'डेरा'च्या मुख्यालयावर छापा; आलिशान मोटार, जुन्या नोटा जप्त

वृत्तसंस्था
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

शिरसा: पंजाब-हरियाना उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज डेरा सच्चा सौदाचा मुख्यालयावर छापा टाकण्यात आला. या वेळी एका आलिशान मोटारीसह, एक ओबी व्हॅन, जुन्या चलनी नोटा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती एका प्रशासकीय अधिकाऱ्याने दिली. या कारवाईत दोन खोल्याभरून रोकड जप्त करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

शिरसा: पंजाब-हरियाना उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज डेरा सच्चा सौदाचा मुख्यालयावर छापा टाकण्यात आला. या वेळी एका आलिशान मोटारीसह, एक ओबी व्हॅन, जुन्या चलनी नोटा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती एका प्रशासकीय अधिकाऱ्याने दिली. या कारवाईत दोन खोल्याभरून रोकड जप्त करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

डेराप्रमुख राम रहीम याला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर संबंधित आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सुरक्षा यंत्रणेच्या मदतीने ही कारवाई सुरू केली असून, कडेकोट बंदोबस्तात टाकलेल्या छाप्यात क्रमांक नसलेली मोटार, लेबलविरहीत औषधे, हार्डडिस्क ड्राईव्ह व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या वेळी 7 हजार रुपयांच्या जुन्या नोटा तसेच 12 हजार रुपयांच्या चलनी नोटाही आढळून आल्याची माहिती हरियाना माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक सतीश मेहरा यांनी दिली.

दरम्यान, या कारवाईत दोन खोल्या भरून रोकड जप्त करण्यात आल्याची चर्चा सुरू असून, याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. ही कारवाई पूर्ण होताच त्याबाबतचा अहवाल न्यायालयाकडून नियुक्त आयुक्त ए. के. एस. पवार उच्च न्यायालयाकडे सादर करणार आहेत.

गुरमीतने काढली स्वतःची नाणी
छाप्यादरम्यान डेराच्या मुख्यालयात प्लॅस्टिकची काही नाणी आढळून आली आहेत. यावरुन गुरमीतने स्वतःचे चलनही काढल्याची माहिती समोर आली असून, 5,10,15 आणि 20 रुपयांच्या या नाण्यांचा वापर अंतर्गत चलन म्हणून होत असल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. या नाण्यांवर ''धन धन सत्‌गुरू तेरा ही आसरा' असा मजकूर आहे.

अशी सुरू आहे कारवाई
न्यायालयाने नियुक्त केलेले आयुक्त व निवृत्त न्यायाधीश ए. के. एस. पवार सकाळी 8 वाजता येथे दाखल झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू झाली. याचे छायाचित्रणही करण्यात आले असून, लगतच्या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वाहतुकीचे सर्व रस्ते बंद केले आहेत. परवानगीशिवाय कोणालाही डेराच्या मुख्यालयात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला असून, पत्रकारांनाही या कारवाईपासून दूर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, अफवा पसरू नयेत म्हणून येथील दूरसंचार व इंटरनेट सेवा 10 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवली जाणार आहे.

डेरा व्यवस्थापनाने या कारवाईस अनुकूलता दाखविली असून, ही कारवाई शांततेत पार पडेल अशी आम्हाला आशा आहे.
- बी. एस. संधू, हरियानाचे पोलिस महासंचालक

आम्ही नेहमीच कायद्याचे पालन केले असून, कारवाईदरम्यान पोलिस व प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. सर्वांनी शांतता कायम राखावी, असे आवाहन मी करतो.
- प्रमुख, डेरा विपश्‍यना इन्सान