पती हुंडा मागत असल्याने 'रेडिओ जॉकी'ची आत्महत्या

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

'रेडिओ जॉकी' म्हणून काम करणाऱ्या एका विवाहित महिलेने लष्करातील मेजर असलेला पती हुंडा मागत असल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हैदराबाद - 'रेडिओ जॉकी' म्हणून काम करणाऱ्या एका विवाहित महिलेने लष्करातील मेजर असलेला पती हुंडा मागत असल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 'रेडिओ जॉकी' महिलेने मेजर वैभव विशाल यांच्याशी विवाह केला होता. लष्कराने दिलेल्या निवासस्थानी हे दोघे राहत होते. मागील आठवड्यात महिलेने निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आत्महत्येचे प्रकरण नोंद करून घेतले. मात्र मृत महिलेच्या माहेरकडील मंडळींनी वैभव हुंडा मागत असल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी हुंडाबळीचे प्रकरण दाखल करून घेतले.

आत्महत्या केल्याचे सर्वात प्रथम वैभव यांनाच आढळून आले. मात्र त्याच रात्री वैभव यांना अस्वस्थ वाटू लागल्याने लष्कराच्या रूग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. 'प्रकृती स्वस्थ झाल्यानंतर त्यांना आमच्या ताब्यात देणार असल्याची खात्री लष्कराने दिली आहे', अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली.