भाजपच्या निर्णयाचा मला आनंद. पण... : राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 5 एप्रिल 2017

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी शेतकऱ्यांची कर्जमाफी निर्णय घेतला. "भाजपच्या निर्णयाचा मला आनंद वाटतो. पण देशभरातील दु:खी शेतकऱ्यांसोबत सरकारने राजकारण करू नये', अशा प्रतिक्रिया काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केल्या आहेत.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी शेतकऱ्यांची कर्जमाफी निर्णय घेतला. "भाजपच्या निर्णयाचा मला आनंद वाटतो. पण देशभरातील दु:खी शेतकऱ्यांसोबत सरकारने राजकारण करू नये', अशा प्रतिक्रिया काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केल्या आहेत.

राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे की, "उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना अंशत: दिलासा मिळाला असला तरी हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला काँग्रेसचा नेहमीच पाठिंबा आहे. शेवट भाजपला हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, आमच्या दु:खी शेतकऱ्यांसोबत राजकारण खेळू नये. केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांचे दु:ख समजून घ्यावे आणि राज्याराज्यात भेदभाव करू नये.'

देशभराचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस मंगळवारी योगी आदित्यनाथ सरकारने मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. कर्जमाफीच्या घोषणेने राज्य सरकारवर सुमारे 36 हजार कोटींचा आर्थिक बोजा पडणार असून, प्रति शेतकरी एक लाखांपर्यंतचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.