हरियाणामध्ये 22 वर्षीय गायिका हर्षिता दाहियाची हत्या

वृत्तसंस्था
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

हर्षिता ही साधारणतः संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कार्यक्रम संपवून मोटारीने घरी निघाली असता तिच्यावर दोन अज्ञात मोटारसायकलस्वारांनी गोळीबार केला. गोळीबारानंतर तेथून त्यांनी पळ काढला. यात तिचा जागीच मृत्यु झाला.

पानिपत : हरियानातील पानिपत जिल्ह्यात 22 वर्षीय गायिका हर्षिता दाहिया हिच्यावर अज्ञातांनी गोळ्या घालून तिची (मंगळवारी) हत्या केली. ती एक कार्यक्रम संपवून घरी जात असताना तिच्यावर गोळीबार करण्यात आला.

हर्षिता ही साधारणतः संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कार्यक्रम संपवून मोटारीने घरी निघाली असता तिच्यावर दोन अज्ञात मोटारसायकलस्वारांनी गोळीबार केला. गोळीबारानंतर तेथून त्यांनी पळ काढला. यात तिचा जागीच मृत्यु झाला.

पानिपत जिल्ह्याचे मुख्य पोलिस अधिक्षक राहुल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी गाडी अडवल्यावर गाडीत असलेल्या आणखी दोघांना खाली उतरवले आणि नंतर हर्षितावर गोळीबार केला. हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही. प्राथमिक तपासात हर्षिता ही दिल्लीतील नेरळ या भागात वास्तव्यास होती. तिने तिच्या मेव्हण्याच्य़ा विरोधात बलात्काराची तक्रार काही दिवसांपुर्वी केली होती. तिचा मेहुणा आता कारागृहात आहे. तसेच, तिच्या आईचा काही महिन्यापुर्वी दिल्लीमध्ये खून झाला होता, त्याची ती एकमेव साक्षीदार होती.

मिश्रा यांना बलात्कार केसविषयी अधिक माहीती विचारली असता, त्यांनी तपास चालू आहे असे सांगितले. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी अज्ञांताविरुद्ध गुन्हा दाखल केला असुन हर्षिताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पानिपत येथील सरकारी रुग्णालयात पाठवला आहे.