देवेच्छा असल्यास राजकारणात येईन: रजनीकांत

वृत्तसंस्था
सोमवार, 15 मे 2017

यापूर्वी माझ्या नावाचा वापर केवळ राजकारणासाठी करण्यात आला. आता राजकारणात मी आलो तरी चुकीच्या लोकांना माझ्या आसपासही भटकू देणार नाही. त्यांना थारा देणार नाही

चेन्नई : आपल्या अभिनयाने चाहत्यांचे थैल्लव्वा अर्थात बॉस ठरलेले रजनीकांत आज सकाळी तब्बल आठ वर्षांनंतर चाहत्यांना चेन्नईत भेटले. एकवीस वर्षांपूर्वी झालेल्या एका मोठ्या राजकीय घोडचुकीची कबुली देत, त्यांनी "आपण राजकारणात आल्यास चुकीच्या लोकांना अजिबात थारा देणार नाही,' असे स्पष्ट केले. त्यांच्या या वक्‍त्यव्यांमुळे तमिळनाडूच्या राजकारणात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. 

"आपल्या आयुष्यात आपणांस काय करावयाचे आहे, याचा निर्णय देवच घेत असतो. सध्या मी अभिनय करावा, असे देवाची इच्छा आहे. मी ही जबाबदारी पार पाडतो आहे. मात्र उद्या देवाची इच्छा असल्यास राजकारणातही उतरेन. मी जर राजकारणात आलो; तर मी सचोटीने काम करेन. राजकारणात निव्वळ पैसा कमाविण्यासाठी आलेल्यांबरोबर मी काम करणार नाही,'' असे रजनीकांत म्हणाले

रजनीकांत ऊर्फ शिवाजीराव गायकवाड बंगळूरचे; पण त्यांचे पूर्वज महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातले. गेल्या चार दशकांहून अधिक काळ रजनीकांत अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करीत आहेत. तमीळ जनतेला चित्रपट कलाकारांचे इतके वेड आहे, की त्यासाठी ते काहीही करतील. साहजिकच तमिळनाडूचे राजकारणही या कलाकारांच्या भोवती फिरत राहते. कलाकारांचा असलेला हा प्रभाव तमिळनाडूच्या राजकारणाला सतत दिशा देत आला आहे.

रजनीकांतही 21 वर्षांपूर्वी म्हणजे 1995 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांना भेटले आणि त्यांनी राजकारणात यायचा निर्णय घेत कॉंग्रेसला पाठिंबा दिला. सर्व वारे कॉंग्रेसकडे फिरेल, की काय अशी स्थिती झाली.... पुढच्याच वर्षी 1996 मध्ये तमिळनाडूत विधानसभा निवडणुका लागल्या. या निवडणुकीत रजनीकांत यांनी कॉंग्रेसला दूर सारत द्रविड मुन्नेत्र कझगम आणि तमीळ मनिला कॉंग्रेसच्या आघाडीला पाठिंबा दिला. परिणाम व्हायचा तो झाला आणि ही आघाडी सत्तेत आली. हा रजनीकांत यांनी दिलेल्या पाठिंब्याचा परिणाम होता. कारण अण्णा द्रमुक सत्तेत आल्यास देवही तमिळनाडूला वाचवू शकणार नाही, अशा आशयाचा प्रचार रजनीकांत यांनी केला होता. याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही रजनीकांत यांनी याच आघाडीला पाठिंबा दिला. मात्र, पुढे रजनीकांत यांची राजकारण्यांशी नाळ कधी जुळलीच नाही. पुलाखालून बरेच पाणी वाहू जाऊ लागले. अखेर त्यांनी या आघाडीपासून फारकत घेतली; परंतु प्रत्यक्षात राजकारणात पुढे कधी उतरले नाहीत. 2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला मतदान केले; मात्र कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही. 

रजनीकांत राजकारणापासून दूर गेले; पण त्यांच्या उत्साही चाहत्यांनी चक्क त्यांच्यासाठी राजकीय पक्षच काढला. त्याचाही फारसा परिणाम रजनीकांत यांच्यावर झाला नाही. मधल्या काळात त्यांनी चित्रपटावर लक्ष केंद्रित केले. आज ते आठ वर्षांनंतर आपल्या चाहत्यांना सकाळी-सकाळी भेटले.... सुमारे वीस मिनिटांच्या भाषणांत त्यांनी, "यापूर्वी माझ्या नावाचा वापर केवळ राजकारणासाठी करण्यात आला. आता राजकारणात मी आलो तरी चुकीच्या लोकांना माझ्या आसपासही भटकू देणार नाही. त्यांना थारा देणार नाही,' असं स्पष्ट सुनावलं. एकवीस वर्षांपूर्वी घडलेल्या राजकीय अपघाताची कबुली देऊन रजनीकांत यांनी आपला पुढचा राजकीय प्रवास कसा असणार आहे, याचा सूचक इशाराच दिला आहे.