे पहिले राज्य.
  • नोटाबंदीविरोधातील जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार.

17 नोव्हेंबर

  • बँक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन! नोटाबंदीचा निर्णय मागे घेण्याचा प्रश्‍नच येत नाही.
    - अरुण जेटली
    अर्थमंत्री (दिल्लीत 'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत)

18 नोव्हेंबर

  • पाचशे आणि हजार रुपयांच्या चलनात असलेल्या 86 टक्के नोटा नव्या नोटांमध्ये बदलण्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. यासाठी सर्व मार्ग वापरण्यात येत आहेत.
    - अरूण जेटली
    केंद्रीय अर्थमंत्री
  • केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय घेऊन भारतीयांना मोठ्या अडचणीत टाकले. सरकार नोटाबंदीमुळे निर्माण झालेली परिस्थिती हातळण्यात अपयशी ठरले.
    - अखिलेश यादव, 
    मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
  • नोटाबंदीचा पाशवी निर्णय असून, आतापर्यंत देशभरात झालेल्या 55 मृत्यूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत.
    - रणदीप सुरजेवाला
    राष्ट्रीय प्रवक्ता, काँग्रेस

निर्णय/घडामोडी :

  • नोटाबंदीमुळे भारत आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामासंदर्भात नागपूरमध्ये मुंबई शेअर बाजारातील अर्थतज्ज्ञ आणि सीए यांचे चर्चासत्र.
  • कोलकता उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटाबंदीमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची माहिती देण्याचे आदेश दिले.

19 नोव्हेंबर

  • पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी माफी मागावी.
    - मीम अफजलकाँग्रेस नेता
  • तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन नोटाबंदीच्या निर्णयामुळे होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा केली.

20 नोव्हेंबर

  • नोटाबंदीचा निर्णय घेऊन 12 दिवस झाले तरी, नागरिकांच्या समस्या कमी होत हे पाहून दुःख होते. माझ्या राजकीय कारकिर्दीत नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे प्रथमच पाहत आहे.
    - चंद्रबाबू नायडू
    मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश
  • नोटाबंदीच्या निर्णयानंतरही भुवनेश्वरमधील वेश्‍याव्यवसायावर कोणताही परिणाम झाला नाही. याउलट व्यवसायामध्ये वाढ झाली आहे.
  • गुजरातमध्ये नोटा बदलून देणाऱ्यांकडून 16 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

21 नोव्हेंबर

  • रिझर्व्ह बँकेने एक कोटीपर्यंत कर्ज घेणाऱ्यांना दिलासा देत हफ्ता भरण्यासाठी आणखी 60 दिवसांची मुदत दिली. तसेच या काळात हफ्ता बाऊन्स झाल्याचे ग्राह्य धरण्यात येणार नसल्याचेही सांगितले.
  • लग्नासाठी अडीच लाख रुपये काढण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली. मात्र, यासाठी लग्नपत्रिका अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले.
  • बियाणांच्या खरेदीसाठी जुन्या नोटा चालणार असल्याची माहिती आरबीआयकडून देण्यात आली.
  • नोट नाही, पंतप्रधान बदला. नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात संसदेसमोर आंदोलन करणार.
    - अरविंद केजरीवाल
    मुख्यमंत्री, दिल्ली
  • नोटाबंदीच्या विरोधात रस्त्यावर उतरणार.
    - ममता बॅनर्जी
    मुख्यमंत्री, पश्‍चिम बंगाल
  • नोटाबंदीच्या निर्णयाला माझा पाठिंबा आहे.
    - मोहनलाल
    दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते

22 नोव्हेंबर

  • नोटाबंदीचा निर्णय हा काळ्या पैशाविरोधात सुरु केलेल्या लढाईची सुरवात आहे. नागरिकांनी आपली मते ऍपवर मांडावीत.
    - नरेंद्र मोदी
    पंतप्रधान (संसदीय समितीच्या बैठकीमध्ये बोलताना)
  • सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय एक चांगले पाऊल आहे.
    - किरण राव
    चित्रपट दिग्दर्शक

23 नोव्हेंबर

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला देशभरातील 93 टक्के नागरिकांनी पाठिंबा दिल्याचे ऍपवरून जाहीर करण्यात आले.

26 नोव्हेंबर

  • मी नोटाबंदीचे समर्थन करतो. कारण, ही काळ्यापैशाविरुद्धची लढाई आहे याबद्दल मीही सहमत आहे.
    - नितीशकुमार, 
    मुख्यमंत्री, बिहार

27 नोव्हेंबर

  • सोमवारी होणाऱ्या सर्व परीक्षा तात्पुरत्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
    - कुलगुरू, 
    उत्कल विद्यापीठ, भुवनेश्‍वर, ओडिशा
  • काळा पैसा जमा करणारे आता काळा पैसा पुन्हा चलनात आणण्यासाठी गरीबांचा वापर करत आहेत. मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी गरीबांचा वापर करू नये आणि काळा पैसा गरीबांच्या खात्यात जमा करू नये. सरकार बेहिशेबी मालमत्ता कायदा लागू करणार असून अशा प्रकारची मालमत्ता ठेवणाऱ्यांना अधिक अडचणीत आणणार आहे.
    - पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह अन्य काही पक्षांनी 28 नोव्हेंबर रोजी देशव्यापी बंदची घोषणा केली. या पार्श्‍वभूमीवर -
  • हा राजकीय निषेध आहे. आम्ही सोमवारी बंद पुकारलेला नाही.
    - प्रसाद हरीचंदन
    काँग्रेस नेते
  • नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी आणि कामगार वर्ग त्रस्त झाला आहे.
    - दिवाकर नायक
    नेते, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष
  • केवळ काही लोक, ज्यांच्याकडे काळा पैसा आहे तेच लोक नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करत आहेत. विरोधी पक्षांनी सोमवारी (दि. 28 नोव्हेंबर) आयोजित केलेल्या रॅलीचा लोकांवर काहीही परिणाम होणार नाही.
    - बसंत कुमार पांडा
    भारतीय जनता पक्षाचे ओडिशातील अध्यक्ष
  • काही राजकीय पक्षांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी 28 नोव्हेंबर रोजी बंद पुकारला आहे. त्यांच्याकडून रस्त्यावरील वाहतूक, रेल्वे वाहतूक, दुकाने, शासकीय कार्यालये, बँका आणि शैक्षणिक संस्था बंद पाडण्यात येतील, अशी शक्‍यता आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखून अत्यावश्‍यक सेवा सुरू राहाव्यात, यासाठी आवश्‍यक ती पूर्वतयारी करण्यात यावी.
    - गृह मंत्रालयाने जिल्हाधिकाऱ्यांनी 28 नोव्हेंबरपूर्वी दिलेली सूचना

28 नोव्हेंबर

  • विरोधी पक्षांनी देशव्यापी (भारत बंद) किंवा "जन आक्रोश दिन' पाळला.
  • ट्विटरवर काँग्रेसच्या बंदला किंवा "जन आक्रोश दिन'ला प्रतिसाद नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाचा पाठिंबा असल्याचे ट्विटरवर चित्र.
  • संपूर्ण देश त्रस्त झाला आहे. बँका, एटीएम्समध्ये पैसे नाहीत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे आतापर्यंत नोटाबंदीच्या निर्णयामुळे 80 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र नरेंद्र मोदी झोपेत असून ते कॅशलेस अर्थव्यवस्थेबद्दल बोलत आहेत. आज मी शपथ घेते की, मी जिवंत राहो अथवा न राहो मात्र मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकारणातून बाहेर काढणार. हुकूमशाही चालणार नाही.
    - ममता बॅनर्जी
    मुख्यमंत्री, पश्‍चिम बंगाल
  • आम्ही काळा पैसा बंद करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते (विरोधक) देश बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत.
    - नरेंद्र मोदी
    पंतप्रधान

29 नोव्हेंबर

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी काळ्या पैशाविरूद्ध काय करत आहेत? असा प्रश्‍न ते आठ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत विचारत होते आणि आता ते म्हणत आहेत की काळ्या पैशाविरूद्ध मोदींना असा निर्णय (नोटाबंदी) का घेतला.
    - अमित शाह
    भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष

30 नोव्हेंबर

  • लोकसभेने 30 नोव्हेंबर रोजी काळ्या पैशावरील कर विधेयक मंजूर केले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती वाटत असल्यानेच त्यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. हा निर्णय केंद्र सरकारवर उलटणार आहे.
    - मायावती
    बहुजन समाज पक्ष

1 डिसेंबर

  • ज्यावेळी तुम्ही नवा बदल स्वीकारता त्यावेळी गैरसोय निर्माण होते. ही गैरसोय फार काळ होईल, असे मला वाटत नाही. येत्या तीन महिन्यानंतर नोटाबंदीच्या निर्णयाचा परिणाम दिसू लागेल. त्यानंतर हळूहळू तुम्हाला मिळालेले लाभ दिसून येतील.
    - अरुण जेटली
    केंद्रीय अर्थमंत्री

2 डिसेंबर

  • भ्रष्टाचारामुळे प्रगती खुंटते आणि गरीब, नवमध्यमवर्गीयांच्या स्वप्नावर त्याचा परिणाम होतो. आठ नोव्हेंबरच्या निर्णयामुळे भारतातील आर्थिक बदलामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या छोट्या व्यावसायिकांनी कॅशलेस होण्याची मोठी संधी. एकविसाव्या शतकात भारतामध्ये भ्रष्टाचाराला स्थान नाही.
    - पंतप्रधान नरेंद्र मोदी

3 डिसेंबर

  • नोटाबंदीच्या निर्णयामुळे लवकरच व्याजाचे आणि कराचे दर कमी होतील.
    - अरुण राम मेघवाल
    केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

4 डिसेंबर

  • नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्था उध्वस्त होत आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे भ्रष्टाचार दूर झाला तर "मोदी, मोदी' घोषणा द्यायला तयार आहे.
    - अरविंद केजरीवाल
    मुख्यमंत्री, नवी दिल्ली

5 डिसेंबर

  • भारतासारख्या देशात कॅशलेस अर्थव्यवस्था निर्माण करणे हे केवळ स्वप्न आहे. भारतात 100 टक्के कॅशलेस व्यवस्था उभारणे शक्‍य नाही. जग कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे जात आहे. मात्र भारताची सामाजिक व्यवस्था आणि लोकांच्या सवयीमुळे रोखीचे व्यवहार सुरूच राहणार आहेत.
    - नितीश कुमार
    मुख्यमंत्री बिहार.

6 डिसेंबर

  • विरोधकांची हिंमत असेल तर त्यांनी संसदेमध्ये नोटाबंदी या विषयावर चर्चा करावी.
    - अरुण जेटली
    केंद्रीय अर्थमंत्री

7 डिसेंबर

  • इतरांनी जे काही केले आहे, तेच करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपा मार्ग होता. मात्र त्यांनी कठीण मार्ग स्वीकारला. सात दशके सुरु असलेली तथाकथित सामान्य व्यवस्था मोदी यांनी अस्थिर केली. या निर्णयाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी मोदी तयार आहेत.
    - अरुण जेटली
    केंद्रीय अर्थमंत्री
  • इस्लामिक बँक स्थापन करण्याच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्णयाला शिवसेनेच्या सदस्याचा विरोध. बँकिंग व्यवस्था धर्माधारित असू नये.
  • नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यापासून 4 लाख कोटी रुपये चलनात आणले आहेत. अद्यापही 10.5 कोटी रुपये चलनात आणणे बाकी आहे.
    - ऊर्जित पटेल
    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष

8 डिसेंबर

  • परदेशांमध्येही काळे धन हुडकून काढण्यात यश मिळालेले नाही. मात्र काळे धन बाहेर काढण्याच्या नावाखाली केंद्र सरकारने जमीन, बॅंक ठेवी, सोने, हिरे यांच्या माध्यमामधून धन निर्माण केले आहे. केंद्र सरकार हे जास्तीत जास्त भांडवलवादी होत आहे. नोटाबंदीच्या या निर्णयामुळे लोकांना प्रचंड त्रास होत असून ते आर्थिकदृष्टयाही असुरक्षित झाले आहेत. या निर्णयामुळे 90 लोकांवर प्राण गमाविण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच या सर्व प्रकाराची जबाबदारी स्वीकारावयास हवी. दुदैवाचे हे दशावतार कधी थांबणार, हे आता कोणालाच माहिती नाही.
    - ममता बॅनर्जी
    प.बंगालच्या मुख्यमंत्री
  •  नोटाबंदीच्या निर्णयाचा ग्रामीण भारत व मजूरांना फायदा होणार.
    - नरेंद्र मोदी
    पंतप्रधान
  • 'ना चिठ्ठी ना कोई संदेश, लाइन में लगाके देश, तुम चले गए परदेश...'
    - धनंजय मुंडे
    विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते
  • आज देशातील जनता पन्नास दिवस पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत. परंतु आता 30 दिवस झाले तरी परिस्थिती पूर्ववत होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे आता जर जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर देशातील परिस्थिती हाताबाहेर जाईल
    - अजित पवार
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते
  • बेहजनींनी दलित आणि आंबेडकरांच्या नावाने राजकारण केले आहे. त्यांच्यासाठी काहीही केलेले नाही. ज्या काँग्रेसने आंबेडकरांचा अवमान केला त्या काँग्रेसला त्या पाठिंबा देतात. तर भारतीय जनता पक्षाने आंबेडकरांशी संबंधित 'पंचतीर्थ'ची निर्मिती केली. बेहजनींना आंबेडकरांच्या नावाने काहीही करण्याचा अधिकार नाही. त्या केवळ दलितांच्या नावावर नोटा गोळा करतात.
    - श्रीकांत शर्मा
    राष्ट्रीय सचिव, भारतीय जनता पक्षाचे
  • भाजपच्या कार्यक्रमपत्रिकेवरील काशी विश्‍वनाथ, कृष्ण जन्मभूमी हे विषय, रोहित वेमुला व उना येथील घटनेत घेतलेली दलितविरोधी भूमिका यामुळे या पक्षाचे भवितव्य धोक्‍यात आले आहे.'' डॉ. आंबेडकर यांनी देशातील राज्यघटनेची रचना धर्मनिरपेक्षतेवर आधारित केली आहे. त्यात बदल करून भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) राज्यघटना हिंदुत्वावर आधारित करीत आहे, अशी टीका करून त्या म्हणाल्या, दलित व मागासवर्गीयांसाठी दिलेले आरक्षण रद्द करण्याचाही त्यांचा डाव आहे.
    - मायावती
    बहुजन समाज पक्ष

9 डिसेंबर

  • सरकार चर्चेपासून दूर पळत आहे. जर त्यांनी मला बोलण्याची परवानगी दिली तर भूकंप होईल.
    - राहुल गांधी
    काँग्रेस पक्ष उपाध्यक्ष
  •  विरोधी पक्ष संसदीय कामकाजात अडथळा आणत असल्याचा सत्ताधारी पक्षाचा आरोप फेटाळून लावत आम्ही संसदीय कामकाजात अडथळा निर्माण करत नसून आम्हाला केवळ नोटाबंदीच्या मुद्यावर चर्चा हवी आहे, असे काँग्रेसने स्पष्ट केले.
    - मल्लिकार्जुन खर्गे
    काँग्रेस नेते
  • 'नोटाबंदीच्या निर्णयानंतर परिस्थिती निवळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 50 दिवस मागितले, त्यातील 30 दिवस झाले आहेत. 20 दिवस थांबा, अच्छे दिन येतील. नोटाबंदीवर संसदेतील चर्चेअंती मतदान झाले तर शिवसेना सामान्यांच्या हालअपेष्टांच्या बाजूने मतदान करेल.
    - उद्धव ठाकरे
    शिवसेना
  • धरणे आंदोलन करण्याची संसद ही जागा नव्हे. संसदेचे कामकाज रोखून धरणे म्हणजे बहुमताचा आवाज दपडून टाकण्यासारखे आहे. त्यामुळे कृपा करून तुमचे अपेक्षित काम करा,
    - प्रणव मुखर्जी
    राष्ट्रपती

10 डिसेंबर

  • आम्हाला धमक्‍या देऊ नका. आम्ही घाबरत नाही. आम्ही सविस्तर चर्चेस तयार आहोत. मात्र तुम्ही चर्चा सोडून मध्येच निघून जाऊ नये. अशा धमक्‍यांनी कोणालाही काही होणार नाही. तुम्ही काय करता ते आम्ही पाहू. तुम्ही तुमच्या पक्षाला पुनरुज्जीवित करू शकत नाही. लोकांकडे न जाता किंवा लोकप्रतिनिधींना सभागृहात ऐकून न घेता तुम्ही पळून जात आहात. तुम्ही दोन्ही बाजूने बोलत आहात. त्यामुळेच मी म्हणत आहे की तोंडी धमक्‍या देऊन संसदेचा आणि लोकशाहीचा अवमान करत आहोत.
    - वेंकय्या नायडू
    केंद्रीय मंत्री
  •  नोटाबंदीमुळे दहशतवाद आणि नक्षलवादाचा कणा मोडला.
    - नरेंद्र मोदी
    पंतप्रधान

11 डिसेंबर

  • नोटाबंदीमुळे नागरिकांची कुचंबना होत आहे. त्यातून मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. नवीन पर्याय स्वीकारण्यासाठी थोडा त्रास होणार. शहरात चलन तुटवडा जाणवत आहे. मात्र लवकरच यावर मार्ग निघेल. तर ग्रामीण भागात नोटाबंदीमुळे फार मोठी अडचण निर्माण झालेली नाही.
    - सदाभाऊ खोत
    कृषी राज्य मंत्री

12 डिसेंबर

  • नोटाबंदीची योजना रुळावरून घसरली आहे हे मोदीबाबूंना माहीत आहे. त्यामुळे भाषणं देण्याशिवाय त्यांना पर्यायच उरलेला नाही.
    - ममता बॅनर्जी
    मुख्यमंत्री पश्‍चिम बंगाल

13 डिसेंबर

  • पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहणाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. एकदा त्यांनी रांगेत उभ्या असलेल्या लोकांसमोर येऊन भाषण द्यावे,"मोदी गो बॅक' चे नारे लागल्याशिवाय राहणार नाही.
    - असदुद्दीन ओवेसी
    एमआयएमचे अध्यक्ष खासदार
  • देशातील 45 कोटी नागरिक हे दैनंदिन कमाईवर अवलंबून आहेत. गेल्या 30 दिवसांत त्यांना सरकारच्या निर्णयाचा फटका बसला आहे. हा देशभरातील गरीबांवर करण्यात आलेला हल्ला आहे. देशातील गरीबांना या निर्णयाने फटका बसला आहे; तर श्रीमंतांना काहीही फरक पडलेला नाही.
    - चिदंबरम
    माजी केंद्रीय मंत्री

14 डिसेंबर

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची वैयक्तिक माहिती, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे ते मला बोलू देण्यासाठी घाबरतात.
    - राहुल गांधी
    काँग्रेसचे उपाध्यक्ष
  • केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दहा वर्षांच्या काळामध्ये प्रचंड गैरव्यवहार झाले. काँग्रेसला गैरव्यवहारांचा मोठा इतिहास असल्यानेच या पक्षाला आता नोटाबंदीचा त्रास होतो आहे. केंद्राने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याने जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या भारताचा प्रवास आता "लेस कॅश' आणि "डिजिटल पेमेंट'च्या दिशेने सुरू होईल, अशी टिका पत्रकार परिषदे दरम्यान केली.
    - अरुण जेटली
    केंद्रीय अर्थमंत्री

15 डिसेंबर

  • मोदी यांनी देशाचा फुटबॉल केला.
    - लालूप्रसाद यादव
    राष्ट्रीय जनता दलाचे नेते
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेला काळा पैसा गरिबांच्या खात्यात जमा करण्याची मागणी.
    - मायावती
    बहुजन समाज पक्ष प्रमुख.

17 डिसेंबर

  • नसबंदी प्रमाणे नोटबंदीचे होईल.
    - लालू प्रसाद, 
    राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष
  • नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर, लोकांवर जे विपरीत परिणाम झाले आहेत, त्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि निर्णय घेणाऱ्यांना टाळता येणार नसून, सर्वांत वाईट परिणाम शेती उद्योग आणि लघु उद्योगावर झाला आहे. येत्या काळात या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार असून, विविध क्षेत्रांमध्ये कामगार कपातीचे संकट ओढावण्याची भीती माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत सांगितले. देशातला काळा पैसा बाहेर काढण्याच्या सरकारच्या निर्णयाला आपले समर्थन आहे. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीत चूक झाली डॉक्‍टरने ऑपरेशन केलं, मात्र नंतर लक्ष न दिल्यानं पेशंट दगावला अशी स्थिती झाली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली.
    - शरद पवार
    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील 40 कोटी कामगार बाधित झाले अहेत, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे.
    - आदर्श शास्त्री
    आम आदमी पक्षाचे आमदार

18 डिसेंबर

  • मोदी खोटारडे असल्याचे नागरिक सांगतात.
    - राहुल गांधी
    काँग्रेस उपाध्यक्ष
  • ते स्वत:च्या प्रेमात आहेत. ते अर्थतज्ज्ञांकडून येणारे सल्ल्यांकडे लक्ष देत नाहीत. ते आत्मकेंद्रित राजकारण करत आहेत. कोणताही अर्थतज्ज्ञ नोटाबंदीला पाठिंबा देत असल्याचे मला आढळलेले नाही. सध्या काळा पैसा धारकाला नव्हे तर गरीबांना आणि मध्यवर्गीय नागरिकांना त्रास होत आहे.'
    - मनोज झा
    राष्ट्रीय जनता दल नेते
  • पाचशे व हजाराच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय 2014 मध्ये निश्चित झाला होता. सरकारने हा निर्णय जाहीर करण्यापुर्वी खबरदारीच्या उपाययोजना करायला हव्या होत्या. 
    -सुब्रमण्यम स्वामी
    खासदार, भाजप 

19 डिसेंबर

  • नोटा जमा करण्याची मुदत संपण्यापुर्वी नागरिकांना एका खात्यावर केवळ एकदाच पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम भरता येणार. त्यानंतर अधिक रक्कम जमा करावयाची झाल्यास खातेधारकाची चौकशी

20 डिसेंबर

  • वार्षिक दोन कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या छोट्या व्यावसायिकांना कार्ड किंवा डिजिटल माध्यमातून पैसे स्वीकारल्यास पुढील वर्षात तुलनेने कमी कर भरावा लागणार आहे. येत्या अर्थसंकल्पात ही कर सवलत जाहीर केली जाणार आहे.

21 डिसेंबर

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नोटा बदलण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून मागील 43 दिवसांमध्ये आतापर्यंत 126 वेळा नियम बदलले आहेत. RBI ही आता 'रिव्हर्स बँक ऑफ इंडिया' बनली आहे.
    - रणदीप सुरजेवाला
    काँग्रेस नेते

नवा निर्णय कोणता?

  • बँकांमध्ये चौकशीविना पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास सुरवात, "केवायसी' असलेल्या खातेधारकांना बॅंक कितीही वेळा पैसे जमा केले तरी प्रश्‍न विचारणार नाही; आरबीआयचे स्पष्टीकरण 
  • देशभरातील कर्मचाऱ्यांचे पगार ई-पेमेंट किंवा धनादेशाद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा करणे बंधनकारक करणारा अध्यादेश मंजुर 

22 डिसेंबर

  • नोटाबंदी हा काळा पैशावरील शेवटचा उपाय नाही. भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी पुढे आणखी निर्णय घेतले जातील.

    - अरविंद पांगरिया
    उपाध्यक्ष, नीति आयोग 

23 डिसेंबर

  • नोटाबंदी हे भारत सरकारने उचललेले चुकीचे पाऊल आहे. यामुळे केवळ अर्थव्यवस्थेला धोका नसून, कोट्यवधी गरीब नागरिकही कंगाल बनले आहेत. हे अतिशय अनैतिक पाऊल आहे. नोटाबंदी ही जनतेच्या मालमत्तेची मोठी लूट आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात सक्तीने नसबंदी करण्याची मोहीम सुरू केली होती. आताच्या सरकारने अशाच प्रकारे निर्णय घेतला आहे.
    - स्टीव्ह फोर्ब्ज
    फोर्ब्ज नियतकालिकाचे मुख्य संपादक (मासिकातील लेख) 
  • मोदींनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा आठ हजार कोटींचा गैरव्यवहार आहे. आपल्या श्रीमंत मित्रांचे कर्ज माफ करण्यासाठी मोदींनी हा निर्णय घेतला असून, या मित्रांकडूनही त्यांनी पैसे घेतले असतील.
    - अरविंद केजरीवाल 
    आम आदमी पक्ष 
  • नोटाबंदी ही भ्रष्टाचाराविरुद्ध किंवा काळ्या पैशाविरुद्ध नसून तो आर्थिक दरोडा आहे.
    - राहुल गांधी
    उपाध्यक्ष काँग्रेस

24 डिसेंबर

  • जसे इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय चुकल्याचे मान्य केले होते; तसेच मोदींनीदेखील नागरिकांवर दुष्परिणाम करणारा नोटाबंदीचा निर्णय चुकला हे मान्य करावे.
    - पी. चिदंबरम 
    काँग्रेस नेते

25 डिसेंबर

  • 'काळ्या पैशाविरोधातील लढाई असामान्य असून त्यातून माघार घेण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. सरकारने बेनामी संपत्ती विरोधातील कायदा अधिक धारदार केला आहे. आगामी काळात हा कायदा आपले काम करेल. नोटाबंदीनंतर सातत्याने नियमांमध्ये झालेला बदल हा जनतेला त्रास होऊ नये यासाठी संवेदनशील सरकारचा प्रयत्न होता.
    - नरेंद्र मोदी 
    पंतप्रधान (मन की बात कार्यक्रमात)

नवा निर्णय: 

  • डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी उद्यापासून लकी ग्राहक योजना आणि लकी व्यापारी योजनेची सुरुवात 

27 डिसेंबर

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर जनतेकडे मागितलेला 50 दिवसांचा वेळ संपत आला असून, आता त्यांनीच जनतेकडून देण्यात येणाऱ्या शिक्षेसाठी आवडीचा चौक निवडावा
    - लालूप्रसाद यादव 
    अध्यक्ष, राष्ट्रीय जनता दल (राजद)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com