बाबरी मशिद प्रकरणाची सुनावणी 6 एप्रिलला

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

नवी दिल्ली - बाबरी मशिद प्रकरणाची सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली असुन पुढील सुनावणी आता 6 एप्रिल रोजी होणार आहे.

नवी दिल्ली - बाबरी मशिद प्रकरणाची सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली असुन पुढील सुनावणी आता 6 एप्रिल रोजी होणार आहे.

अयोध्या येथे 1992 मध्ये वादग्रस्त राम जन्मभूमीस्थळावरील बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह आरोपींवर गुन्हेगारी कटाचा आरोप हटविण्याच्या आदेशाविरुद्ध दाखल याचिकेच्या सुनावणीचा निर्णय 6 मार्चला घेतला होता. त्यानंतर न्यायाधीश घोष आणि न्यायाधीश आर. एफ. नरीमन यांचा समावेश असेलले खंडपीठ आज(गुरुवारी) या प्रकरणाची सुनावणी करेल असे काल झालेल्या सुनावणीत सांगण्यात आले होते. न्यायाधीश नरीमन बुधवारी न्यायालयात उपस्थित नव्हते. न्यायाधीश दीपक गुप्ता यांचाही समावेश असलेल्या खंडपीठाने नरीमन उद्या न्यायालयात येतील त्या वेळी या प्रकरणावर सुनावणी घेतली जाईल, असे स्पष्ट केले होते.

सध्या निधन झालेले हाजी महबूब अहमद यांच्या वकिलाने सुरवातीला सत्र न्यायालयातील प्रकरणाच्या सुनावणीच्या स्थितीसंबंधी अहवाल दाखल करण्यासाठी एक आठवड्याची मुदत मागणारी एक याचिका दाखल केली होती तसेच भाजप नेत्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील के. के. वेणुगोपाल यांनी सांगितले होते, की काही कागदपत्रे दाखल करता येण्यासाठी या प्रकरणाची सुनावणी चार आठवड्यांनंतर घेतली गेली पाहिजे.

या सर्व बाबींचा विचार करुन न्यायालयाने सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.