बुलेट ट्रेनमुळे भारत-जपान संबंध आणखी दृढ - शिंजो अबे

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

जपान J आणि इंडिया I एकत्र आल्यास जय हा शब्द तयार होतो. जय जपान, जय इंडिया. मला गुजरात खूप आवडतो. यापुढे आपले संबंध असेच राहतील. मी जेव्हा अहमदाबाद येईल, तेव्हा बुलेट ट्रेनने प्रवास करू.

अहमदाबाद - बुलेट ट्रेनमुळे भारत आणि जपान यांच्यातील संबंध आणखी दृढ झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्टीचे नेते आहेत. या बुलेट ट्रेनच्या भूमिपूजनामुळे मी खूप आनंदी असल्याचे जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी सांगितले.

भारत आणि जपान यांच्या मैत्रीतून प्रत्यक्षात उतरलेल्या अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे भूमिपूजन आज (गुरुवार) जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्या हस्ते पार पडले. शिंजो अबे दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. मुंबई-अहमदाबाद मार्गावरील ५०८ किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची सुरवात झाली. दोन्ही देशांदरम्यान संबंध मजबूत करण्यासाठी जपानच्या पंतप्रधानांचा दौरा महत्त्वपूर्ण समजला जात आहे. 

अबे म्हणाले, की हा ऐतिहासिक दिवस असून, भारतात सुरु असलेल्या बुलेट ट्रेनच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे मला खूप आनंद आहे. दोन वर्षांपूर्वी ही ट्रेन सुरु करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. दहा वर्षापूर्वी मी भारतीय संसदेत बोलण्याची संधी मिळाली होती. भारत आणि जपान यांच्यातील संबंध चांगले आहेत. हिंदी आणि प्रशांत महासागरांचे हे संबंध उज्ज्वल भविष्याकडे जातील अशी आशा आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जपान खंडर बनले होते. त्यानंतर जपानमधील सर्वांनी एकत्र येत 1964 मध्ये जपानच्या हायस्पीड रेल्वे सेवेची सुरवात झाली. यामुळे जपानच्या अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले. सुझुकी आणि टोयोटासारख्या कंपन्यांना जोडणारी ही यंत्रणा झाली. त्यामुळे जपान विकसित देशांच्या यादीत जाऊन बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दूरदर्शी नेते आहेत. दोन वर्षापूर्वी त्यांनी बुलेट ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि न्यू इंडियाच्या दिशेने पाऊल टाकले. जपानचे 100 हून अधिक इंजिनियर भारतात आले असून, ते भारतीय इंजिनियरबरोबर काम करत आहेत. हे दोन्ही इंजिनियर एकत्र आले असून कोणतेही काम अशक्य नाही. जपानमध्ये बुलेट ट्रेन सुरु झाल्यापासून एकही अपघात झालेला नाही, याचा आनंद आहे. भारत आणि जपान यांच्यातील संबंध अनेक बाबींवर वाढीस लागले आहेत. 

जपान J आणि इंडिया I एकत्र आल्यास जय हा शब्द तयार होतो. जय जपान, जय इंडिया. मला गुजरात खूप आवडतो. यापुढे आपले संबंध असेच राहतील. मी जेव्हा अहमदाबाद येईल, तेव्हा बुलेट ट्रेनने प्रवास करू, असे अबे यांनी सांगितले.

रेल्वेमंत्री पियुष गोयल म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या न्यू इंडिया कल्पेनला गती मिळाली आहे. तर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मला विश्वास आहे, की याच ट्रेनमधून येऊन जपानचे पंतप्रधान मुंबईत ट्रेनचे उद्घाटन करतील.