"तुम्हाला हिंसाचारापासून दूर ठेवण्यासाठी लढाही देईन'

वृत्तसंस्था
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

मी दिल्ली आणि श्रीनगरमध्ये सरकारची दारे ठोठावून शिकविण्याची परवानगी देण्यास सांगेन. तसेच त्यांना हवी तेवढी उंच भरारी मारू द्या, असे आवाहन करीन. तुमच्यासाठी मी प्रार्थना करेन आणि आवश्‍यकता भासल्यास तुम्हाला हिंसाचारापासून दूर ठेवण्यासाठी लढाही देईन

श्रीनगर - "मुलांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही नोबेल पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यार्थी यांनी जम्मू-काश्‍मीरमधील मुलांना सोमवारी दिली.

मुलांच्या संरक्षणासाठी बालमजुरीविरोधी चळवळ सुरू करणारे व बाल हक्कांसाठी लढणारे सत्यार्थी यांना 2014 मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. बालगुन्हेगारीबद्दल जनजागृती करण्यासाठी सत्यार्थी भारत यात्रेवर आहेत. कन्याकुमारीपासून त्यांची ही मोहीम सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

श्रीनगरमध्ये विविध शांळांमधील विद्यार्थ्यांसमोर बोलताना हिंसाचारापासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. आपण एकत्रपणे हा लढा जिंकू शकू, असेही ते म्हणाले. फुटारतावादी गट आणि काश्‍मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवायांचा उल्लेख न करता "आपल्या कामासाठी मुलांचा वापर करू नका,' असे आवाहन सत्यार्थी यांनी केले. "" शिक्षणाने मुलेही काहीही साध्य करू शकतात. ती तुमची मुले आहेत आणि आमची मुलेही आहेत,'' असे प्रतिपादन त्यांनी केले.

मुलांना उद्देशून ते म्हणाले, "" मी दिल्ली आणि श्रीनगरमध्ये सरकारची दारे ठोठावून शिकविण्याची परवानगी देण्यास सांगेन. तसेच त्यांना हवी तेवढी उंच भरारी मारू द्या, असे आवाहन करीन. तुमच्यासाठी मी प्रार्थना करेन आणि आवश्‍यकता भासल्यास तुम्हाला हिंसाचारापासून दूर ठेवण्यासाठी लढाही देईन.''