फरार हनीप्रीत इन्सान न्यायालयासमोर शरणागती पत्करणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

"बाबा रामरहिमच्या अटकेनंतर अत्यंत नैराश्‍यग्रस्त झाले असून न्यायालयाने "पिताजीं'ना शिक्षा सुनाविल्यानंतर मेंदु काम करेनासा झाल्याची,' प्रतिक्रिया हनीप्रीतने व्यक्‍त केली

नवी दिल्ली - बलात्कार प्रकरणी दोषी आढळलेला बाबा गुरमित राम रहिम सिंग याची फरार असलेली दत्तक मुलगी हनीप्रीत इन्सान उर्फ प्रियांका तनेजा ही लवकरच न्यायालयासमोर शरणागती पत्करण्याची शक्‍यता आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात तिने जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

बाबा राम रहिम याला शिक्षा सुनाविण्यात आल्यानंतर हरयाना व पंजाब या राज्यांतील काही भागांत गेल्या 25 ऑगस्ट रोजी उसळलेल्या हिंसाचारानंतर हनीप्रीत फरार झाली होती. यानंतर तिच्यावर व "डेरा सच्चा सौदा'च्या अन्य काही वरिष्ठ सदस्यांवर हिंसाचारास चिथावणी दिल्यासंदर्भातील आरोप निश्‍चित करण्यात आला होता. यानंतर हनीप्रीत ही नेपाळला पळून गेल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली होती. मात्र तिने नेपाळला गेल्याचे वृत्त फेटाळून लावले होते.

माध्यमांनी बाबा राम रहिम व आपल्यामधील पिता-कन्येचे पवित्र नाते कलंकित केल्याचा आरोप हनीप्रीतने यावेळी केला. याचबरोबर, "बाबा रामरहिमच्या अटकेनंतर अत्यंत नैराश्‍यग्रस्त झाले असून न्यायालयाने "पिताजीं'ना शिक्षा सुनाविल्यानंतर मेंदु काम करेनासा झाल्याची,' प्रतिक्रिया तिने व्यक्‍त केली.