'योगी' नाम जपा अन्यथा उत्तर प्रदेश सोडा 

पीटीआय
रविवार, 16 एप्रिल 2017

या पोस्टर्सवर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि योगी आदित्यनाथ यांनी स्थापलेल्या युवा ब्रिगेडचे जिल्हा समितीचे प्रमुख असल्याचा दावा करणारे नीरज शर्मा पांचाली यांची छायाचित्रेही छापण्यात आली आहेत.

मेरठ : उत्तर प्रदेशात राहायचे असेल तर 'योगी योगी' म्हणा अशा आशयाचे पोस्टर्स येथील हिंदू युवा वाहिनीच्या जिल्हा समितीने म्हटले आहे. ही पोस्टर्स जिल्हा आयुक्त, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाजवळही लावण्यात आली आहेत.

या पोस्टर्सवर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि योगी आदित्यनाथ यांनी स्थापलेल्या युवा ब्रिगेडचे जिल्हा समितीचे प्रमुख असल्याचा दावा करणारे नीरज शर्मा पांचाली यांची छायाचित्रेही छापण्यात आली आहेत. तसेच 'प्रदेश में रहना है तो योगी योगी कहना है' असा मजकूरही यावर छापण्यात आला आहे. याबाबत स्थानिक गुप्तचर विभागाला सविस्तर अहवाल देण्याचे आदेश दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षक जे. रवींद्र गौर यांनी दिली. आम्हाला अहवाल मिळाल्यानंतरच आम्ही याबाबत गुन्हा दाखल करून कारवाई करू, असे त्यांनी या वेळी सांगितले. 

याबाबत युवा वाहिनीचे सदस्य नागेंद्र प्रताप सिंह यांना संपर्क साधला असता पांचाली यांची महिनाभरापूर्वीच या पदावरून हकालपट्टी करण्यात आली असून, ते संस्थेला बदनाम करण्यासाठी असे कृत्य करत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले आहे.